शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

सोशल व्हा; पण संकेत पाळून

ह त्यारे आणि शस्त्रांचा शोध लागला, तेव्हा ती माणसांना उपयुक्त ठरतील असे वाटले होते; मात्र त्यांचा वापर एकमेकांना मारण्यासाठीही केला जाऊ लागला. त्यामुळे कायदा करून शस्त्रांवर बंदी घालावी लागली. सार्वजनिक सण-उत्सव आले किंवा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्‍यता वाटली, की पोलिस शस्त्रबंदीचा आदेश जारी करतात. आता अशीच स्थिती सोशल नेटवर्किंग साईट आणि मोबाईलची होऊ पाहत आहे. हे नवे तंत्रज्ञान आपण स्वीकारले खरे; पण त्यांचा योग्य वापर करण्याचा विवेक अनेकांकडे नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आता या सोशल नेटवर्किंग साईट, अन्य संकेतस्थळे आणि मोबाईलवर बंदी घालण्याची वेळ येत आहे.
सध्या निर्माण झालेले तणावाचे कारणही या सोशल नेटवर्किंग साइट बनल्या आहेत. याशिवाय मोबाईल आणि अन्य संकेतस्थळांचाही यात समावेश आहे. त्यामुळे सरकारने 250 संकेतस्थळे बंद केली असून, मोबाईल "एसएमएस'वरही अनेक निर्बंध आणले आहेत. "रोगापेक्षा उपाय भयंकर,' अशी ही स्थिती दिसत असली, तरी ही स्थिती का ओढवली, याला जबाबदार कोण, याचाही विचार केला पाहिजे. संपर्कमाध्यमांचा वाढता प्रसार उपकारक ठरेल, असे मानले जात होते. त्यामुळे या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध धोरणे आखली. प्रत्यक्षात मात्र याचा गैरवापरच अधिक होत असून, आता सरकारसाठी ती नवी डोकेदुखी ठरली आहे.

खरे तर इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट वापरणारी मंडळी शिकलेली आहे. बहुतांश मंडळी तर उच्चशिक्षित आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या साइटचा चांगला वापर करण्याची अपेक्षा बाळगायला हरकत नाही. असे असूनही आपल्या ज्ञानाचा वापर करून या माध्यमांद्वारे अफवा पसरविणारे आणि ज्ञान गहाण ठेवून त्यावर विश्‍वास ठेवणारेही कमी नाहीत. हीच मोठी अडचण आहे. सोशल नेटवर्किंग साइटमुळे माहितीचे महाद्वार खुले झाले; पण त्यावर देण्यात येणाऱ्या माहितीवर नियंत्रण राहिलेले नाही. शिवाय ही माहिती खरी की खोटी, हे तपासून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही. त्यावर दिसते ती गोष्ट खरीच आहे, असे मानून भावना व्यक्त करणारेही कमी नाहीत. त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. या माध्यमांचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे. देशांतर्गत विघातक शक्तींसोबतच परकीय शक्तीही या शस्त्राचा गैरवापर करू लागल्या आहेत. ग्रामीण भागापर्यंतही याचे लोण पसरले आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी 25 टक्के लोक सोशल नेटवर्किंग साइटवर वेळ घालवितात. 8.8 टक्के लोक मनोरंजन, तर 8 टक्के लोक ई-मेलसाठी याचा वापर करतात, असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल हे माहिती पसरविण्याचे सर्वांत मोठे माध्यम भविष्यात एक मोठी समस्या बनू पाहत आहे. त्यावरून पसरविल्या जाणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. शिवाय, त्या माहितीचा जो-तो आपापल्या परीने अर्थ काढणार!

आसाममधील हिंसाचाराबद्दल तोडफोड करून तयार केलेली माहिती आणि छायाचित्रे या माध्यमातून पसरविली जात होती, त्याच वेळी ग्रामीण भागात आणखी एक अफवा पसरविली जात होती. देवीचा कोप झाल्याची आणि भूकंपाची अफवा रात्रभर पसरल्याने एके दिवशी अर्धा महाराष्ट्र जागा राहण्याचा प्रकारही मोबाईलच्या गैरवापरामुळेच घडला. शस्त्रपरवाने देताना संबंधित व्यक्तीचे चारित्र्य तपासले जाते, ते वापरण्याचे अनेक नियम आहेत. चुकीच्या व्यक्तीच्या हाती शस्त्र जाऊ नये, याची काळजी त्यातून घेतली जाते. प्रसारमाध्यमांचीही कायदेशीर नोंदणी केलेली असते, त्यांनाही आचारसंहिता ठरलेली असते. त्यामुळे काय माहिती प्रसारित करावी, याचे तारतम्य त्यांच्याकडे असते. सोशल नेटवर्किंग साइटद्वारे आणि एसएमएसद्वारे माहिती प्रसारित करणाऱ्यांच्या बाबतीत असे काहीच नसते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण कसे राहणार?
लोक सांगून सुधारत नसतील, तर आपल्याकडे कायद्याचा आधार घेतला जातो. त्यामुळेच अशा साइटवर बंदी घालण्याचे हत्यार सरकारने उपसले आहे. शस्त्रबंदी करावी, तशी आता या माध्यमांवर बंदी घातली जात आहे. हे प्रकार सुरूच राहिले, तर निवडणूक किंवा अन्य काळात जशी शस्त्रबंदी केली जाते, तशी सोशल नेटवर्किंग साइट आणि मोबाईलवर बंदी घालण्याची पद्धतच सुरू होईल. ते होऊ नये म्हणून या नवतंत्रज्ञानाचा विवेकाने वापर करणे अपरिहार्य ठरणार आहे. (सकाळ)

सोमवार, २० ऑगस्ट, २०१२

प्रेमदूत बनणार पोलिसांचा संदेशवाहक!


 विरहात तळमळणारी प्रेयसी... कबूतराच्या माध्यमातून चिठ्ठी पाठवून तिला सुखद दिलासा देणारा प्रियकर... हिंदी चित्रपटांमधील हा लोकप्रिय प्रसंग... मात्र, प्रेमाचा दूत ठरलेले कबूतर आता ओडिशामध्ये पोलिस विभागात दाखल होऊन संदेशाचे वहन करणार आहे. यापूर्वी चक्री वादळ आणि महापुरात याच कबूतरांनी संदेशवहनाची जबाबदारी सक्षमपणे राज्यात पार पाडलेली आहे. 

राज्यातील कटक आणि अंगूल या जिल्ह्यांत दीडशे कबूतरांचे पथक आहे. देशाचा स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन आणि काही विशेष कार्यक्रमांसाठी या कबूतरांना आकाशात उडविले जाते. यापैकी अंगूलकडे 50 आणि कटक जिल्ह्यात शंभर कबूतरे आहेत. राजधानी भुवनेश्‍वर ते कटक एवढे अंतर पार करण्यासाठी कबूतरांना केवळ 17 ते 25 मिनिटे लागतात. व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास मुसळधार पाऊस आणि प्रतिकूल हवामानातही कबूतर केवळ 12 मिनिटांत जाऊ शकते, तसेच मूळ स्थानी परत येऊ शकते. यातील हुशार कबूतरांना व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यास शहरातील विशिष्ट ठिकाणी ती संदेश घेऊन जाऊ शकतात. पर्यटकांचे आकर्षण असलेली जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी रथयात्रा, बालासूर येथील क्षेपणास्त्र प्रकल्प यांच्या सुरक्षेसाठी या कबूतरांचा उपयोग केला जाऊ शकतो.

ई-मेल, एसएमएस, दूरध्वनी आणि मोबाईलच्या काळात कबूतरांच्या पथकांचा पारंपरिक पद्धतीने वापर करण्याच्या प्रयोगामुळे लोकांना आश्‍चर्य वाटू शकते. मात्र, या संदर्भात मुख्यमंत्री नवीन पटनाईक स्वतः विशेष आग्रही आहेत. या कबूतरांविषयी ते अतिशय आश्‍वासक आहेत. त्यामुळे पोलिस खात्यात कबूतरांच्या पथकांचा संदेशवहनसाठी समावेश करण्याचे आदेश त्यांनी दिले, असे या पथकाचे वरिष्ठ अधिकारी निहाल बिस्वाल यांनी सांगितले.
पायाला बांधलेला संदेश तब्बल सातशे ते आठशे किलोमीटरवर योग्य ठिकाणी नेण्याची कबूतरांची क्षमता आहे. मात्र, केवळ पाच लाख रुपये वाचविण्यासाठी कबूतरांच्या माध्यमातून राबविली जाणारी सेवा बंद करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात कबूतरांच्या सक्रियतेचा मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1948 मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांच्या दौऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्यासाठी संदेश पाठविण्याच्या कामात याच कबूतरांचा वापर करण्यात आला होता. 1999 मध्ये आलेल्या चक्री वादळानंतर दळणवळण आणि दूरसंचार यंत्रणा ठप्प झाल्यावर राज्याच्या सागरकिनारी भागांची खबरबात कबूतरांनीच राजधानीत कळविली होती. राज्याला 1982 मध्ये महापुराने वेढले होते. माहिती कळविण्यासाठी सर्व आधुनिक यंत्रणा अक्षम ठरल्या असताना कबूतरांनी महत्त्वाची भूमिका वठविली होती. (सकाळ)