मंगळवार, १६ जून, २००९

जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा

व्यावसाय सचोटीने आणि नोकरी इमानाने केल्यास त्यामध्ये टिकून राहता येते, असे जुनी मंडळी सांगत. अनेक यशस्वी व्यावसायिकांनी या सचोटीचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. अलिकडे मात्र ही सचोटी राहिलेली नाही. व्यावसायिक स्पर्धा वाढत गेली तशा त्यामध्ये अपप्रवृत्ती येत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी फसवाफसवीचाही आधार घेतला जाऊ लागला. आता त्याही पुढे जाऊन स्पर्धकास संपविण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. डॉक्‍टरीसारख्या पवित्र पेशातही (खरे तर त्याला व्यावसायही म्हणत नाहीत) असे प्रकार घडू लागले आहेत. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथील डॉ. कवडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही अशीच व्यावसायिक स्पर्धेचे कारण असल्याचे आढळून आले. पूर्वी घडलेल्या आष्टी तालुक्‍यातील डॉ. अजबे खून प्रकरणाचेही उदाहरण देता येईल. (अर्थात यातील आरोपींची उच्च न्यायालयात सबळ पुराव्याअभावी सुटका झाली.)
खुनाची घटना घडल्यानंतर तपास करताना पोलिस "तीन डब्ल्यू' तपासतात. वाईन, वुमेन आणि वेल्थ असे तीन डब्ल्यू मानले जातात. यापैकीच एक कारण खुनाच्या मागे असू शकते. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीचा वाद, एखाद्याची संपत्ती हडप करण्यासाठी, संपत्तीत वाटेकरी होऊ नये यासाठी, संपत्तीची चोरी करताना वैगेरेसाठी खून होत असल्याची उदाहरणे पूर्वीपासून घडत आली आहेत. मात्र, दुसऱ्याने संपत्ती मिळवूच नये, आपल्यापेक्षा श्रीमंत कोणी होऊच नये या वादातून खून किंवा खुनाचा प्रयत्न होण्याच्या घटना आता वाढत चालल्या आहेत. भेर्डापूरची घटना याच प्रकारातील. आपल्या चुलत भावाचा दवाखाना चांगला चालतो आणि आपला चालत नाही, या कारणातून सुपारी देऊन त्याच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चुलत भावाकडूनच झाला. पूर्वी अशीच एक घटना आष्टी तालुक्‍यात डॉ. विजय अजबे यांच्याबाबतीत घडली होती. त्यांच्याच चुलतभावांनी त्यांचा खून केल्याचा आरोप होता. सत्र न्यायालयात यातील एकाला फाशी तर एकाला जन्मठेप सुनावण्यात आली होती. पुढे उच्च न्यायालयात सबळ पुराव्याअभावी दोघांचीही सुटका झाली.
या घटना येथे उदाहरणादाखल घेतल्या असल्या तरी इतरही क्षेत्रात आता "जीवघेणी' व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली आहे. ग्राहकांची फसवणूक, जकात चोरी, वजनात खोट, बनावट माल, कर चुकवेगिरी या मार्गाचा अवलंब करून पैसा कमावणारे कमी नाहीत. त्याही पुढे जाऊन आता दुसऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा व्यावसाय चांगला चालत असला तर त्याच्याबद्दल तक्रारी करायच्या. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा, खोट्या गुन्ह्यांत अडकवून द्यायचे असे प्रकार आता सुरू झाले आहेत. एका बाजूला व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळ्या सक्रीय होत असताना व्यावसायिक स्पर्धेतून एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकारही सुरू आहेत. याचा फायदा खंडणीबहाद्दर आणि राजकारणी मंडळींनाही होत आहे. हा प्रकार बाजारपेठेतील वातावरण बिघडविणारा तर आहेच, शिवाय समाजासाठीही घातक ठरणारा आहे. विविध व्यावासायिकांच्या संघटना सध्या कार्यरत आहेत. विविध मागण्यांसाठी त्या सरकारी यंत्रणेशी लढत असतात. एवढेच काय तर बाहेरच्या कोणाकडून त्यांना त्रास झाला तर त्याविरूद्धही एक होतात. मग याच संघटनांनी निकोप व्यावसायिक स्पर्धेचे वातावरण तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे? आपल्यातील अपप्रवृत्तींविरूद्ध आधी लढा पुकारला तर समाजाचाही त्यांच्यावरील विश्‍वास वाढेल.

रविवार, १४ जून, २००९

राज्यभर उच्छाद मांडणाऱ्या "नगरी टोळ्या'

राजकारणासह विविध क्षेत्रांत राज्यभर ठसा उमटविलेल्या नगर जिल्ह्याला दुर्दैवाने गुन्हेगारी क्षेत्रातील काही टोळ्यांची एक काळी किनार आहे. सराफी दरोडे, स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटणे, अशा गुन्ह्यांतील नगरी टोळ्यांनी राज्यभर उपद्रव केला आहे. जिल्ह्यात सुरू झालेले गुन्ह्यांचे काही प्रकार नंतर राज्यभर पसरल्याचेही आढळून आले आहे. विशेष म्हणजे वाट चुकलेल्या या "भूमिपुत्रांना' सुधारण्यासाठीचा प्रकल्पही सर्वप्रथम नगर जिल्ह्यातच सुरू झाला.
जिल्ह्यातील अनेकांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचे जिल्ह्याला कौतुक आहेच; पण दुर्दैवाने वाट चुकलेल्या काहींच्या कृत्यांचा खेदही व्यक्त होतो. दोन वर्षांपूर्वी सराफी दुकानांवर दरोडे टाकणाऱ्या टोळीने राज्यभर उच्छाद मांडला होता. सायंकाळच्यावेळी सराफी दुकानावर दगडफेक करून लूट केली जात असे. या टोळीचा म्होरक्‍या दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्या मूळचा गुणवडी (ता. नगर) येथील. त्याचा दुसरा महत्त्वाचा साथीदार "काल्या' हा श्रीगोंदे तालुक्‍यातील. टोळीतील बहुतांश सदस्य नगर जिल्ह्यातीलच होते. त्यातील नांगऱ्या वगळता बहुतांश आरोपी जेरबंद झाल्याने आता हे गुन्हे थांबले असले, तरी मधल्या काळात राज्यभरातील पोलिस दल यासाठी चांगलेच कामाला लागले होते.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुबाडण्याचे गुन्हे, तर अद्याप सुरूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे व्यापारी आणि व्यावसायिकांना नगर जिल्ह्यात आणून लुटण्याचे या टोळीचे उपद्‌व्याप अद्याप सुरूच आहेत. शहरात जाऊन तेथील धनिकांचा विश्‍वास संपादन करायचा, त्यासाठी अन्य एखादा मध्यस्थ टाकायचा. नंतर आमच्या गावाकडे चोरीचे अगर सापडलेले सोने असल्याची बतावणी करून ते स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून संबंधितांना जिल्ह्यात आणले जाते. त्यांना सायंकाळच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज हिसकावून घेतला जातो. पोलिस भाषेत "ड्रॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुन्ह्यांची सुरवात नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदे तालुक्‍यात झाली. भीमा नदीच्या काठावर अद्यापही अशा घटना सुरूच आहेत. भटक्‍या समाजातील लोकांनी दरोड्याची ही वेगळी पद्धत सुरू केली असून, त्यांच्या कित्येक टोळ्या यासाठी कार्यरत आहेत. आता तर यावरून त्यांच्यात आपसांत वादही होऊ लागले आहेत. पोलिसांवर हल्ला करून त्यांना ठार करण्यापर्यंत या टोळ्यांची मजल गेली आहे.
पायी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचे गुन्हेही नगर जिल्ह्यात वाढले. दागिन्यांना पॉलिश करून देण्याचा बहाणा करून ते लांबविणाऱ्या आणि पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटणाऱ्या टोळ्याही श्रीरामपूर भागातील आहेत. दरोड्याच्या वेळी महिलांवर अत्याचार करण्याची कोठेवाडीतील घटनाही राज्यभर धक्कादायक ठरली. नंतर राज्यातही काही ठिकाणी तिची पुनरावृत्ती झाली.
वाट चुकून गुन्हेगारीकडे वळलेल्या अगर पिढीजात यात अडकलेल्यांसाठी राज्यातील पहिला पुनर्वसन प्रकल्पही नगर जिल्ह्यात सुरू झाला, ही एक जमेची बाजू. तत्कालीन जिल्हाधिकारी उमाकांत दांगट आणि पोलिस अधीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन निर्माण करून त्यांना चांगल्या मार्गाला लावणे, हा याचा हेतू आहे. त्यासाठी सरकारी खर्चाने त्यांना जमिनी घेऊन देऊन शेतकरी बनविण्यात येत आहे. काहींना व्यवसाय सुरू करून देण्यात येत आहे. वाट चुकलेल्या या भूमिपुत्रांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे दृश्‍य परिणाम लक्षात यायला वेळ लागेल.

लूटमारीचीही परंपरा!
जिल्ह्यात लूटमारीच्या घटना अलीकडच्या काळातील नाहीत. त्यांना ही जुनी परंपरा आहे. ब्रिटिशांच्या काळातही त्यावेळच्या पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या "काळू-कान्हू'च्या टोळ्या होत्याच. मात्र, ते गरिबांना लुटत नसत, शिवाय लुटीतील काही भाग समाजकार्यासाठी वापरत. आताचे मात्र स्वतःसाठीची लूटमार करतात, हे विशेष !

सोमवार, ८ जून, २००९

नातलगाने फसविले

खेळाच्या, शिकायच्या वयात त्यांच्या नशिबी कुंटणखाना आला होता. नातेवाइकांनी त्यांना फसवून एका महिलेला विकले होते. त्यांच्या सुटकेसाठी पित्याची धडपड सुरू होती; पण खाकी वर्दीतील पोलिसांनी उलटाच बनाव करून त्या मुली स्वतःच पळून आल्याची कागदपत्रे रंगवली होती; परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि वृत्तपत्रांच्या रेट्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली अन अखेरीस त्या बहिणींची नरकयातनांतून सुटका झाली.

बीड जिल्ह्यातील परळी येथील दोघी बहिणी आईविना वाढत होत्या. हॉटेलमध्ये काम करून त्यांचे वडील त्यांचा सांभाळ करीत होते. त्यांचे शिकण्या खेळण्याचे वय, पण घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांना सुखाचे दिवस येत नव्हते. तशातच त्यांचे एक लांबचे नातेवाईक त्यांना भेटले. मुलींचा सांभाळ करतो, म्हणून त्या दोघींना ते घेऊन गेले; पण नंतर घडले ते भलतेच.
त्या नातेवाइकाने दोघी मुलींना जामखेडमधील (जि. नगर) एका कुंटणखान्यात विकले आणि त्या मुलींचे आयुष्यच काळवंडून गेले. त्यांना त्यांच्या वडिलांशीही संपर्क करणे शक्‍य होत नव्हते. काही महिने तेथे ठेवल्यानंतर कुंटणखान्याच्या मालकिणीने त्यांना शेवगावमध्ये आणले. तेथेही त्यांच्याकडून वेश्‍या व्यवसाय करून घेतला जात होता. सुटकेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे त्यांचे वडीलही त्यांचा शोध घेत होतेच. एके दिवशी संधी मिळताच मोठ्या मुलीने आपल्या वडिलांशी संपर्क करून आपण शेवगावमध्ये असल्याचे कळविले.
तेथून पुढे त्या पित्याची धडपड सुरू झाली. कसेबसे पैसे जमा करून ते शेवगावमध्ये आले. तेथे आल्यावर आपल्या मुलींची स्थिती त्यांना समजली. कुंटणखान्यातील लोक दाद देत नाहीत, म्हटल्यावर त्यांच्या सुटकेसाठी पित्याने पोलिसांकडे धाव घेतली; पण अशावेळी मदत करतील ते पोलिस कुठले? पोलिसांनी त्यांना हाकलून लावले. पैशाशिवाय काम होणार नाही, हे लक्षात आल्यावर पित्याने त्यासाठी धावपळ सुरू केली. त्यांच्या सुदैवाने ही माहिती पाथर्डीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कळाली. मग त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, पोलिस त्यांनाही दाद देईनात. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्रांकडे धाव घेतली. "सकाळ'च्या बातमीदाराला ही माहिती कळाल्यावर त्याची बातमी प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली, मात्र तीही उलट्या दिशेने. आता हे प्रकरण आपल्यावर शेकणार, हे लक्षात आल्यावर पोलिसांनी असे काही घडलेच नाही, असा बनाव करण्याचा प्रयत्न केला. आपल्या हस्तकांमार्फत त्या मुलींचे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्यात आले. "आम्ही येथे स्वेच्छेने आलो असून, येथे धुण्याभांड्याचे व घरकाम करीत आहोत, आमची कोणाबद्दलही तक्रार नसून आपले वडील मुद्दाम बदनामी करीत आहेत,' असे त्यामध्ये लिहून घेतले. एवढेच नव्हे तर वृत्तपत्रांकडे बातम्यांचा खुलासा आणि सोबत कारवाईचा इशारा देणारे पत्रही त्या मुलींच्या नावानेच पाठवून दिले.
मात्र, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरले. शिवसेना महिला आघाडीच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनीही यामध्ये लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिले. नगरच्या "स्नेहालय' संस्थेचे कार्यकर्तेही यासाठी सरसावले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच याची चौकशी सुरू झाली. त्या दोन्ही मुलींना नगरला आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर त्यांची चौकशी करण्यात आली. आधार मिळतोय हे लक्षात आल्यावर मुली खरे बोलू लागल्या. त्यांनी भोगलेल्या नरकयातनांची माहिती ऐकून सर्व जण अवाक झाले. आपल्याला पुन्हा शेवगावला अगर वडिलांकडे पाठवू नये, या अटीवर त्या मुली बोलायला तयार झाल्या. त्यामुळे त्यांना स्त्री आधार केंद्रात पाठविण्यात आले. कुंटणखान्याची मालकीण, दलाल आणि इतर साथीदारांना अटक करण्यात आली.
आता त्या आरोपींची आणि बनवाबनवी करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी सुरू आहे.

गुरुवार, ४ जून, २००९

"चॉईस क्रमांक' लाटण्याचा प्रयत्न

मोबाईलच्या "चॉईस नंबर'चे "फॅड' "कॅश' करून पैसा मिळविण्याच्या लालसेने दोन तरुणांना गुन्हेगारी जगात ढकलले. दुसऱ्याच्या चॉईस नंबरचे कार्ड बनावट कागदपत्रांद्वारे मिळवून त्याची एक लाख रुपयांत विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, खरेदीदाराला संशय आल्यामुळे ते अडकले. आता दोघेही पोलिसांचा पाहुणचार घेत आहेत. प्रदीप गजानन राठोड (वय 23), अभय राजेश बन (वय 21, दोघेही, रा. सिंदखेडराजा बायपास रोड, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-तीन येथील रहिवासी प्रदीप प्रल्हाद राठोड यांनी मोबाईल कंपनीकडून चॉईस क्रमांकाचे प्रिपेड सिमकार्ड दहा हजार रुपये देऊन घेतले होते. त्यांच्याकडे दोन-तीन अन्य क्रमांकाचे सिमकार्ड आहेत. त्यामुळे ठराविक वेळी ते हे कार्ड वापरत होते; अन्यथा ते बंद राही. अभय बन मोबाईलचे रिचार्ज व्हाऊचर विकण्याचे काम करतो. या चॉईस क्रमांकावर त्याचा डोळा होता. त्याने कंपनीच्या गॅलरीतून सिमकार्ड मालकाचे नाव मिळविले. प्रदीप प्रल्हाद राठोड असे नाव कळताच त्याला औरंगाबाद येथे संगणकशास्त्र विषयाचे शिक्षण घेणारा त्याचा मित्र प्रदीप गजानन राठोड याची आठवण झाली. त्यानंतर त्यांनी हा नंबर मिळविण्याचा कट रचला. मूळ मालक अनेकदा हे सिमकार्ड बंद ठेवत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी प्रदीप याच्या वाहनचालक परवान्याची झेरॉक्‍स प्रत वापरून त्या सिमकार्डचे मालक आपणच असल्याचा बनाव करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी सिडको कॅनॉट प्लेस येथील एका गॅलरीत येऊन कागदपत्रे देऊन आमचे सिमकार्ड गहाळ झाले आहे. दुसरे देण्यात यावे, अशी मागणी केली. तेव्हा डीएसके कम्युनिकेशनमधून त्यांना या क्रमांकाचे दुसरे कार्ड देण्यात आले. नवे कार्ड हाती पडताच त्यांनी बदनापूर येथील एकास दूरध्वनी करून का
र्ड मिळाल्याचे सांगितले. त्याने निराला बाजार येथील अफसर नावाच्या व्यक्तीला चॉईस क्रमांक एक लाख रुपयांमध्ये देण्याचा सौदा करून ठेवलेला होता. हे दोघे या क्रमांकाचे कार्ड घेऊन अफसर यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांना हा क्रमांक ओळखीचा वाटला. त्यांनी चौकशी केल्यानंतर प्रदीप राठोड यांचे नाव कळाले. त्याचबरोबर प्रदीप राठोड यांचे बंधू प्रमोद राठोड यांच्याकडे यापूर्वी हा चॉईस क्रमांक देण्याची मागणीही त्यांनी केली होती. हे आठवताच त्यांनी प्रमोद राठोड यांच्याशी संपर्क साधून ""मी मागितला तर दिला नाही व दुसऱ्याला कशामुळे चॉईस नंबर विकला,'' अशी विचारणा केली. प्रमोद राठोड यांना काही समजेना. आपण नंबर विकला नसताना असे का घडत आहे, असा प्रश्‍न त्यांना पडला. त्यानंतर चौकशीत ही फसवाफसवी समोर आली. श्री. राठोड यांनी सिडको पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बी. यू. बोडखे पाटील तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मंगळवार, २ जून, २००९

कोठे गेला पोलिसांतील माणूस?


अल्पवयीन मुलींची विक्री- पोलिसांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ... छळाची तक्रार द्यायला आलेल्यालाच पोलिसांनी बदडले... राजकीय पक्षाच्या आंदोलनानंतरच पोलिस यंत्रणा हलली... अशा बातम्या आता नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे असा प्रश्‍न पडतो, की आपली पोलिस यंत्रणा एवढी निष्ठुर कशी झाली? पोलिस असले, तरी शेवटी तीही माणसेच आहेत, असे त्यांच्या हक्क व सवलतींसंदर्भात बोलताना सांगितले जाते, मग एका माणसावरच अन्याय होत असताना पोलिसांतील हा माणूस कोठे जातो?
शेवगाव तालुक्‍यात नुकतीच एक घटना घडली. तेथे एका कुंटणखान्याच्या मालकिणीने दोन अल्पवयीन मुलींना विकत घेऊन वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडले. बराच काळ डांबून ठेवण्यात आलेल्या या मुलींनी संधी मिळताच आपल्या वडिलांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या पित्याने मुलींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांची गाठ नेमकी अशाच "निष्ठुर प्रवर्गातील' पोलिसांशी पडली. पोलिस साथ देत नाहीत, म्हणून त्या पित्याने राजकीय नेते आणि प्रसिद्धी माध्यमांकडे धाव घेतली. त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर यंत्रणा हलली; मात्र तीही उलट्या मार्गाने! असे काही घडलेच नाही, याचा बनाव करण्यासाठी पोलिसांनी आपली हुशारी पणाला लावली. शेवटी वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार गेल्यावर प्रकरण कसेबसे मार्गी लागले; पण तपास पुन्हा त्याच पोलिसांकडे!
ही घटना ताजी म्हणून येथे उदाहरणादाखल घेतली आहे. पोलिसांतील माणुसकी नव्हे, माणूसपणही संपल्याच्या किती तरी घटना दररोज ठिकठिकाणी घडत आहेत. दिवसेंदिवस आपल्या पोलिस यंत्रणेचे स्वरूप आणि त्यातील माणसांचे वर्तन बदलत आहे. राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या पोलिस यंत्रणेला राज्यकर्त्यांच्या लाथाळ्या तर सहन कराव्याच लागतात; पण सामान्य जनतेचा विश्‍वासही ही यंत्रणा गमावू लागली आहे. या मुळे पोलिस यंत्रणेचा खरा हेतूच मागे पडला आहे. "पोलिस ठाण्यात सामान्यांना न्याय मिळत नाही,' ही भावना वाढीस लागली आहे. त्यातून पोलिसांना मदत करण्याची वृत्ती कमी झाली असून, त्याचा परिणाम तपासावर होतो. पोलिसांकडे जाण्याऐवजी लोक आता प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय व्यक्तींकडे धाव घेऊ लागले आहेत. पूर्वी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी राजकीय व्यक्तींचा आधार घेतला जात होता. हे लोक सत्ता किंवा आंदोलनाचे हत्यार वापरून हवा तसा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना भाग पाडत. आता मात्र खऱ्या घटनांसाठीही याच मार्गाचा अवलंब करावा लागतो, हे दुर्दैव आहे.
पोलिस दल कमकुवत होण्यास राजकारणी मंडळी आणि स्वतः पोलिसही जबाबदार आहेत. दोघांनीही एकमेकांचा सोयीनुसार वापर करून घेतला. राजकारण्यांना सत्तेसाठी पोलिस यंत्रणेचा वापर हवा होता, तर पोलिसांना चांगल्या ठिकाणच्या बदल्या अर्थात पैशासाठी राजकीय लोकांचा वापर हवा होता. या गडबडीत सामान्यांवर अन्याय होतो आहे, याचा दोघांनाही विसर पडला. यात सर्वांत जास्त नुकसान झाले ते पोलिसांचे! राजकारण्यांना मदत करूनही जेव्हा गरज पडेल, तेव्हा राजकारणी पोलिसांनाच लाथाळतात, शिव्याशाप देतात, तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचा रोषही पोलिसांवरच असतो. अर्थात त्यांची ही अवस्था करण्यास कारणीभूत असलेले राजकारणीही आता जनतेच्या रोषाचे बळी ठरू लागले आहेत. बूट फेकीच्या घटना वाढणे हे याचेच लक्षण आहे. कायद्याने संरक्षण आणि जबाबदारी असलेल्या पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार करावा. राजकारणी, धंदेवाले आणि गुंडांच्या आहारी जाताना किमान आपल्यातील "माणूस' तरी जिवंत ठेवावा.