बुधवार, २९ एप्रिल, २००९

मध्यस्थी केंद्र "तंटामुक्ती'ला पूरकच


राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेत दावे मिटविताना दिवाणी दावे निकाली काढण्याचा मोठा प्रश्‍न होता. वैकल्पिक वाद निवारणांतर्गत सुरू करण्यात आलेल्या मध्यस्थी केंद्रामुळे हे काम सोपे होणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या कामाचा प्रसार आणि प्रचार होण्याची गरज आहे. ग्रामपातळीवरील तंटामुक्त गाव समित्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास त्यांचे काम सोपे होईल.
एका खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या वैकल्पिक वाद निवारणाची पद्धत सुरू झाली. दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 89 नुसार कोणत्याही तंट्यामध्ये दोन्ही बाजूंची संमती असेल, तर न्यायालयाला विनंती करून हा वाद तडजोडीने मिटविला जाऊ शकतो. मध्यस्थी केंद्रामार्फत वादाचे कारण संपुष्टात आल्यावर दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाल्यास दावा निकाली काढता येतो. मध्यस्थी केंद्रात समझोता झाल्यावर हे प्रकरण न्यायालयात मान्यतेसाठी पाठवून तेथून त्यावर शिक्कामोर्तब करून घेण्यात येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने वाद मिटतो.
राज्य सरकारच्या तंटामुक्ती मोहिमेतही अशीच पद्धत सांगण्यात आली आहे. पोलिसांच्या पुढाकारातून फौजदारी स्वरूपाच्या खटल्यांमध्ये तडजोड घडविण्याचे काम सुरू असले, तरी दिवाणी दाव्यांच्या बाबतीत मात्र हे प्रमाण कमी आहे. मुख्य म्हणजे या मोहिमेत तडजोड घडविण्याचे काम गावपातळीवर होते. गावातीलच मंडळी असल्याने पक्षकार त्यांचे ऐकतीलच असे नसते. नव्याने सुरू झालेल्या मध्यस्थी केंद्राच्या बाबतीत मात्र तेथील सर्व मध्यस्थ तटस्थ असतात. शिवाय ते प्रशिक्षित असल्याने यशस्वी मध्यस्थी घडवून आणण्यात त्यांना यश येते. कायद्याचेही पाठबळ त्यांना आहे. त्यामुळे ग्राम समित्यांपेक्षा हे केंद्र प्रभावी ठरणार आहे.
तंटामुक्तीच्या मोहिमेत याचा वापर करून घेण्याची गरज आहे. गावपातळीवर तडजोड होऊ न शकलेली दिवाणी प्रकरणे समितीनेच पुढाकार घेऊन या केंद्रात पाठविण्यास प्रतिसाद वाढण्यास मदत होईल. त्यासाठी जिल्हा ते गाव पातळीवरील तंटामुक्ती समितीच्या बैठकांमधून या केंद्राच्या कार्याचा प्रसार होण्याची व त्याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे या केंद्रानेही आपल्या कामकाजातून लोकांचा विश्‍वास संपादन करण्याची गरज आहे.

मुद्रांक शुल्क वाचणार
दिवाणी दाव्यात नुकसान भरपाई मागताना विशिष्ट रकमेचे मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्याशिवाय दावा चालविता येत नाही. शिवाय निकाल काय लागला, हे माहिती नसते. मध्यस्थी केंद्रामार्फत तडजोड होऊन दावा मिटविल्यास पूर्वी भरलेले मुंद्राक शुल्क परत देण्याचीही योजना आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मागण्यासाठी होणारा हा खर्चही वाचणार आहे.

बुधवार, १५ एप्रिल, २००९

दागिन्यांना पॉलिशचा मोह पडतो महागात!


महिलांना नव्या दागिन्यांचा जसा मोह असतो, तसाच जुने दागिने चमकविण्याचाही. त्यामुळे दारावर पॉलिश करून देण्याच्या आमिषाने येणारे भामटे त्यांना सहजगत्या फसवू शकतात.वारंवार असे प्रकार घडूनही महिलांनी त्यातून बोध का घेऊ नये?

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचेही प्रकार सातत्याने घडतात; मात्र त्यात पकडल्या जाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यांचे नाव-गाव तर दूरच; त्यांचे वर्णनही महिलांना सांगत येत नाही. त्यामुळे एका ठिकाणी गुन्हा करून गेलेली ही टोळी काही अंतरावर पुन्हा "शिकार' गाठते. घरात एकट्या असलेल्या गृहिणींना लक्ष्य केले जाते. सुरवातीला छोट्या भांड्यांना पॉलिश करून दाखविले जाते. त्यासाठी माफक रक्कम आकारली जाते. नंतर आजी, मावशी, मॉं, आत्या या विशेषणांद्वारे भामटे जवळीक साधतात. विश्‍वास बसल्याची जाणीव झाली, की देवघरातील चांदीची एखादी वस्तू मागवून ती मोफत पॉलिश करून दाखवितात. "सोन्याचे दागिनेही आम्ही चांगले पॉलिश करून देतो', असे ते सांगतात. महिला विश्‍वासाने त्यांच्याकडे दागिने पॉलिशसाठी देतात. ते पातेल्यातील हळदीच्या पाण्यात दागिने टाकतात. साफ करीत आहोत, असे दाखवितात. त्या वेळी त्यांच्या गप्पांना बहर येतो. थोड्या वेळाने ते पातेले गॅसवर ठेवण्यास सांगितले जाते. "पाणी उकळू लागले, की पातेले खाली उतरवा', असे सांगून भामटे निघून जातात.
थोड्या वेळाने ती गृहिणी पातेले खाली उतरवते, तेव्हा त्यात दागिने नसल्याचे दिसून येते. दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने त्यांनी दागिने कधी काढले, ते गृहिणींच्या लक्षातही येत नाही.
अशाप्रकारे गुन्हे करणारे राजस्थान, ओरिसा, बिहार भागातील भामटे आहेत. काही बंगाली कारागिरांचाही सहभाग असल्याचे पोलिसांना आढळले आहे. थोडी-फार मराठी भाषा त्यांना येत असते. त्यामुळे हिंदी- मराठीद्वारे ते संभाषण करतात. बऱ्याच वेळा गुन्हा करताना दोघे जण असतात. एका ठिकाणी गुन्हा केल्यावर लगेचच दुसऱ्या लांबच्या भागात ते रिक्षाने किंवा दुचाकीवरून पलायन करतात. स्थानिक सराफी व्यावसायिकांकडे दागिने विकले जातात. त्यामुळे मुद्देमाल हस्तगत करणेही कठीण जाते.
प्रत्येक वेळी साथीदार बदलत असल्यामुळे "रेकॉर्डवर' फार थोडे गुन्हेगार येतात. महिलांकडून वर्णन व्यवस्थित सांगितले जात नसल्यामुळे रेखाचित्र तयार करण्यावर पोलिसांना मर्यादा येतात. शिवाय, लुटल्या गेलेल्या सर्वच महिला पोलिसांकडे तक्रार देत नाहीत. काही वेळा पोलिस संशयित पकडतात, तेव्हा ओळख पटविण्यासाठी फसवणूक झालेल्या महिलांना बोलाविले जाते; परंतु "झंझट' नको म्हणून त्या पोलिसांना मदत करणे टाळतात, असा पोलिसांचा अनुभव आहे. आपण फसले गेलो आहोत, हे समजल्यावर पती किंवा घरचे लोक ओरडतील, या भीतीनेही अनेक महिला फिर्याद देत नाहीत. बऱ्याचदा त्या घटनेची वाच्यताही करीत नाहीत. दागिना मोठा असेल किंवा पर्याय नसेल, तेव्हा मात्र पोलिसांकडे त्वरित तक्रार दिली जाते, असाही अनुभव आहे; मात्र त्याचा मोठा फायदा भामट्यांना होतो.
दागिन्यांना पॉलिश करून घ्यायचे असेल, तर विश्‍वासू सराफाकडे जा. स्वतः उभे राहून दागिने पॉलिश करून घ्या. दारावर कोणी आले, तर त्यांच्याकडून पॉलिश करून घेताना लुटले जाण्याची जोखीम आहे, ती ओळखून खबरदारी घ्या, अन्यथा दागिने गमवावे लागण्याची शक्‍यता आहे. या गोष्टी महिलांनी लक्षात ठेवल्या, तरी फसवणुकीचे प्रमाण कमी होईल.

बुधवार, ८ एप्रिल, २००९

वाढत्या तापमानामुळे आगीचा धोका!


14 एप्रिल हा अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. 14 एप्रिल 1944 मध्ये मुंबईत एका जहाजाला आग लागली होती. ती विझविताना अग्निशानक दलाचे 66 जवान मरण पावले. तेव्हापासून हा दिवस अग्निशमन दिन म्हणून पाळला जातो. 14 ते 20 एप्रिल या सप्ताहात आगी विषयी लोकांमध्ये प्रबोधन करणारे उपक्रम राबविले जात असतात. ठिकठिकाणच्या अग्निशामक दलातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. त्या निमित्त....
जागतिक तापमानवाढीमुळे सध्या उन्हाळ्यात पारा चाळीसच्या आसपास स्थिरावत आहे. या काळात आगीचा धोकाही मोठा असतो. थोडासा निष्काळजीपणाही मोठी दुर्घटना ओढवून घेऊ शकतो. आग टाळण्यासाठी नागरिकांनीच दक्षता घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
आग कशी टाळावी, लागल्यास ती आटोक्‍यात आणण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी लोकांनी काय केले पाहिजे, याची सर्वांनाच माहिती हवी.
विद्युत उपकरणांमध्ये होणारे शॉर्ट सर्किट, ध्रूमपान आणि गॅस हाताळण्यातील निष्काळजीपणा, ही आगीची प्रमुख कारणे आहेत. घरगुती आगी गॅसमुळे आणि व्यापारी आस्थापनांच्या आगी शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची जास्त उदाहरणे आहेत. यातील अनेक घटना टाळता येण्यासारख्या असतात; मात्र त्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही.
वाढत्या अतिक्रमणांमुळे बहुतांश ठिकाणे अशी असतात, की तेथे अगीचा बंब जाऊ शकत नाही. वाहतुकीची कोंडी आणि अतिक्रमणांमुळे वाहन जाण्यास उशीर लागतो. सायरन वाजवीत जाणाऱ्या आगीच्या बंबालाही रस्ता न देण्याची बेपर्वाई अनेक वाहनधारकांकडे दिसून येते.

कशी लागते आग?
- विद्युत उपकरणांतील बिघाड
- स्वयंपाकाच्या गॅसची गळती
- ज्वलनशील पदार्थांचे वाढते तापमान
- दिवा किंवा तत्सम ज्योतींसंबंधी निष्काळजीपणा
- दोन वस्तूंच्या घर्षणातून पडणाऱ्या ठिणग्या
- गवतात पडलेल्या सिगारेटचे थोटूक अगर झाडांच्या घर्षणातून लागणारा वणवा

काय दक्षता घ्यावी ?

- विद्युत उपकरणांची नियमित तपासणी
- चांगल्या प्रतीची उपकरणे वापरणे
- गॅस सिलिंडर, शेगडी व पाइप यांची देखभाल
- गॅस सिलिंडर उष्णतेपासून दूर ठेवावा
- ज्वलनशील पदार्थ विजेच्या तारा व उपकरणांपासून दूर ठेवावेत

आग लागल्यास
- गॅस गळती झाल्यास दारे-खिडक्‍या उघडाव्यात
- विद्युत उपकरणे वापरू नयेत.
- गॅसची ज्योत पेटलेली असल्यास पीठ किंवा अन्य कोरडे पदार्थ टाकून ती मिटविण्याचा प्रयत्न करावा.
- परिसरातील लोकांना मदतीला बोलवावे
- अग्निशमन दलाशी संपर्क साधावा
- दूरध्वनी ः 101.

शनिवार, ४ एप्रिल, २००९

वकिलाचा भरदिवसा खून


मालमत्तेच्या लोभ कोणाला सुटलाय? त्यासाठी स्वकीयांचा खून करण्याच्या घटना अनेकदा घडतात. तशीच एक घटना नगरमध्ये घडली; मात्र यामध्ये नातलग महिलेने पुढाकार घेतल्याची अन्‌ सुपारी देऊन जवळच्या नात्यातील एका ज्येष्ठ वकिलाचाच खून केल्याची घटना घडली आहे. तिच्यासह तिचा पती आणि सुपारी घेतलेले दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
ऍड. पीटर रतन साळवी. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेले. मुलगा पोलिस दलात अधिकारी. मुलींची लग्न झालेली. पत्नीने मध्येच साथ सोडून इहलोकीची यात्रा संपविलेली. त्यामुळे साळवी सध्या आयुष्याची संध्याकाळ नगरच्या प्रकाशपूर भागातील आपल्या बंगल्यात एकटेच घालवीत होते. घरकाम करण्यासाठी एक मोलकरीण होती. इतर वेळी बंगल्यात ते एकटेच. पानसवाडी (ता. नेवासे) हे त्यांची मूळ गाव. तेथे त्यांची जमीन होती. ती विकून टाकण्याचा त्यांचा बेत होता. काही दिवसांपूर्वी त्यातील काही जमीन त्यांनी विकलीही; पण तीच त्यांचा घात करणारी ठरली.
अभिजित साळवी हा त्यांच्या चुलतभावाचा मुलगा. त्याने प्रेमविवाह केलेला. अभिजित कौर ही त्याची पत्नी. त्यांनीही या जमिनीवर हक्क सांगितलेला. त्यामुळे जमीन विकण्यास त्यांचा विरोध. अशाही स्थितीत जमीन विकल्याने दुखावलेल्या अभिजित आणि हरजित कौर यांनी साळवी यांचा खून करण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. काम झाल्यावर सोनईत पैसे देण्यात येणार होते. सुपारी घेणारे साळवी यांच्याकडे कामाला होते.
खुनाची सुपारी घेतल्यानंतर आरोपी वायदंडे व वारुळे हे 29 एप्रिल सकाळीच साळवी यांच्या घरी आले; मात्र तेव्हा तेथे मोलकरीण होती. त्यामुळे "चर्चा करायची असून, नंतर येतो,' असा निरोप देऊन ते गेले. त्यानंतर ती दुचाकी घेऊन ते गंज बाजारात गेले. तेथून एका दुकानातून त्यांनी घास कापण्यासाठीचा विळा व सुती दोरी घेतली आणि दीडच्या सुमारास पुन्हा साळवी यांच्या घरी आले. तेथे त्यांनी त्यांच्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबला. त्यांचा आवाज आल्यानंतर शेजारचे लोक धावून आले, तर पुढील दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे शेजारचे लोक मागील दाराकडे धावले. तेवढ्यात एक जण तेथून पळून जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांना आरोपींची नावे मिळत गेली. घटनेनंतर पोलिसांनी या सर्वांकडे लक्ष केंद्रित केले असता, हे सर्व जण बाहेरगावी गेल्याचे आढळून आले. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला. वायदंडे व वारुळे यांना इंदापूर तालुक्‍यात अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ इतर दोघांनाही अटक झाली.