केवळ हुंडा मागणे हा गुन्हा नसून शिक्षा होण्यासाठी शारीरिक, मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचे सिद्ध करता आले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
""भारतीय दंडविधानातील 498 अ किंवा 304 ब कलमान्वये केवळ हुंडा मागणे गुन्हा नाही. या कलमान्वये शिक्षा होण्यासाठी पती किंवा सासरच्या नातेवाइकांनी विवाहितेला क्रूर आणि अमानवी वागणूक दिल्याचे सिद्ध करता आले पाहिजे,'' असे निकालात नमूद करण्यात आले आहे. न्यायाधीश आर. एम. लोढा आणि न्या. ए. के. पटनाईक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. नेमक्या कशा पद्धतीने क्रूर वागणूक दिली आहे, याचे वर्णन न करता केवळ "छळ', "अमानुष' असे शब्दप्रयोग वापरणे शिक्षेसाठी पुरेसे ठरणार नाही, याकडेही खंडपीठाने लक्ष वेधले.
हुंडाबळीच्या गुन्ह्यात सासरच्या सर्व मंडळींना सरसकट अडकविण्याची वृत्ती बनली आहे, त्यावरही खंडपीठाने चिंता व्यक्त केली. ""या वृत्तीला रोखले पाहिजे. केवळ पतीचा नातेवाईक म्हणून नव्हे तर विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आहेत, म्हणूनच नातेवाइकांविरुद्ध गुन्हा नोंदविला पाहिजे,'' असे सांगून खंडपीठाने इशारा दिला, की असेच प्रकार चालू राहिले तर खऱ्या आरोपींविरुद्धचा खटला कमकुवत होऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा