शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

रात्रच नव्हे, दिवसही चोरांचा...


दिवसा होणाऱ्या घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोऱ्या, पळवून नेऊन होणारी लूटमार, असे गुन्हे सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. सणासुदीच्या तोंडावर ही गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे. चोऱ्या रात्रीबरोबरच दिवसाही होऊ लागल्या आहेत. जिल्ह्याचा विस्तार, लोकसंख्या आणि त्या तुलनेत असलेले मनुष्यबळ लक्षात घेता, जनतेच्या संरक्षणासाठी पोलिस पुरेसे ठरू शकत नाहीत. रात्री-अपरात्री मदतीला धावून येणे दूरच, दिवसाही पोलिसांची वेळेत मदत मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. सणासुदीच्या दिवसांत चोऱ्या आणखी वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन नागरिकांनीच दक्षता घेण्याची गरज आहे. त्यातच यावर्षी दिवाळीच्या आगेमागेच मुख्यमंत्र्यांचा आणि राष्ट्रपतींचा दौरा असल्याने पोलिस त्यांच्या बंदोबस्तात गुंतलेले राहतील.

जिल्ह्यात सध्या घरफोड्या वाढल्या आहेत. चोऱ्या आणि घरफोड्या दिवसाही सुरू आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि वाहनांच्या चोऱ्या तर प्रयत्न करूनही पोलिसांना थांबविता येत नसल्याचे दिसून येते. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. मौल्यवान ऐवज, रोख रक्कम यांचे व्यवहार वाढले आहेत. याचा गैरफायदा चोर उठवतात. बाजारात खरेदीसाठी गेलेल्यांचे पैसे चोरणे, दागिने चोरणे, प्रवासात बॅगा चोरणे, वाहने अडवून चोऱ्या, असे प्रकार सुरू आहेत. पाळत ठेवून चोऱ्या करणाऱ्या टोळ्याही कार्यरत झाल्या आहेत.

दिवसाच्या घरफोड्याही पाळत ठेवून केल्या जात आहेत. घरातील लोक बाहेर गेले, की अवघ्या काही वेळात चोर घर साफ करून जातात. असे अनेक प्रकार नगरमध्ये घडले आहेत. हे गुन्हे एवढ्या सफाईदारपणे केले जातात, की इमारतीत राहणाऱ्या इतरांना याची चाहूलही लागत नाही. नागरिकांचा निष्काळजीपणा आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती याला कारणीभूत ठरते. त्यामुळे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अगर विक्रेता म्हणून इमारतीत आलेले भरदिवसा चोऱ्या करून जातात.

दिवाळीच्या सुटीत घरफोड्यांचे गुन्हे वाढत असल्याचा अनुभव आहे. सुटीसाठी नागरिक घर बंद करून गावाला जातात. अशा वेळी दीर्घ काळ बंद असलेली घरे शोधून तेथे चोऱ्या करणाऱ्या टोळ्या कार्यरत होतात. रात्री किंवा भरदिवसाही अशा घरांवर चोरटे डल्ला मारून जातात. सुटीनंतर घरमालक परत आल्यावरच या अशा घटना उघडकीस येतात. त्यामुळे त्यांचा तपास लागणेही दुरापास्त होते.
सणासुदीच्या दिवसांत लोक दागिने आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या अशा वस्तूही या काळात घरी आणल्या जातात. मात्र, सणाच्या गडबडीत त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. बाजारात खरेदीसाठी गेल्यावरही नागरिकांच्या गहाळपणाचा फायदा चोर उठवत असतात. त्यामुळे सदासर्वदा सावधानता पाळण्याची गरज असते. मौल्यवान वस्तूची खरेदी करण्यासाठी एकट्याने जाऊ नये, त्या वस्तू सुरक्षितपणे घरी येतील याची काळजी घ्यावी.

 बाजारात आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या हालचालींवर, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे, विनाकारण ओळख वाढवून बोलू पाहणाऱ्या आणि आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहावे. सुटीला जाताना घर व्यवस्थित बंद करून घ्यावे. चांगल्या दर्जाची मजबूत कुलपे वापरावीत. दाराचे कडी-कोयंडे बनविताना शोभेपेक्षा मजबुतीवर भर द्यावा. खिडक्‍या, झरोके, मागील दरवाजे यांना लोखंडी जाळ्या बसवून घ्याव्यात. त्यांचीही दारे मजबूत असावीत आणि घर बंद करून जाताना अगर रात्री झोपताना ती व्यवस्थिती बंद केल्याची खात्री करून घ्यावी. शक्‍यतो घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, नोकर ठेवताना त्याची पूर्ण माहिती आणि पूर्वइतिहास जाणून घ्यावा. अनोळखी व्यक्तींकडे आपल्याकडील संपत्तीचे विनाकारण प्रदर्शन करू नये. प्रवासात अनोळखी प्रवाशावर विश्‍वास ठेवू नये, अशा काही गोष्टी नागरिकांनीच पाळल्या तर अप्रिय घटना घडण्यास आळा बसेल. सणासुदीचा आनंद तर लुटलाच पाहिजे; पण त्या काळात आपली लूट होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. रात्रीच नव्हे, तर दिवसाही चोरांपासून सावध राहण्याची वेळ आली आहे! (सकाळ)

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२

त्यांनाही माणूस म्हणून जगायचंय

आ धी जंगलचे राजे, राज्याचे सीमारक्षक म्हणून जगलेल्या आदिवासी फासेपारधी समाजावर ब्रिटिशांच्या काळात गुन्हेगारीचा शिक्का बसला. ब्रिटिश जाऊन 65 वर्षे लोटली, तरी त्यांच्यावरील हा शिक्का पुसला जात नाही. त्यांच्या पिढ्यान्‌पिढ्या हाच शिक्का घेऊन फिरत आहेत, उपेक्षेचे जिणे जगत आहेत. त्यांतील काहींनी शिक्षणाची वाट धरली; पण त्यांची संख्या कमीच. त्यांना मिळणारी वागणूकही तशीच. उरलेला समाज अजूनही पोलिसांची आणि समाजाची नजर चुकवत रानोमाळ फिरतो आहे. मुख्य प्रवाहात येता येत नाही, म्हणून नाइलाजाने आपल्या जुन्याच मार्गाने वाटचाल करतो आहे; पण आता त्यांच्यामध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहे. शिकलेली पिढी त्यासाठी पुढे येत आहे. राज्यस्तरावर स्थापन झालेल्या संघटनेमुळे एकत्र आलेल्या या समाजाला आता मुख्य प्रवाहात येण्याचे वेध लागले असून, त्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्यापासून प्रयत्न सुरू झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून आदिवासी फासेपारधी संघटना राज्यस्तरावर कार्यरत आहे. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र काळे यांनी संघटना आणि समाजासाठी वाहून घेतल्याप्रमाणे काम सुरू केले आहे. सुरवातीला हक्कांसाठी संघटनेतर्फे आंदोलने झाली. संघटना बांधणीसाठी अनेक तडजोडी कराव्या लागल्या. त्यामुळे मधल्या काळात संघटनेबद्दल प्रतिकूल मतेही व्यक्त केली गेली.

संघटनेतर्फे नुकतेच नगरमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये झालेली चर्चा आणि ठराव पाहता, इतरांपेक्षा वेगळे काम संघटनेत सुरू असल्याचे दिसून येते. हक्कांसाठी सर्वच संघटना भांडतात; मात्र आपल्या कर्तव्याची जाणीव सदस्यांना करून त्याप्रमाणे वागण्याची चर्चा फारशी घडवून आणली जात नाही. या संघटनेने मात्र तशी चर्चा घडवून आणली. समाजात महत्त्वाचे स्थान असलेल्या जातपंचायतीमध्येही सुधारणा करण्याचा ठराव करण्यात आला. समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकारी आणि तज्ज्ञांसोबतच न्यायाधीशांनाही बोलाविण्यात आले होते. ज्यांच्यासमोर आतापर्यंत आरोपी म्हणून उभे राहायचे, ते न्यायाधीशच मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आल्याचे पाहून समाजालाही मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. एकूणच, नगरमध्ये झालेले हे चर्चासत्र या समाजाला नवा संदेश देणारे ठरले असून, ते समाजाच्या प्रगतीसाठी नवे पाऊल मानले पाहिजे.

मुख्य प्रवाहाच्या दिशेने या समाजाने एक पाऊल पुढे टाकलेले असताना आता इतरांनी आणि प्रशासनाने त्यांना मदत केली पाहिजे. समाजाने त्यांना स्वीकारणे आणि प्रशासनाने इतरांच्या बरोबरीने त्यांनाही सोयी उपलब्ध करून देणे, यासाठी आता प्रबोधन होण्याची गरज आहे. त्यांना हवे आहे शिक्षण, समाजातील ओळख, सरकारी ओळख पटविणारी कागदपत्रे आणि रोजगार. किमान या गोष्टी मिळाल्या आणि त्यांचे मानसिक परिवर्तन करण्याचे काम संघटनेने सुरूच ठेवले, तर हा समाज मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही. या समाजाची मानसिकता बदलण्याबरोबरच इतरांचीही ती बदलावी लागेल. जे खरेच गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे; मात्र आरोपी सापडत नाहीत, पूर्वीचे गुन्हे आहेत, म्हणून संशयावरून याच समाजातील लोकांना अडकविण्याचे प्रकारही बंद झाले पाहिजेत. त्यासाठी पोलिसांच्या तपासाच्या पद्धती बदलाव्या लागतील. या समाजाला आवश्‍यक असलेली कागदपत्रे मिळवून देण्यासाठी सरकारी नियमांमध्ये काही बदल करावे लागतील, त्यांच्यासाठीच्या योजना केवळ कागदावर न राहता, त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी तशी मानसिकता असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे ते काम सोपविण्याची गरज आहे. आता या समाजाने एक पाऊल पुढे टाकलेच आहे, तर सरकार आणि समाजानेही मागे न राहता, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. (सकाळ)