आपल्याला एखाद्या गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदविण्यासाठी आता पोलीस स्थानकात जाण्याची गरज नाही. घरातूनच अथवा इंटरनेट कॅफेच्या माध्यमातून आपण ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता. मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ई-तक्रार नोंदविण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात केली. यामुळे ई-तक्रार नोंदविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
जनतेला अधिक तत्पर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ई-गव्हर्नन्सचा प्रभावीपणे अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र ई-तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आज मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाने पोलीस प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी ई-तक्रार कशाप्रकारे नोंदवता येईल, याचे सादरीकरण केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासनाने उचललेले हे आणखी एक पाऊल आहे. मुंबईमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-तक्रारीची नोंद घेतली जाईल. या पद्धतीला जनतेचा मिळणारा पाठिंबा, लोकांकडून येणार्या सूचना, पोलिसांना येणारा अनुभव या सर्वांचा विचार करून ही योजना राज्यभर राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, तक्रार नोंदविल्यानंतर ई-मेल अथवा एसएमएसद्वारे तक्रारीची नोंद घेतली गेल्याचे तक्रारदाराला २४ तासात कळविण्यात येणार आहे. आपल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली आहे याची देखील माहिती तक्रारदाराला मिळणार आहे.
आदर्श पोलीस स्थानक कसे असावे याचे मॉडेल तयार करून ते राज्यभर राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना दिल्या. यासंबंधीचे प्रशिक्षण पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना दिल्यानंतर ही योजना राबवण्यात येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणाले की, बरेच नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस स्थानकात जाण्याचे टाळतात. या सुविधेमुळे सजग नागरिक तक्रारीची नोंद करू शकतील.
यावेळी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव अजय भूषण पांडय़े, मुंबईचे पोलीस आयुक्त संजीव दयाळ, पुण्याच्या पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के.पी.रघुवंशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव नितीन करीर आदी उपस्थित होते. (महान्यूज)
1 टिप्पणी:
या अभिनव उपक्रमाचा नागरिक आणि पोलिस दोघांनाही फायदा होणार आहे. वेळेची बचत तर होईलच. पोलिसांना इंटरनेटचंही सर्वांगीण प्रशिक्षण मिळायला हवं असं प्रकर्षाने वाटतं.
टिप्पणी पोस्ट करा