वकील आणि न्यायाधीश हे न्याययंत्रणेचे प्रमुख घटक मानले जातात. या दोघांबद्दलही समाजाच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यामुळे वकिली हा पेशा मानला जातो. इतर व्यवसायांपेक्षा त्याचा दर्जा वेगळा असतो. या पेशातील लोकांनी कसे वागावे, काय काम करावे, याचे काही संकेत आहेत. बहुतांश वकील ते पाळतातही. त्याच्या जोरावरच अनेक वकील मोठे झाले. अशा वकिलांची संख्या कमी नाही. अलीकडे मात्र काही वकिलांच्या बाबतीत वेगळ्या घटना घडल्याने, एकूण या पेशाबद्दल वेगळी चर्चा सुरू झाली आहे. अंतर्गत स्पर्धा आणि झटपट पैसा कमाविण्याच्या उद्देशाने काही मंडळी अनिष्ट मार्गांचा, वेळप्रसंगी बेकायदेशीर मार्गांचाही अवलंब करू लागली आहेत. त्यातून या पेशाला "धंद्याचे' स्वरूप आल्याचे दिसते.
फौजदारी दावे चालविणाऱ्या आरोपींच्या वकिलांना बचावासाठी प्रयत्न करावा लागतो; मात्र तो कायदेशीर मार्गाने करणे अपेक्षित आहे. वकिलांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर खटले "मेरिट'वर चालविले गेले पाहिजेत. अलीकडच्या काळात वकिलांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे हे "मेरिट' कमी होते की काय अशी शंका येऊ लागली आहे. आपल्या पक्षकाराला सोडविण्यासाठी कायदेशीर मार्गापेक्षा कायदेबाह्य क्लृप्त्याच जास्त लढविल्या जात असल्याचे दिसते. आरोपींच्या पोलिस कस्टडीपासून त्याची सुरवात होते. जामीन मंजूर करवून घेण्यासाठी केली जाणारी "धावपळ', अटक टाळण्यासाठी पळून जाण्याचा दिला जाणारा सल्ला, न्यायालयाबाहेर केल्या जाणाऱ्या तडजोडी, साक्षीदार फोडण्याचे प्रकार, असे अनेक प्रकार चालतना दिसतात.
दुसऱ्या बाजूला पक्षकार आपल्याकडे खेचण्यासाठी होणारी स्पर्धा, त्यासाठी लावली जाणारी सामाजिक गणिते, पोलिसांशी असलेले "संबंध' अशा गोष्टीही पाहायला मिळतात. यात कायदेशीर लढाई किती अन् कायदेबाह्य किती, हे सर्वांनाच ठाऊक आहे.
त्याही पुढे जाऊन व्यावयायिक स्पर्धेतून एकमेकांना अडकविण्याचे प्रकारही कमी नाहीत. अर्थात वकील म्हणजे माणूसच असतात हे मान्य. त्यामुळे इतर क्षेत्रातील माणसांप्रमाणे त्यांच्यामध्ये हेवेदावे असणार, हेही समजण्यासारखे आहे; मात्र त्याचे स्वरूप वकिलांना अशोभनीय आहे. या सर्व गोष्टींना सन्माननीय अपवाद असलेले बरेच वकील आहेत. त्यासाठी त्यांची ख्यातीही आहे; मात्र असल्या प्रकारामुळे ते बाजूला पडू लागले आहेत. अनेक पक्षकारही गैरमार्गांचा अवलंब करून झटपट सुटकेचा मार्ग दाखविणाऱ्या वकिलांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे या प्रवृत्ती बळावत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत ज्येष्ठांचा आदर्श घेण्यास अगर त्यांचे मार्गदर्शनाचे दोन शब्द ऐकण्यास कोणालाही वेळ नाही. कायद्याचा कीस पाडून नाव कमाविण्यापेक्षा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यात धन्यता मानली जात आहे. ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन हे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा वकील कोण अन् आरोपी कोण, हे कळणे अवघड होईल.
1 टिप्पणी:
tumhi mhantat te khare ahe
aj changle salledenare vakil samajat kamee hot ahet va bhandane vadhavinare salledenare jasta ahet
टिप्पणी पोस्ट करा