सुमारे पाच महिन्यांपूर्वी नेवाशातील एका महिलेवर सामुदायिक अत्याचार झाला. त्यानंतर तिच्या पतीने आत्महत्या केली. पोलिस आले. पंचनामा केला. प्रकरण थंड. आता पाच महिन्यांनी हे प्रकरण पुन्हा उपस्थित झाले आहे. महिलेने पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली, असे सांगत पोलिसांनी सामुदायिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, तर दुसऱ्याच दिवशी ही महिला एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेली अन् असे काही घडलेच नाही, असा जबाब पोलिसांना दिला. पोलिस आणि राजकारणी यांच्या वादात या महिलेच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत.
नेवासे तालुक्यातील ही घटना आहे. तेथील वाळूतस्करीशी आणि बेकायदा शस्त्रांशी संबंधित असलेला अण्णा लष्करे अटक झाल्यानंतर काल या गावातील एका महिलेने आपल्यावर लष्करेच्या कार्यकर्त्यांनी सामुदायिक अत्याचार केल्याची फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनुसार मार्च 2010 मध्ये ही घटना घडली. त्यानंतर आपण पतीसह फिर्याद देण्यासाठी जात असताना लष्करे याने पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. त्यामुळे फिर्याद दिली नाही. त्यानंतर पुन्हा सामुदायिक अत्याचार करण्यात आला. यामुळे हतबल झालेल्या पतीने आत्महत्या केली. लष्करेच्या धाकामुळे तक्रार केली नाही. या प्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात लष्करेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या महिलेचा पती लष्करे याच्याकडेच केबल ऑपरेटर म्हणून काम करीत होता. अत्याचार करणारेही लष्करे याचेच कार्यकर्ते आहेत. आणखी एका महिलेच्या मदतीने त्यांनी हा गुन्हा केल्याची फिर्याद आहे. आता लष्करे तुरुंगात असल्याने ती महिला आपल्या दिरासह फिर्याद देण्यासाठी आली, असे पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला आज दुपारी ही महिला नगरचे आमदार अनिल राठोड यांना भेटण्यासाठी नगरला आल्याचे सांगण्यात आले. राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा ती त्यांच्या कार्यालयात मागील बाजूला बसलेली होती. तेथे तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र माळी उपस्थित होते. तेथे या महिलेचा पुन्हा जबाब घेण्यात आला. तिने ही घटना संपूर्ण नाकारली आहे. आपण काल नगर अगर नेवासे पोलिस ठाण्यात जाऊन कोणाविरुद्ध काहीही तक्रार दिली नाही. आज वृत्तपत्रांत तशा बातम्या छापून आल्याचे कळाल्यावर आपण आमदार राठोड यांच्या कार्यालयात आले आहोत. वृत्तपत्रात आलेली बातमी खोटी आहे, असा जबाब तिने लिहून दिला. त्यावेळी काही पत्रकारांचे कॅमेरेही तेथे सुरू होते. यासंबंधी आमदार राठोड यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी सांगितले, की या प्रकरणाची आम्ही चौकशी करीत आहोत. प्रथमदर्शनी तरी ही घटना बनावट वाटत असून, पोलिसांनी लष्करेला अडकविण्यासाठी केल्याचे दिसते. अंबिका डुकरे प्रकरणातील आरोपीला पकडण्यात अद्याप यश आले नसलेले पोलिस या प्रकरणात एवढे तत्पर कसे झाले, असा प्रश्नही त्यांनी केला.
एकूण घटना पाहता, यामध्ये त्या गरीब कुटुंबातील विधवेची खूपच फरपट सुरू आहे. पाच महिन्यांपूर्वी जेव्हा तिच्यावर अत्याचार झाला, तिच्या पतीच्या आत्महत्येचा तपास पोलिसांनी केला, तेव्हा त्यांना हा प्रकार कळाला नाही का? त्यावेळी या महिलेला धीर देऊन गुन्हा दाखल करण्यास मदत करण्यास विसरलेल्या पोलिसांना आताच ते प्रकरण पुन्हा कसे आठवले. तिची एकदा फिर्याद घेतली असताना एका पक्षाच्या कार्यालयात जाऊन पुन्हा जबाब नोंदविण्याची काय गरज होती, असा जबाब कितपत ग्राह्य धरला जाऊ शकतो? शिवाय ती नेमकी नगरला राठोड यांच्याच कार्यालयात कशी आली? तसा सल्ला तिला कोणी दिला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एका गुन्ह्यात अडकलेल्या आरोपीला त्याच्या इतिहासातील गुन्हे शोधून शोधून त्यात अडकविण्याची पोलिसांची वृत्ती, पोलिसांना हाताशी धरून एकमेकांची जिरवाजिरवी करू पाहणारे राजकारणी यांच्यामुळे त्या महिलेच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत. एवढे होऊन तिला खरेच न्याय मिळणार का, हाही प्रश्नच आहे.
त्या पोलिसांची चौकशी व्हावी
या महिलेच्या पतीच्या आत्महत्येचा तपास ज्या पोलिसांनी केला, त्यांची आता चौकशी करण्याची गरज आहे. आत्महत्येमागील हे कारण त्यांना तेव्हा कसे समजले नाही, त्याच्याकडे काही चिठ्ठी किंवा डायरी सापडली होती का? तेव्हाच या पोलिसांनी त्या महिलेला धीर का दिला नाही, या मुद्यांवर चौकशी केल्यास यातील सत्य बाहेर येईल, असे आता सांगितले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा