बुधवार, ३० सप्टेंबर, २००९

कसा मिळणार जलद न्याय?

"आजोबाने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नातवाच्या काळात लागतो,' असे आपल्याकडील न्याययंत्रेणेबद्दल बोलले जाते. न्यायालयात खटले प्रलंबित राहण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता, याची कारणमीमांसा पटतेही. मात्र, खटल्यांचा निकाल जलद लावण्याची जबाबदारी एकट्या न्यायालयाची नाही. पोलिस, न्यायालये, वकील आणि पक्षकार यांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच हे काम होऊ शकते. यातील एखाद्या घटकाकडून विलंब झाला तरीही खटला मागे पडतो. त्याचे गांभीर्य कमी होते आणि लोकांमध्ये असे समज-गैरसमज पसरू लागतात. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठीही मग लोकन्यायालये, वैकल्पिक वाद निवारण, अशा मार्गांचा अवलंब केला जात असला, तरी एकूण प्रमाण पाहता राज्यात 93 टक्के खटले प्रलंबित राहतात. यंत्रणेतील दोष सुधारणे हाच यावरील खरा उपाय असला, तरी त्याकडे दुर्लक्षच होत आहे.

गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता 11 लाख 98 हजार खटले राज्यभरातील न्यायालयांसमोर सुनावणीस आले होते. त्यातील 11 लाख 24 हजार खटले शेवटी प्रलंबित राहिलेच. विविध कायद्यांखाली दाखल खटल्यांच्या निर्गतीचे प्रमाण पाच ते नऊ टक्‍क्‍यांपर्यंतच असल्याचे दिसून येते. त्यातील बरेचसे पोलिसांच्या पातळीवर प्रलंबित आहेत.

न्यायालयातील कामकाज साक्षी-पुराव्यांवर चालते. त्यासाठी तपास यंत्रणा, साक्षीदार, फिर्यादी यांना साक्षीसाठी उपस्थित राहणे आवश्‍यक असते. त्यानंतर बचाव पक्षाला बचावाची संधी दिली जाते. कायद्याच्या चौकटीत राहून करावयाची ही प्रक्रिया तशी किचकट आणि वेळखाऊ असते. मात्र, त्याही पेक्षा सर्वांत जास्त वेळ हा साक्षीदारांच्या उपस्थितीची प्रतीक्षा करण्यात जातो. अनेक तारखांना साक्षीदार किंवा आरोपी हजर राहत नाहीत. कधी वकील वेळ मागवून घेतात. बहुतांश प्रकरणांत साक्षीदार अगर आरोपींपर्यंत "समन्स' अथवा "वॉरंट' पोचत नाही. त्यामुळे संबंधित खटल्याला पुढील तारीख देण्याशिवाय न्यायालयापुढे पर्याय राहत नाही. पुढील तारखेसही खटला चालतोच असे नाही. न्यायालयात दाखल बहुतांश खटल्यांची हीच परिस्थितीत असते. गुन्हेगारी वाढली, तंटे वाढले, त्यामुळे न्यायालयात दाखल खटल्यांची संख्या वाढते आहे. मात्र, हे खटले तातडीने निकाली काढण्यासाठी यंत्रणा राबविण्यावर मात्र विशेष भर दिला जात नसल्याचे दिसते.

गुन्ह्यांचा तपास करायचा पोलिसांनीच, दोषारोपपत्र आणि साक्षी-पुरावाही त्यांनीच आणायचा, आरोपी किंवा साक्षीदारांना हजर करण्याची जबाबदारीही त्यांचीच, अशी या व्यवस्थेची स्थिती आहे. त्यातून पळवाटा आणि फायद्याचे मार्ग शोधले गेले नाही तरच नवल. एखादा खटला चालण्यापेक्षा न चालण्यात "फायदा' असेल, तर पोलिस तो मार्गच अवलंबताना दिसतात. त्यामुळे समन्स-वॉरंट बजावणीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. ज्याच्यावर न्यायालयाचे कामकाज अवलंबून आहे, तेच मुख्य काम करण्यात सर्रास हयगय केली जाणे ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही.

केवळ पोलिसच नव्हे, तर पक्षकार आणि वकिलांचीही यात जबाबदारी आहेच. पण बदलत्या काळानुसार वकिली "व्यवसाय'ही बदलत आहे. न्यायालयात मुद्देसूद युक्तिवादापेक्षा न्यायालयाबाहेरील "युक्‍त्या' वापरणारे वकीलही कमी नाहीत. न्यायालयात प्रकरण प्रलंबित ठेवून त्यापोटी बाहेर आपले काम साधून घेणारे पक्षकारही आहेत. एका बाजूला असे अडथळे असताना दुसरीकडे न्यायालयाला यंत्रणेच्या मर्यादा आहेत. न्यायाधीशांना बसायला जागा नाही, कामकाज चालविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही, खटल्यांच्या प्रमाणात न्यायालयांची संख्या नाही, असे अडथळेही आहेतच. अशा परिस्थितीत जलद न्यायाची अपेक्षा कशी करणार? तंटामुक्त गाव मोहिमेसारखे उपक्रम घेऊन तरी हे काम होणार का? कारण तेथेही शेवटी हीच यंत्रणा काम करणार आहे. त्यामुळे मूळ यंत्रणेतच सुधारणा करण्याचे प्रयत्न सरकारने केले पाहिजेत.

सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

चला, करू या उदासीनतेचे सीमोल्लंघन!

आपल्यासमोर अपघात झाला तरी आपण गाडी न थांबविता पुढे निघून जातो. शेजारच्या घरात झालेल्या चोरीची आपल्याला माहिती नसते. नळाला पाणी आले नसले, तरी आपल्याला काहीच देणे-घेणे नसते. जवळच कचराकुंडी असली, तरी आपण रस्त्यावरच कचरा टाकतो. अनेकदा पक्षांतरे केलेला, कामे न केलेला उमेदवार समोर आला, तरी आपण त्याला जाब विचारीत नाही, कारण या प्रत्येक गोष्टीत आपली भूमिका असते "मला काय त्याचे!' ही सामान्यांची उदासीनता विकासातील मोठा अडसर आहे. राजकीय अस्थिरतेपासून भ्रष्टाचार, अनारोग्य, गुन्हेगारी, महागाई अशा अनेक प्रश्‍नांचे मूळ या उदासीनतेत आहे. या उदासीनतेचे सीमोल्लंघन करून सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविण्याची गरज आहे. या संकल्पासाठी दसरा आणि कृतीसाठी विधानसभा निवडणुकीची संधी चालून आली आहे.

केवळ लोकशाही आणि सरकारी व्यवस्थाच नव्हे, तर समाजातील सर्वच घटना-घडामोडींकडे उदासीनतेने पाहण्याची वृत्ती लोकांमध्ये बळावत आहे. सामाजिक जबाबदारीच नव्हे, तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेल्या अधिकारांचाही विसर त्यातून पडला आहे. जणू सर्वच गोष्टी आता हाताबाहेर गेल्या आहेत, अशी हताश वृत्तीही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. सत्तेसाठी हपापलेल्या राज्यकर्त्यांना आपण त्यांची जागा दाखवू शकतो, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेलाही वठणीवर आणू शकतो आणि बिघडत चाललेली समाजव्यवस्थेची घडी आपण सावरू शकतो, यावरचा लोकांचा विश्‍वासच उडत चालला आहे. त्यालाही ही नकारात्मक मनोवृत्ती कारणीभूत आहे. आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, आपण आपले कर्तव्य पार पाडून थोडी सजगता पाळली, तरी बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात.

अर्थात हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, ही गोष्टही तितकीच खरी आहे; परंतु सुरवात तर करायला हवी. भ्रष्टाचार का होतो, तर आपण पैसे द्यायला तयार होतो म्हणून. रोगराईच्या काळात आपण किती दक्षता घेतो? रस्त्यावर थुंकू नका, संसर्ग टाळा, अशा सूचनांकडे आपण किती गांभीर्याने पाहतो? विनाकारण भाववाढ झाली, तरी आपण त्याचा जाब न विचारता खरेदीसाठी गर्दी करतोच. नागरी सुविधा मिळत नसल्या, तरी पुन्हा दारात आलेल्या उमेदवाराला मत देतोच. सत्ता मिळविण्यासाठी राजकीय मंडळी ज्या खटपटी-लटपटी करतात, ज्या तडजोडी करतात, त्यालाही आपण बळी पडतो. पैसे घेऊन केलेले मतदान निकोप लोकशाही कशी घडविणार? अशा लोकप्रतिनिधींकडून चांगल्या कामाची अपेक्षा तरी कशी करणार? बेकायदेशीर कामांसाठी प्रशासनावर दबाव आणायला कोण भाग पाडते? दर्जाशी तडजोड करून अवतीभोवती सुरू असलेल्या कामांकडे का दुर्लक्ष केले जाते? लोकशाही राज्यात सरकारकडून आपण मोठ्या अपेक्षा करताना हे सरकार बनविण्यासाठी आणि चालविण्यासाठी आपली जी कर्तव्ये आहेत, ती आपण कशी पार पाडतो, याकडे कधी पाहिले जाते का?

सामाज बिघडला आहे, असे म्हणणे सोपे आहे; पण त्याच समाजाचा घटक म्हणून आपण कसे वागतो, याकडेही पाहिले पाहिजे. वाहतुकीची कोंडी होते, तेव्हा आपले वर्तन कसे असते? सार्वजनिक इमारतींचे कोपरे घाण कसे होतात? बंदी असतानाही भर रस्त्यात आणि कार्यालयांत सिगारेट कोण ओढते? इतरांचा विचार न करता मोबाईलवर जोरजोरात कोण बोलते? खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या हाती वाहने आणि महागडे मोबाईल कोण देते? अफवा कोण परविते, या छोट्या-छोट्या गोष्टी असल्या, तरी दुर्लक्ष करण्यासारख्या नक्कीच नाहीत.

आपल्या आसपास घडणाऱ्या घटना-घडमोडींवरही आपली प्रतिक्रिया थंडच असते. अपघात झाला, तर जखमींना मदत किंवा पोलिसांना कळविण्याची तसदी आपण घेत नाही. अडचणीत सापडेल्या शेजाऱ्याच्या मदतीला धावून जात नाही. आपल्या डोळ्यांदेखत कोणाची फसवणूक होत असेल, तर आपण दुर्लक्ष करतो. एवढेच काय, स्वतःची फसवणूक होणार नाही, यासाठीही सावध होत नाही आणि झालीच, तर "अक्कलखाती जमा' म्हणून सोडून देतो. कायदा पाळण्यापेक्षा तो मोडून आपलाच फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो. आपली ही भूमिका एकूण व्यवस्थेला आणि आपल्यालाही मारक ठरणारी असते. निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा अधिकार योग्य तऱ्हेने बजावणे, समाजिक जाणिवेचे भान आणि दक्ष नागरिकाची भूमिका बजावली तरी मोठे काम होऊ शकेल. त्यासाठीच उदासीनतेचे सीमोल्लंघन करावे लागेल.

रविवार, २७ सप्टेंबर, २००९

गुन्हेगारीचे सीमोल्लंघन!

अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. आधुनिक साधनांचा वापर आणि जीवघेणी मारहाण, अशी नवी पद्धत गुन्हेगारांनी शोधून काढली आहे. विशिष्ट जाती-जमातींचा सहभाग, भौगोलिक स्थितीनुसार बदलणारे गुन्हेगारीचे स्वरूप, गुन्हे घडण्याचा काळ, अशा सर्वांमध्ये आता बदल झाला आहे. जणू गुन्हेगारीनेही आता सीमोल्लंघन केले आहे.
गेल्या काही काळात गुन्हेगारीची ही पद्धत पाहायला मिळत आहे. ठाण्यापासून मराठवाड्यापर्यंतच्या पट्ट्यात गेल्या दोन-तीन वर्षात अशा प्रकारच्या गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे. यामध्ये सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे दरोडेखोर चोरी करताना जबर मारहाण करून लोकांचा जीव घेत आहेत. या पट्ट्यात गेल्या तीन वर्षात अशी कितीतरी माणसे चोरट्यांनी मारली. सराफ दुकाने लुटणे, पेट्रोल पंप लुटणे, घरांवर दरोडे घालून, लोकांचा जीव घेऊन ऐवज पळविणे, बॅंका, पतसंस्थांवरील दरोडे, असे गुन्हे सध्या वाढले आहेत. यामध्ये गुन्हेगारांकडून मोबाईल, वाहने, पिस्तूल या आधुनिक साधनांबरोबरच नव्या युक्‍त्याही वापरल्या जात आहेत. त्यामुळे पोलिस आणि लोकांनाही गुंगारा देऊन आरोपी दीर्घ काळ फरार राहू शकतात.

पोलिस तपासाची ठरलेली पद्धत असते. त्यांचे काही ठोकताळे असतात. त्यानुसारच तपासाची दिशा ठरते; मात्र आता असे ठोकताळेही कुचकामी ठरत आहेत. गुन्हेगारांना ना प्रदेशाचे बंधन राहिले आहे, ना जाती-जमातींचे. कुठलेही गुन्हेगार कोठेही गुन्हे करून काही वेळात दूरवर निघून जात आहेत. पोलिस मात्र स्थानिक पातळीवर, स्थानिक संशयितांकडे तपास करीत बसतात. पोलिसांच्या तपासाला मदत ठरणाऱ्या खबऱ्यांनाही याची माहिती नसते. त्यामुळे सर्वच बाजूंनी पोलिसांची अडचण होत आहे. बदलत्या स्वरूपाची गुन्हेगारी आणि पारंपरिक पद्धतीची पोलिस यंत्रणा, असेच स्वरूप सध्या पाहायला मिळत आहे. अचानक कोठूनही येऊन गुन्हा करून काही काळायच्या आत निघून जाणारे गुन्हेगार पोलिसांच्या नाकेबंदी आणि दरोडेप्रतिबंधक योजनेतही अभावानेच अडकतात. अमावस्येच्या रात्रीच गुन्हे घडतात, ही संकल्पनाही आता जुनी होत असून, भरदिवसा दरोडे पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

बदलती समाजव्यवस्था आणि वाढता चंगळवाद, ही या बदलाची कारणे मानसशास्त्रज्ञ सांगतात. दृक्‌श्राव्य प्रसारमाध्यांचा वाढता प्रसार, त्यातून होणारे श्रीमंतीचे दर्शन, त्याचा इतरांना वाटणारा हव्यास आणि प्रत्यक्षात समाजात असलेली टोकाची आर्थिक विषमता, हेही यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चांगल्या घरातील तरुणही गुन्हेगारीकडे वळालेले पाहायला मिळतात. दरोडे घालायचे, मिळालेल्या पैशातून मौजमजा करायची, जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत मजा करून घ्यायची, अशी वृत्ती वाढलेली दिसून येते. आर्थिक विषमतेतून निर्माण झालेला राग चोरी करताना जीव घेण्यास कारणीभूत ठरतो.

मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९

पोलिसांनो, आता जुगारसुद्धा

जुगार-मटकेवाल्यांवरील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून हप्ते घेणारे पोलिस, अटक टाळण्यासाठी तडजोडी करणारे पोलिस, अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने चालविणारे पोलिस, ढाबे चालविणारे पोलिस, विविध व्यवहारांमध्ये दलाली करणारे पोलिस, फार तर काम सोडून एखादा जोडधंदा किंवा घरची शेती पाहणारे पोलिस, अशी पोलिसांची विविध "रूपे' यापूर्वी ऐकण्यात, पाहण्यात आली होती; पण नगरच्या पोलिस मुख्यालयात स्वतःचाच अड्डा चालवून जुगार खेळणारे पोलिस, हे नवे रूपही नुकतेच पाहायला मिळाले. ज्यांनी बाहेरच्या जुगार अड्ड्यांवर छापे घालून अवैध धंदे मोडून काढायचे, तेच पोलिस सरकारी जागेत बसून जुगार खेळू लागले तर कसे होणार?

मोठ्या शहरांतील पोलिस जाऊ द्या; पण ग्रामीण भागातील पोलिस प्रामाणिकपणात अघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. कर्तव्यकठोरता नसली, तरी इमानदारीत नोकरी करणारे पोलिस ग्रामीण भागात जास्त असतात, असे आढळून येते. अर्थात नगरही त्याला अपवाद नाही. इमानदारीत नोकरी करणारे पोलिस येथेही आहेत. त्याचबरोबर एखाद्या राजकारण्याला किंवा उद्योगपतीला लाजवेल अशी संपत्ती जमवून मोठे बंगले बांधणारे, महागड्या गाड्या घेणारे पोलिसही नगरमध्ये कमी नाहीत. पोलिस खात्याकडून मिळणारा पगार पाहता, केवळ पगारावर हे शक्‍यच नाही. मोक्‍याच्या जागी बदली करवून घेण्यासाठी आधी "पेरणी' करायची आणि नंतर मग कमाईच कमाई, ही पोलिसांची पद्धत सर्वत्रच आहे. अर्थात नगर जिल्ह्यात जुगाराची कीड काही नवीन नाही. राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, सरकारी नोकर, व्यावसायिक, डॉक्‍टर, वकील अशी मंडळीही जुगार खेळताना पकडली गेल्याची उदाहरणे आहेत. गावागावांत आणि शहरातही लोक दिवसभर जुगार खेळत बसलेले असतात. वर्षानुवर्षांची ही कीड मोडून काढण्यात पोलिसांना यश येत नाही.

नगरच्या मुख्यालयात मात्र जरा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. तेथील बॉक्‍सिंग हॉलमध्ये म्हणे पोलिसांनीच जुगारअड्डा सुरू केला होता. गेल्या वर्षी पोलिसांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या. त्यामध्ये तांत्रिक कारणाने अनेकांच्या बदल्या मुख्यालयात करण्यात आल्या. त्यामुळे साडेआठशेहून अधिक पोलिस तेथे आहेत. शिवाय, ज्यांच्या बाहेर बदल्या झाल्या, त्यांच्यापैकी बरेच जण कामावर न जाता नगरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे काम नसलेल्या पोलिसांची संख्या वाढली. मुख्यालय म्हणजे "वरकमाई' नसलेले ठिकाण. वेगळे उद्योग करण्याचीही सोय नाही. अशा पोलिसांनी वेळ घालविण्यासाठी म्हणून पत्ते सुरू केले. पुढे त्याचे रूपांतर जुगारात कधी झाले ते कळालेच नाही. अशा धंद्यावर छापा घालताना त्यांचा जवळून अभ्यास असलेल्या पोलिसांनी मग त्याच पद्धतीने आपला अड्डाही चालविण्यास सुरवात केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांची आणखी नाचक्की नको म्हणून गुन्हा दाखल करण्याचे टाळण्यात आले असले, तरी संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई होत आहे. मात्र, या प्रकारातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, याचे भान पोलिसांनी ठेवले पाहिजे. उद्या पोलिस कोणत्या तोंडाने इतर ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापे घालण्यासाठी जाणार? "जुगार खेळणारे' अशी जर पोलिसांची प्रतिमा होणार असेल, तर त्यांचा गुन्हेगारांवर वचक कसा राहणार? सामान्य जनतेला त्यांचा आधार कसा वाटणार, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

गुरुवार, १७ सप्टेंबर, २००९

नारीशक्तीचा उद्रेक

गावातल्या दारूबंदीसाठी आणि अवैध व्यवसायांविरोधात आता नारीशक्तीचा उद्रेक होऊ लागला आहे. कधी हातात दंडुके घेऊन, तर कधी आंदोलनाच्या मार्गाने महिलांचा लढा सुरू आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिला आता अशा कामांसाठी संघटित होत आहेत, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. पुरुषसत्ताक पद्धतीच्या समाजरचनेतील महिला यासाठी पुढे येत आहेत, हेही विशेषच म्हणावे लागेल. मात्र, त्यांचा हा लढा सुखासुखी नाही. एका बाजूला घरातील पुरुष मंडळी, गावातील सत्ताधारी, गुंड प्रवृत्तीचे लोक आणि दुसरीकडे ढिम्म प्रशासन यांच्याविरुद्ध त्यांना लढा द्यावा लागत आहे. यातही त्यांचा सोयीनुसार वापर करून घेण्याचे प्रकार घडत आहेत.

सध्या बऱ्याच ठिकाणी महिलांची अशी आंदोलने सुरू आहेत. त्यांतील काही ठिकाणी अल्पसे यश आले असले, तरी बहुतांश ठिकाणची लढाई सुरूच आहे. ज्या गावात दारूची अधिकृत दुकाने आहेत, तेथे महिलांची ग्रामसभा घेऊन व मतदानाद्वारे दारूबंदी करावी, अशी कायद्यात तरतूद आहे; मात्र जेथे बेकायदेशीर दारूविक्री सुरू आहे, तेथे ग्रामसभा आणि मतदान घेण्याची काय गरज? बऱ्याचदा सत्ताधारी आणि प्रशासन महिलांची दिशाभूल करून तांत्रिक मुद्दे उपस्थित करतात. त्यातूनच मग महिलांच्या सहनशीलतेचा उद्रेक होतो. दारूमुळे उद्‌ध्वस्त होणारे संसार वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावण्याची त्यांची तयारी असते. त्यातूनच आक्रमक आंदोलने होतात. कधीही घराबाहेर न पडलेल्या महिला यामध्ये सहभागी होऊन जेव्हा तावातावाने आपली मते मांडतात, त्या वेळी या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येते.

सध्या तरी महिलांच्या या आंदोलनाचा रोख पोलिसांच्या विरोधात आहे. पोलिस कारवाई करीत नाहीत म्हणून महिलांनीच पुढाकार घेऊन दारूच्या भट्ट्या उद्‌ध्वस्त केल्या, असे स्वरूप या आंदोलनाचे आहे, तर कोठे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवरच कारवाई केल्याने पुन्हा दुसरे आंदोलन करण्याची वेळ आल्याची काही उदाहरणे आहेत. कोठे महिलांच्या आडून गावातील पुरुष किंवा राजकीय लोकच आंदोलन चालवीत असून, विरोधकांना अडचणीत आणून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न त्यातून होत आहे. संघटित झालेली ही नारीशक्ती परिवर्तन करणारी ठरू शकते. त्यासाठी या शक्तीला योग्य दिशा मिळण्याची गरज आहे. कोणाच्या सांगण्यावरून आपली आंदोलने भरकटणार नाहीत, याची काळजी या महिलांनी घेण्याची गरज आहे.

दुसऱ्या बाजूला महिलांवर अशी आंदोलने करण्याची वेळ का यावी, याचाही विचार करण्याची गरज आहे. करापोटी उत्पन्न मिळते म्हणून गावोगावी दारू दुकानांना परवाने द्यायचे, दुसरीकडे दारूबंदीसाठी प्रयत्न करू म्हणायचे, असे सरकारी दुटप्पी धोरणही याला कारणीभूत आहे. पूर्वी अवैध धंद्यांना केवळ पोलिसांचे "संरक्षण' असायचे. आता बहुतांश राजकीय मंडळीही अशा धंद्यावाल्यांना "कार्यकर्ते' म्हणून पोसतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना पहिला विरोध राजकीय व्यक्तींचाच होतो, ही गोष्टही नाकारून चालणार नाही. धंदेवाल्यांकडून होणाऱ्या फायद्याचे गणित पोलिसांनंतर आता राजकीय मंडळींनाही कळाले आहे. अवैध धंद्यांची ही साखळी मोडीत काढण्यासाठी महिलांच्या आंदोलनाचा चांगला उपयोग होऊ शकेल. फक्त ही आंदोलने भरकटणार नाहीत किंवा कोणाच्या दावणीला बांधली जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे.

सोमवार, १४ सप्टेंबर, २००९

शेवटी "तिला' मिळाला न्याय

पालकांनी लहानपणीच लग्न लावून दिले. मात्र तीन महिन्यांतच पतीने छळ सुरू केला. त्याला कंटाळली असतानाच दुसरा एक पुरुष जीवनात आला. त्याच्या गोड बोलण्याला फसून त्याच्यासोबत गेली. तिला मुलगी होताच त्यानेही तिला टाकले. केवळ टाकलेच नाही, तर भटक्‍या समाजातील पन्नास वर्षांच्या एका व्यक्तीबरोबर लग्न लावून दिले. त्याच समाजातील एका महिलेला तिची दया आली. तिने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी न्यायालयात आणले. न्यायालयानेही सहृदयता दाखवून तिला "न्यायाधार' संस्थेच्या ताब्यात देऊन कायदेशीर लढाईचा मार्ग खुला करून दिला. अखेर त्याला यश आले आणि चार आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

ही करुण कहाणी आहे हडपसर (पुणे) येथील एका फसलेल्या युवतीची.
एप्रिल 2007 मध्ये नेवासे पोलिसांनी नगरचे तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी नारायण गिमेकर यांच्यासमोर एका अल्पवयीन मुलीला हजर केले. न्यायालयाने नेहमीच्या कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन तिची चौकशी केली अन्‌ त्या युवतीवर झालेल्या अत्याचारांची मालिका उघड झाली. या युवतीचे तिच्या पालकांनी बालपणीच तेथील एका व्यक्तीशी लग्न लावून दिले. मात्र सहा महिन्यांतच त्याने तिचा छळ सुरू केला. त्याचदरम्यान प्रकाश ज्ञानदेव गायकवाड (रा. मिरी, ता. पाथर्डी) याच्याशी ओळख झाली. त्याने तिची छळातून मुक्तता होण्यासाठी आपल्याबरोबर गावाकडे चलण्यास सांगितले. भोळ्या आशेने तीही तयार झाली. त्यानुसार ती मिरीला आली. सुमारे दीड वर्ष तेथे राहिली. त्यादरम्यान तिला एक मुलगी झाली. शेवगाव येथील एका रुग्णालयात तिचे बाळंतपण करण्यात आले. त्यानंतर गायकवाड याने ती मुलगी हिसकावून घेतली आणि त्या युवतीला रमेश मोतीराम काळे (रा. भेंडा, ता. नेवासे) या भटक्‍या समाजातील व्यक्तीच्या घरात सोडून दिले. तेथे ती आठ दिवस राहिली. त्यानंतर सोमनाथ गायकवाड याने धमक्‍या देऊन तिचा विवाह बळजबरीने किशोर मोतीराम काळे (वय 50) यांच्यासमवेत लावून दिला. ही घटना 17 एप्रिल 2007 रोजी घडली. ही गोष्ट त्याच समाजातील कलाबाई काळे हिच्या लक्षात आली. ती या युवतीला घरी घेऊन गेली. तिने त्या युवतीला नेवासे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तिला तेथील न्यायालयापुढे हजर केले. तत्कालीन मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. गिमेकर यांनी तिच्याकडे चौकशी सुरू केली, तेव्हा तिची कहाणी समोर येऊ लागली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी खुल्या न्यायालयातील कामकाज थांबवून चेंबरमध्ये तिची व्यथा ऐकून घेण्याचे ठरविले. त्यानुसार येथील न्यायाधार संस्थेच्या सचिव ऍड. निर्मला चौधरी आणि बालसुधारगृहाच्या महिला अधिकाऱ्यांनाही बोलावून घेतले. या दोन्ही महिलांनी तिची व्यथा ऐकली. तिला आधार दिला. तिच्या मूळ गावी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्री करण्यात आली. तिची नेमकी जन्मतारीखही समजली. त्यानुसार ती आता सज्ञान झाल्याचे स्पष्ट झाले. तिला आधार मिळाल्याने तिने ज्या लोकांनी फसविले त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यायची असल्याचे सांगितले.

त्यानुसार पाथर्डीच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी ऑगस्ट 2009 मध्ये येथील जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासमोर झाली. चार पुरुष व चार महिलांविरुद्ध खटला भरण्यात आला होता. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यातून चौघे पुरुष दोषी आढळून आले. त्यांना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली. महिला आरोपींविरूद्ध गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. तिला फसवून गावी आणणारा, विकण्यासाठी मदत करणारा त्याचा भाऊ, विक्रीसाठीचा मध्यस्थ आणि विकत घेऊन लग्न करणारा, अशा चौघांना शिक्षा देण्यात आली. मधल्या काळात न्यायाधार संस्थेच्या मदतीने त्या युवतीचेही पुनर्वसन झाले आहे. तिला आता एक चांगले घर मिळाले असून तिचा संसार सुखाने सुरू आहे.

तरुणांनो! डोकी शांत ठेवा


मिरजेतील दंगलीचे लोण आता सांगली, इचलकरंजी ते कोल्हापूरपर्यंत पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना घडलेल्या या घटनेचे अर्थातच आता राजकीय भांडवल केले जाऊ लागले आहे. त्यामुळे तरुणांची डोकी भडकावून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. भावना आणि अस्मितेचा मुद्दा पुढे करून तरुणांचे हात दंगलीसाठी वापरले जात आहेत. याचा संबंधित राजकीय व्यक्तींना लाभ होईल, अगर होणार नाही; मात्र यात अडकणाऱ्या तरुणांच्या भविष्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तरुणांनी डोकी शांत ठेवून याचा विचार करण्याची गरज आहे.

इतिहासातील अस्मिता जपलीच पाहिजे, त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ते करीत असताना वास्तवाचे भान आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टीही जोपासली पाहिजे. दंगलीमुळे कोणाचा राजकीय फायदा होत असला, तरी दंगल करणाऱ्यांचा फायदा नव्हे, तर तोटाच होतो. सर्वाधिक नुकसान होते ते तरुणांचे. आतापर्यंतच्या दंगली पाहिल्या, तर त्यात अल्पवयीन मुले आणि 18 ते 25 वयोगटांतील तरुणांचाच सहभाग अधिक असतो. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्यांमध्येही अशांची संख्या अधिक असते. खरे तर शिकण्याचे, करिअर करण्याचे हे वय; पण "दंगलखोर' म्हणून शिक्का पडल्याने शिक्षण आणि नोकरीवरही गदा येते. कोणाच्या तरी भडकावण्यावरून दगडफेकीसाठी हात उचलणे महागात पडते आणि पुढील आयुष्यापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

मिरजेच्या दंगलीचाही आता राजकीय वापर केला जाईल. त्याचा कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल, हे आताच सांगता येणे शक्‍य नसले, तरी त्यात अडकलेल्यांचे आणि सर्वसामान्यांचे मात्र नुकसान होणार हे निश्‍चित. अशा घटनांमध्ये चर्चेतून मार्ग काढणे शक्‍य असते. त्यासाठी पोलिस प्रशासन आणि समाजातील जाणत्या मंडळींनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे; परंतु ज्यांना अशा घटनांचा राजकारणासाठी वापर करायचा आहे, त्यांना यातून मार्ग काढणे अपेक्षित नसते. उलट त्याला खतपाणी घालण्याचे काम ही मंडळी करतात. त्यासाठी तरुणांची माथी भडकावून त्यांचे हात दंगलीसाठी वापरले जातात. राजकीय फायदा झाला, की हीच मंडळी तरुणांना विसरून जातात. सत्ता आणि राजकारणातील पदे मिळविताना तरुणांचा त्यांना विसर पडतो. ही गोष्टही विसरता काम नये.

जे हात विकासासाठी पुढे यायला हवेत, ज्या डोक्‍यांतून सुपीक कल्पना बाहेर येऊन विकासाचे नियोजन व्हायला हवे, ज्यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन देशाला दिशा देण्याची गरज आहे, अशी तरुण डोकी आणि हात दंगलीत अडकवून काय साध्य होणार आहे? मात्र, जोपर्यंत दंगलीसाठी असे हात आणि डोकी उपलब्ध होत आहेत, तोपर्यंत हे प्रकार घडतच राहणार. त्यामुळे आता तरुण पिढीनेच याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला इतिहास तर जोपासूच; पण नवा इतिहास रचण्यासाठीही प्रयत्न करू, असा विचारही केला जाऊ शकतो. सत्तेसाठी नकारात्मक राजकारणाचा अवलंब करणाऱ्या नेत्यांकडून काही अपेक्षा करता येणार नाही; मात्र विचारी तरुण पिढीने आपला गैरवापर तरी थांबविला पाहिजे, असाच विचार मिरजेतील दंगल थांबवू शकतो.
(eSAkal)

मंगळवार, ८ सप्टेंबर, २००९

आता आव्हान निवडणुकीचे!

गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच संपली असली, तरी पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडावा, अशी परिस्थिती नाही. कारण आता लगेचच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बदलती राजकीय स्थिती आणि मतदारसंघाचीही बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, या वेळची निवडणूकही वेगळी ठरणार आहे. त्यामुळे या काळात आणि नंतरही कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. यासाठी पोलिसांना निःपक्षपाती भूमिका घ्यावी लागणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कार्यकर्त्याकडून आपला वापर केला जाणार नाही, याची दक्षताही पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

निवडणूक यंत्रणेत पोलिसांची भूमिका मोठी असते. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बंदोबस्ताचे काम त्यांना करावे लागते. प्रचार सभांचा बंदोबस्त, महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, मतदानाच्या दिवशीचा बंदोबस्त, मोजणीच्या ठिकाणचा बंदोबस्त आणि संवेदनशील भागातील गस्त, ही पोलिस बंदोबस्ताची दृश्‍य कामे दिसून येतात; मात्र उपद्रवी व्यक्तींवर कारवाई, विरोधकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे कार्यकर्ते गुंतवून ठेवणे, सत्ताधाऱ्यांचे गुन्हे दडपणे, अशी अप्रत्यक्ष कामे पोलिसांकडून दबावापोटी केली जाऊ शकतात. तीच त्यांना अडचणीची ठरतात. अलीकडे तर सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकही पोलिसांचा वापर करून घेतात. एखादी किरकोळ गोष्ट मोठी करून आंदोलने करायची, हटवादी भूमिका घेऊन पोलिसांना कारवाई करायला भाग पाडायचे, असे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामध्ये खऱ्या-खोट्याच्या पडताळणीला आणि पोलिसांच्या सदसद्विवेक बुद्धीलाही तेथे फारसा वाव राहत नाही. जमावाला शांत करण्यासाठी म्हणून पोलिस कारवाई उरकून घेतात. दुसरीकडे सत्ताधारी मंडळी पोलिसांना आदेश देऊन हव्या त्या गोष्टी करवून घेतात. पोलिसांच्या बदल्या आणि कारवाईचे अधिकार राजकीय व्यक्‍तींच्या हातात असल्याने हे घडू शकते. यातूनच आपली पोलिस यंत्रणा ढिम्म बनत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीतही असे प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. पोलिसांचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोधकांना गारद करण्याचे राजकारण सध्या सुरू झाले आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, एकमेकांची प्रकरणे उकरून काढणे, त्यामध्ये हवी तशी कारवाई करण्यासाठी आग्रह धरणे, असे प्रकार केले जातात. पोलिस यंत्रणाही अशा प्रकारांना बळी पडत असल्याने राजकारण्यांचे धाडस वाढत आहे. म्हणूनच शिक्षकांच्या बदल्यांखालोखाल पोलिसांच्या, तेही पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय मंडळी हस्तक्षेप करीत असतात. निवडणूक काळात आपले कर्मचारी त्यांना मतदारसंघात हवे असतात, यातच सारे आले. जेव्हा राजकीय कसोटी लागते, तेव्हा या यंत्रणांचा गैरवापर होण्याची शक्‍यता जास्त असते. ती वेळ या वेळी आली आहे. इच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता, बंडखोरी वाढणार आणि बहुतांश ठिकाणी काट्याच्या लढती होणार, हे आता उघड झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत आणि नंतरही कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. आतापासूनच निःपक्ष पद्धतीने कारवाई केल्यास हे काम तुलनेत सोपे होईल, याचा पोलिसांना विचार करावा लागेल.