हा निर्णय तसा चांगला वाटतो. पण त्यातून महसूल यंत्रणेला एक नवे कुरण उपलब्ध होईल, आणि लोकांनाही जादा खर्च आणि वेळ द्यावा लागेल. त्यातून असेही काही किस्से घडतील.....
एक
चांगली दहा-बारा स्थळे पाहून झाल्यावर सखाराम तात्याच्या मुलीचे लग्न जमले. लग्नसराई संपत आल्याने जवळचाच मुहुर्त पकडला. तालुक्याच्या गावातील मंगल कार्यालयही सुदैवाने मोकळे असल्याने लगेच बूक करून टाकले. आता आठवड्यात सगळे आवरायचे होते. आधी लग्नपत्रिका छापायला टाकू म्हणून त्यांनी छापखाना गाठला. पत्रिकेचा मजकूर त्याच्या हातात दिला. तर छापाखानावाला म्हणाला ""तहसिलदारांचा दाखला कुठय?'' आता ही काय नवीन भानगड म्हणून तात्याने प्रश्न केला. तेव्हा छापखानावाल्याने त्याला मंत्र्याचा नवा आदेश समजावून सांगितला.
सखाराम तात्याने मग वेळ न दवडता तहसिल कार्यालय गाठले. तेथे सात-आठ टेबल फिरल्यावर हे काम ज्या भाऊसाहेबाकडे आहे, त्याच्यापर्यंत तो पोचला. सखाराम तात्याने त्याला त्याचे काम सांगितले. त्यावर भाऊसाहेबाने त्याला तलाठ्याचा दाखला आणला का? असा प्रश्न विचारला. सखाराम तात्या पुन्हा गोंधळात पडला. त्यावर त्या भाऊसाहेबाने समजावण्याच्या सुरात सांगतिले. "" तुमच्या गावात जायचे. मुलामुलींच्या जन्माचे दाखल घेऊन तलाठ्याकडे जायचे, त्याच्याकडून ते दोघेही सज्ञात असल्याचा दाखला आणायचा. मग येथे येऊन हा अर्ज भरायचा. त्यासोबत पाच रुपयांचे चलन बॅंकेत भरून ते अर्जाला जोडायचे. या टेबलवर जमा करून पुढच्या आठवड्यात येऊन दाखला घेऊन जायचा.''
ही प्रक्रिया ऐकून सखाराम तात्या खालीच बसला. ""अहो पुढच्या आठवड्यात तर लग्नाची तारीख आहे. पत्रिका छापायच्या कधी अन् वाटायच्या कधी'' असा प्रश्न न कळत सखारामने केला. त्यावर भाऊसाहेब तर उखडलेच, "" मग कशाला करता लग्न, आम्ही आलो होता का पोरांची लग्न करा म्हणून अग्रह करायला. एवढी घाई होती तर आधीच दाखले काढून ठेवायचे''. हे ऐकून तर सखाराम आणखी गडबडला. लग्न जमविण्यासाठी करावी लागलेली धावपळ अन् कार्य पार पाडण्यासाठी आणखी करावी धावपळ त्याच्या डोळ्यासमोर आली. त्यामुळे काकुळतीला येऊन तो म्हणाला, ""भाऊसाहेब काही तरी मार्ग काढा, फारच अवघड झालय बघा.'' हे ऐकून भाऊसाहेब जरा थंड झाले. ""किती हुंडा दिला?'' भाऊसाहेबांचा प्रश्न. "" दिला की सव्वा लाख अन् पाच तोळं'' सखारामचे उत्तर. ""अरे वा, चांगलेच पैशावाले दिसता? जरा खिशात हात घाला, आजच काम होईल'', भाऊसाहेबांचा सल्ला. आता सखारामचा नाईलाज होता. त्याने तो मान हलवून मान्य केला. मग भाऊसाहेबांनी शिपायाला बोलावून "यांना समजावून सांग' असे सांगितले.
शिपाई व सखाराम तात्या बाहेर गेले. चहाच्या दुकानात जाऊन दोघांनी अर्धाअर्धा कप चहा घेतला. चहाचे पैसे देताना सखारामचा एक हात चहावाल्याकडे गेला तर दुसरा त्या शिपायाकडे. शिपायानेही आपला हात पुढे केला नंतर स्वतःच्या खिशात घातला. नंतर शिपाई एकटाच आत गेला. थोड्यावेळाने परत आला. त्याच्या हातात एक कागद होता. त्याने सखारामकडे दिला. सखारामने एकदा तो कपाळाला लावला नंतर छातीशी नेला अन् घडी करून खिशात ठेवून तो लगबगीने छापखान्याच्या दिशने रवाना झाला.
दोन
लग्न जमविण्यासाठीची बैठक सुरू होती. देण्याघेण्याची आणि मानपानाची बोलणी पूर्ण झाली. दोन्ही पक्षांना ती मान्य झाली. मात्र, नवरा व नवरी मुलीच्या वयाचे दाखले काढण्याचे काम वधुपक्षानेच करावे असा वरपक्षाचा अग्रह होता. तर वधुपक्ष हे काम ज्याने त्याने करावे अशा मताचा होता. याला वर पक्षाचा विरोध होता. लग्न मुलीकडच्यांनी करून देण्याची आपली प्रथा आहे. त्यामुळे दाखले काढण्याचे कामही मुलीकडच्यांनी केले पाहिजे असा त्यांचा अग्रह होता. वधुपक्ष याला लग्नाचे काम मानायला तयार नव्हता. हुंडा आणि मानपानावरून झाली नाही एवढी ताणाताणी या विषयावर सुरू होती. शेवटी लग्न मोडण्याची वेळ आली. त्यामुळे नाईलाजास्तव वधुपक्षाला ही मागणी मान्य करून नवरा-नवरीच्या वयाचे दाखले व तहसिलदारांची परवानगी काढून देण्याचे काम स्वीकारावे लागले.
तीन
आदिवासी पाड्यातील किसनाने त्याच्या मुलीचे लग्न जमविले होते. पण ती वयाने लहान. त्यामुळे वस्तीवरच्यांनी शंका काढली. लग्नात विघ्न नको. वयाचा दाखला काढला पाहिजे. त्यामुळे किसना तहसिल कार्यालयात आलेला होता. आतल्यापेक्षा बाहेरच जास्त गर्दी होती. हातात बॅग घेऊन झाडाखाली बसलेल्या एका माणसाभोवती बरीच गर्दी झाली होती. तो माणूस कागदावर काही तरी लिहून लोकांना देत होता व पैसे घेत होता. काय प्रकार आहे म्हणून किसना तेथे जाऊन डोकावला. तेथे त्याच्या गावातील एक जण भेटला. ""का रं किसना? काय काम आणलं''? कोणी तरी भेटल्याचे पाहून मार्ग सापडल्याच्या आशेने किसना बोलता झाला."" पोरीच लगीन काढलया. पण त्यो नवा दाखला काय म्हणत्यात त्यो लागतो. कुठ मिळन बर?'' किसनाची खरी हकीगत कळाल्यावर तो माणूस त्याला झाडाखालच्या त्या एजंटाकडे घेऊन गेला. मुलगी अल्पवयीन असली तरी ती सज्ञात असल्याचा दाखला देण्याची व्यवस्था तेथे होती. खरं वय असलेला मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला जोडायचाच नाही. त्यापेक्षा मुलगी शाळेतच गेली नाही, असे दाखवायचे. वयाचा पुरावा म्हणून सरकारी डॉक्टराचा दाखला आणायचा की, झालं काम. यासाठी एकूण खर्चाचा अंदाज घेत किसनाने नाईलाजाने मान हलविली. खिशात हात गेले. यंत्रणा कामाला लागली. मुलगी गावाकडेच, वयाचा दाखला शाळेत, तरीही किसनाचे काम झाले.
चार
आपल्या नव्या आदेशाचा काय परिणाम झाला म्हणून मंत्री काही वर्षांनी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. आदिवासी भागात नव्याने जन्मलेली मुले पाहिली. त्यांना वाटले आता मुले नक्कीच गुटगुटीत जन्मली असतील. पण पाहतात तर काय बहुतांश घरात कुपोषित मुले! शाळेतल्या मुली वाटाव्यात तशा त्यांच्या आई! हे काय झाले. आपल्या आदेशानंतर काम का झाले नाही? याची पाहणी करण्यासाठी त्यांनी थेट तहसिलदार कार्यालय गाठले. तेथे बाहेरच एजंटांची गर्दी. प्रत्येकजण उभा आडवा सुटलेला. त्यांच्या अंगावर आणि अंगातही बाळसे दिसून येत होते. तीच परिस्थिती आतील भाऊसाहेब आणि शिपायांची! आता यावर वेगळाच काही तरी उपाय केला पाहिजे, असे म्हणत मंत्र्यांनी सरकारी रुग्णालय गाठले. तेथे डॉक्टरपासून नर्सपर्यंत सगळेच बाळसेदार! आतील खाटांवर मात्र कुपोषित बालके मरणासन्न अवस्थेत पडलेली. बाजूला लग्न आणि दाखल्यात पैसे गेल्याने कंगाल झालेले त्यांचे पालक सुन्न अवस्थेत बसलेले. आपल्या आदेशामुळे कोणाचे पोषण झाले याचा उलगडा मंत्र्यांना झाला आणि यंत्रणेतील हा दोष दूर करण्याच्या इराद्याने ते रुग्णालयाबाहेर पडले.
४ टिप्पण्या:
yes, he asech honar.
khoop sunder lekh aahe....aawadala.....!!! Kitti tari changalya yojana vaaya jatat ashaa..nai...!!!
अप्रतिम लिहिलं आहेत..
फक्त "आपल्या आदेशामुळे कोणाचे पोषण झाले याचा उलगडा मंत्र्यांना झाला आणि यंत्रणेतील हा दोष दूर करण्याच्या इराद्याने ते रुग्णालयाबाहेर पडले"
हा शेवटचा उल्लेख खटकला. दुर्दैवाने हे असं कधीही होणे नाही.. उलट मंत्रीही त्यात आपला वाटा मागायला जातील.. :(
मंत्र्यांनी स्वत:साठी एक नविन कुरण बनवलय की काय ?
छान लिहिलत.... नेहमी सारखच उद्बोधक
टिप्पणी पोस्ट करा