श्रीरामपूरमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. त्यापूर्वी बरेच दिवस तो तणावाखाली होता. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्यासारखे कडक शिस्तीचे अधिकारी जिल्ह्यात असूनही गेल्या दोन महिन्यांत तीन पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले. कित्येक पोलिस ठाण्यांत आजही पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याचे सांगण्यात येते, तर अनेक पोलिसांना गंभीर आजारांनी घेरले आहे.
या घटना पाहिल्या तर पोलिसांमध्ये ताण-तणाव आणि लाचखोरी किती खोलवर रुजली आहे, हे दिसून येते. कोणीही अधिकारी आले अन् गेले, तरी त्यात फारसा फरक पडत नाही. कारण यावर उपाय करणे एकट्या अधिकाऱ्याकडून शक्यच नसते. आपल्या पोलिस दलाची रचना, त्यांच्या कामाचे स्वरूप, त्यांचे पगार, त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि त्यांच्याकडून असलेल्या जनतेच्या अपेक्षा, आदी यामागील कारणे आहेत. सतत अनिश्चिततेच्या वातावरणात काम करणारे पोलिस एक तर तणावाखाली जगतात किंवा बिनधास्त बनून लाचखोरीच्या मार्गाला लागतात. बहुतांश वेळा वरिष्ठ, सहकारी आणि यंत्रणाच त्यांना या मार्गाला लावते. मुळात केवळ एकट्यासाठी लाच घेणारे पोलिस फार कमी असतात. पोलिस दलात साखळी पद्धतीची लाचखोरी चालते, ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. "पैशासाठी बदली आणि बदलीसाठी पैसा' हे दुष्टचक्र पोलिस दलात आहे. त्यामुळे पोलिसांना एक तर या यंत्रणेचा एक घटक व्हावे लागते नाही, तर तणावयुक्त जीवन जगावे लागते.
पोलिसांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा असतात, तशा त्या असण्यास हरकत नाही. नव्या वेतन आयोगामुळे पोलिसांचे पगार पूर्वीपेक्षा जरा सुधारले आहेत. त्यामुळे त्यांनी पैसे न घेता कामे करावीत, अशी अपेक्षा केली तर काय बिघडले? पण प्रत्यक्षात तसे होत नाही. गुन्हा दाखल न करणे, अटक न करणे किंवा अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेणे केवळ एवढीच पोलिसांची कमाईची क्षेत्रे राहिली नाहीत. ती आणखी विस्तारली आहेत. दाखला देण्यासाठी पैसे, वॉरंट बजावण्यासाठी, न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी, पोलिस कोठडीत घरचा डबा देण्यासाठी, मारहाण न करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी, अशा अनेक कामांसाठी पैसे मिळविण्याचे मार्ग पोलिसांनी शोधले आहेत. ज्यांचा गुन्ह्याशी संबंध आला, त्यांच्याकडून तर पैसे घेतले जातातच; पण ज्यांचा कधीच गुन्हेगारीशी कधीही संबंध आला नाही, अशा लोकांना ते गुन्हेगार नसल्याचे खरेखुरे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. पासपोर्ट काढण्यासाठी जाणाऱ्यांना हा अनुभव येतो. पोलिस ठाण्याची पायरी कधीही न चढलेल्या या लोकांकडूनही पैसे घेतले जात असल्याने त्यांच्या मनात पोलिसांबद्दल काय प्रतिमा निर्माण होत असेल? केवळ जनतेकडूनच नव्हे, तर पोलिसांकडून लाच घेतल्याशिवाय काम करीत नाहीत.
अशा यंत्रणेत वावरताना आजारपण आणि ताणतणाव निर्माण होणे सहाजिकच आहे. त्यामुळे पोलिस दलात चाळिशी ओलांडलेल्या बहुतेक पोलिसांना कोणत्या ना कोणत्या आजाराने गाठलेले असते. लाचखोरीचा फायदा सर्वच पोलिसांना होतो असे नाही. बहुतेकांना मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या सरकारी वसाहतींमध्येच दिवस काढावे लागतात. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि न पेललेल्या कौटुंबीक जबाबदाऱ्या शेवटी त्यांना आत्महत्येचा मार्ग दाखवितात. या दुष्टचक्रातून पोलिसांची सुटका केव्हा होणार? याचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही.
1 टिप्पणी:
It's Reality
टिप्पणी पोस्ट करा