शनिवार, २८ मार्च, २००९

कसाबचा "हिसाब' चुकता करीन ः ऍड. निकम

"गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याने राज्यच नव्हे तर देश हादरला होता. त्यामधील जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाब याच्याविरुद्धचा खटला आता सुरू झाला आहे. सुमारे सात महिन्यांत त्याचे कामकाज पूर्ण होईल. या खटल्यात कसाबचा हिसाब निश्‍चित चुकता करीन, असा आपल्याला विश्‍वास आहे.
- ऍड. उज्ज्वल निकम
विशेष सरकारी वकील


(नगर येथील जैन सोशल फेडरेशनतर्फे आयोजित महावीर व्याख्यान मालेत "दहशतवाद आणि मी' या विषयावर ऍड. उज्ज्वल निकम यांचे व्याख्यान झाले. त्यातील काही अंश....)

"अतिरेक्‍यांची पाठराखण करणाऱ्या देशांविरुद्ध युद्ध करून दहशतवाद संपणार नाही. मूठभर अतिरेक्‍यांसाठी बहुसंख्य गरिबांचे प्राण घेण्यापेक्षा अतिरेक्‍यांना आणि त्यांच्या म्होरक्‍यांना कायद्याच्या कचाट्यात आणून कायद्याचा वचक निर्माण केला पाहिजे. 18 ते 20 वर्षांपासून आपण दहशतवाद्यांच्या विरोधातील खटले चालवीत आहोत. मात्र, न्यायालयात वकील आणि पोलिसांच्या जोडीला साक्षीदारांची साथही मोलाची असते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यासाठी अनेक भूमिकांमधून जावे लागते. अनेकदा दहशतवाद्यांकडून धमक्‍याही आल्या; पण आपण डगमगलो नाही. चित्रपटसृष्टीतील लोकांच्यासंबंधित खटले चालविण्याची वेळ आली, त्यामुळे त्या लोकांनाही जवळून अनुभवता आले. त्यामुळे अशा लोकांच्या मागे आपली तरुण पिढी का धावते, असा प्रश्‍नही आपल्याला पडला.''
""पाकिस्तानशी युद्ध करून दहशतवाद संपणार नाही. असा विचार करणेही एकप्रकारे दहशतवादच आहे. तेथील अतिरेकी संघटनांना आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांना कायद्याच्या जाळ्यात ओढून शिक्षा दिल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही. आपल्या देशात येऊन काश्‍मीरसंबंधी अप्रत्यक्ष धमक्‍या देणाऱ्या मुशर्रफ यांचा कायदेशीर समाचार घेण्याची गरज आहे. गुन्हेगारांनाही किती अवास्तव प्रसिद्धी दिली जाते, ते संजय दत्त प्रकरणातून समजले, असे प्रकार थांबले पाहिजेत. लोकसंख्येला आळा घालणे, गरीब-श्रीमंतातील वाढती दरी कमी करून सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणे, हेही दहशतवाद रोखण्याचे उपाय आहेत.''
श्री. निकम हे कायदे तज्ज्ञ म्हणून सर्वांना परिचित आहेत. मात्र, ते हळव्या मनाचे कवी आहेत, शेरोशायरीही करतात, याचा प्रत्यय नगरकरांना प्रथमच आला. गंभीर विषयावरील आपल्या या व्याख्यानाची सुरवातच त्यांनी कवितेच्या जुन्या आठवणींपासून केली. "बायको कोणाला म्हणावे' ही आपली पहिली कविता त्यांनी सादर केली. कोणाला प्रेमातून, कोणाला विरहातून कविता सुचतात आपल्याला मात्र संतापातून कविता सुचत होत्या, असे सांगून त्यांनी आणखी काही कविताही सादर केल्या. चांदवड येथील शीख अतिरेक्‍यांविरूद्ध त्यांनी चालविल्या पहिल्या खटल्यापासून ते सध्याच्या कसाबविरूद्धच्या खटल्यापर्यंत महत्त्वाच्या प्रकरणांतील किस्से त्यांनी सांगितले.

रविवार, २२ मार्च, २००९

"नार्को ऍनालिसिस' आहे तरी काय?

मानवी हक्क आयोगाच्या निर्बंधांमुळे आणि निगरगट्ट बनलेल्या आरोपींमुळे पोलिसांच्या नेहमीच्या तपास पद्धतीतून गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे आता साध्या साध्या प्रकारांतही आरोपीच्या ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्‍टर आणि नार्को ऍनालिसिस अशा चाचण्या घेतल्या जातात.
अलीकडे त्यांतील नार्को चाचणीचे प्रमाण वाढत आहे. या चाचणीला कायदेशीर आधार नसला, तरी पोलिसांना तपासाची दिशा मिळण्यास उपयोग होतो. सामान्य स्थितीत आरोपी खरे बोलेलच याची खात्री नसते; कारण तो मनावर ताबा ठेवून असतो. त्याच्याकडून सत्य बाहेर काढण्यासाठी त्याची जागृती पातळी (कॉन्शस लेव्हल) कमी करावी लागते. त्या वेळी तो खरे बोलण्याची शक्‍यता अधिक असते. बंगळूरच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये ही चाचणी घेतली जाते. आता मुंबईतही अशी चाचणी घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यामध्ये एक प्रकारे आरोपीला भूलच दिली जाते. तीन ग्रॅम सोडियम पॅन्थॉल तीन हजार मिलिग्रॅम पाण्यात मिसळून, त्या द्रावणाचा दहा टक्के डोस चाचणीसाठी आणलेल्या आरोपीला दिला जातो. संबंधित व्यक्ती तीन तास त्याच्या अमलाखाली राहू शकते. या वेळात तिच्याकडे चौकशी केली जाते. त्यामध्ये अनेकदा असंबद्ध बरळण्याचे प्रकारही होतात. ही चाचणी घेताना तपास अधिकारी आणि भूलतज्ज्ञ उपस्थित असतात. या चाचणीचा व्यक्तीच्या स्मृती, बुद्धी व एकूणच प्रकृतीवर काहीही परिणाम होत नाही. भुलीचा डोस ठरविताना व्यक्तीचे वय, लिंग, शरीरयष्टी यांचा विचार केला जातो. हा डोस जास्त झाला, तर व्यक्ती कोमात जाऊ शकते.या चाचणीला कायदेशीर आधार मात्र नाही. चाचणीत आरोपीने दिलेली कबुली त्याच्याविरुद्ध अगर इतर कोणाविरुद्धही न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येत नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी इतर पुरावे सादर करावेच लागतात. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांतही या चाचणीला कायदेशीर मान्यता नाही. ही चाचणी घेण्यासाठी संबंधित न्यायालयाची परवानगी आणि आरोपीची संमती घेणे आवश्‍यक असते. ही चाचणी तशी खर्चिकच. पूर्वी खूप गंभीर आणि गुंतागुंतीच्या प्रकरणातच तिचा वापर व्हायचा. आता मात्र साध्या साध्या प्रकरणांतही या चाचणीची मागणी होऊ लागली आहे.

मंगळवार, १७ मार्च, २००९

स्वस्तात सोन्याचे आमिष!

नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व कोपरगाव तालुके ही जणू सुवर्णभूमी असावी, असा समज सर्वदूर पसरला आहे. या तालुक्‍यांतील शेकडो भामटे राज्यभरात सावज हेरून स्वस्तात सोने देण्यासाठी त्यांना येथे आणतात. सोनं देणं तर दूरच; सोबतचा ऐवज गमावण्याबरोबरच भरपूर "प्रसाद' मात्र त्यांच्या नशिबी येतो. प्रसंगी आरोपी मोकळे राहून फिर्यादीच गजाआड दिसतो. या गुन्हे पद्धतीला पोलिसांच्या भाषेत "ड्रॉप' असे संबोधले जाते.
अशा घटना अनेकदा घडूनही फसणारे फसतातच त्यामुळे पोलिसही या प्रकारांना आळा घालू शकलेले नाहीत.राज्याच्या अनेक भागांत अधूनमधून स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुटण्याचे प्रकार घडतात. नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. मुख्य म्हणजे यात फसलेली मंडळी कोणी कष्टकरी, देवभोळे किंवा निरक्षर नाहीत. डॉक्‍टर, वकील, नगरसेवक, व्यापारी, अगदी पोलिस अधिकारीदेखील या जाळ्यात अडकले आहेत. "ड्रॉप' यशस्वी झाला, तर त्याची वाटणी ठरलेली असते. मूळ गुन्हेगार, नंतर मध्यस्थ, त्यानंतर प्रकरण मिटवणारा, असे वाटेकरी यात असतात. पोलिसांच्या आश्रयानेच "ड्रॉप' फोफावले, असा आरोप होऊन पोलिसांची "सीआयडी' चौकशीदेखील झाली. फिर्यादीलाच जेव्हा पोलिस अटक करू लागले, तेव्हा लुटले जाऊनदेखील फिर्याद द्यायला पुढे येण्याचे प्रकार कमी झाले.
दरोडयांच्या तुलनेत "ड्रॉप'मध्ये यशाची हमी अधिक, भरपूर मलिदा, सुरक्षितता व गुन्ह्याची तीव्रता कमी करणारी यंत्रणा. यामुळे गुन्हेगारांचे फावत गेले. दोन लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत "ड्रॉप' झाले आहेत. आजवर लुटण्यात आलेली रक्कम काही कोटी रुपये असेल. यात आरोपी अटकेचे आणि शिक्षेचे प्रमाणही कमीच आहे. असे गुन्हे घडू नयेत, यासाठी केवळ पोलिसांची ठोस भूमिका पुरेशी नाही. अचानक धनलाभाचा हव्यास असणारे सावज जोपर्यंत आहेत, तोवर हे प्रकार होणारच. सावज अडकविण्यापूर्वी गुन्हेगार त्याचा विश्‍वास संपादन करतात. भिक्षा मागण्याचा निमित्ताने किंवा अन्य कारणांनी त्याच्याकडे जा-ये वाढवितात. अनेकदा थेट संपर्क न करता मध्यस्थ सोडतात. प्रारंभी खरे सोने देऊन खात्री पटविली जाते. चार-दोन वेळा असे केले, तर कितीही चाणाक्ष व्यक्ती असो; समोरच्यावर भरवसा ठेवते. घटनेच्या वेळी माणूस गांगरून जातो. पैशाची बॅग घेऊन, तसेच मोबाईल, अंगावरील दागिने घेऊन गुन्हेगार पलायन करतात. अशा वेळी मदतीलाही कोणी येत नाही. उलट तुम्ही या फंदात का पडलात म्हणून त्याची हेटाळणी होते. काही प्रकरणांत आरोपींनी नकली दागिने देऊन फसविले. काही भामट्यांनी कप-बशीचे बारीक तुकडे पोत्यात भरून ठेवले यात चांदीची नाणी आहेत, असे भासविले. कप-बशीच्या तुकड्यांचा आवाज नाण्यांप्रमाणे भासला व सावज जाळ्यात अडकले. हे गुन्हे केवळ पुरुषच करीत नाहीत, तर यात महिला, मुले व वृद्धदेखील असतात. जोपर्यंत हव्यासापोटी स्वस्तात माल मिळविण्याची वृत्ती संपत नाही, तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहणार.

शनिवार, १४ मार्च, २००९

राजा बोले...!

राजेशाहीच्या काळात राजा बोलेले तसे दल हालत असे. प्रधानापासून सेनापतीपर्यंतची सगळी माणसे महाराजांच्या मर्जीतील होती. आता आपण लोकशाही राज्यपध्दती स्वीकारली आहे. पण त्यातील "राजेशाही' अद्याप गेलेली दिसत नाही. सत्ताधारी मंडळींना महत्त्वाच्या पदावर आपल्याच मर्जीतील माणसे हवी असतात. त्यासाठी वाट्टेल तो अटापिटा करण्याची त्यांची तयारी असते. प्रतिष्ठा पणाला लावून कायद्यातून पळवाटाही काढल्या जातात. अन्‌ कसेही करून नाहीच जमले तर केवळ पदापुरती माणसे नेमून सूत्रे मात्र मर्जीतील माणसांकडे ठेवली जातात.
राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीवरून गेल्या काही महिन्यांसापून सुरू असलेल्या घडामोडींवरून हेच दिसून येते. न्यायालयाच्या फटकाऱ्यामुळे नाईलाजाने का होऊन अमानी रॉय यांना हटवून एस. एस. विर्क यांना महासंचालक करावे लागले. पण त्यासाठी असा काही घोळ घालण्यात आला, अशी काही परिस्थिती तयार केली गेली की, किमान निवडणूक काळात तरी विर्क हे नावापुरतेच महासंचालक राहतील. तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अनामी रॉय यांची पोलिस महासंचालकपदी राज्य सरकारने निवड केली होती. या निवडीला सध्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक असलेल्या सुप्रकाश चक्रवर्ती यांनी आक्षेप घेत "कॅट'मध्ये धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही अनामी रॉय यांची नियुक्ती नियमबाह्य ठरविताना मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पोलिस महासंचालकांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. राज्याच्या पोलिस महासंचालकपदाच्या स्पर्धेत सेवाज्येष्ठतेनुसार गृहनिर्माण विभागाचे महासंचालक एस. एस. विर्क, गृहरक्षक दलाचे महासंचालक जीवन वीरकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती आणि न्यायालयाने नियुक्ती रद्द केलेले पोलिस महासंचालक अनामी रॉय यांच्या नावाचा विचार करण्यात येणार होता. यानंतर मात्र खरी स्पर्धा एस. एस. विर्क आणि ए. एन. रॉय यांच्यातच होती. विर्क यांच्यासह वीरकर आणि चक्रवर्ती हे आयपीएस अधिकारी जुलैअखेरपर्यंत निवृत्त होत असल्याने नंतर पुन्हा रॉय हे सेवाज्येष्ठतेने महासंचालकपदावर दावा करणार असल्याने सरकारने त्यांचे नाव अखेरपर्यंत चर्चेत ठेवले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सेवाज्येष्ठता आणि आतापर्यंतची कामगिरी यांच्या निकषावर पोलिस महासंचालकपदासाठी नावाची शिफारस राज्य सरकारला केली.
तोपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने राज्य सरकारला नवीन पोलिस महासंचालक नेमताना निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागली. त्यामुळे पोलिस महासंचालकांच्या निवडीसाठी राज्य सरकारने न्यायालयाकडून मुदतवाढ घेतली होती. अखेर राज्य सरकारने विर्क यांच्या नेमणुकीचा आदेश काढला. मात्र याचवेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अतिरिक्त महासंचालक पी. पी. श्रीवास्तव हे लोकसभा निवडणुकांचे कामकाज पाहतील, असेही घोषित केले.महासंचालकपदी नियुक्ती झाली तरी श्री. विर्क सध्या तरी पूर्ण क्षमतेने काम पाहू शकणार नाहीत. त्यांनतर जुलैमध्ये ते निवृत्त होणार आहेत. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्यावेळीही ते पदावर नसतील, अशीच रचना यातून केली आहे. कायदेन, नियम, न्यायालये अशी सर्व रचना असली तरी सरकार यातूनही मार्ग काढून आपल्याला हवी तशी रचना करून घेऊ शकते, आजही आपले दल या "सरकार राज्याच्या' इशारावरच हालते हेच यातून स्पष्ट होते.

मंगळवार, १० मार्च, २००९

पंचनामा


भारती
निश्कालाजी पोलिसांत
भरती नवी झाली आहे.
नव्या पिढीची "झलक'इकडेही
दिसू लागली आहे.

तंटामुक्ती
वषार्नुवर्षे गावातील तंटे
"शांतते'त चालू असतात.
तंटामुक्तीच्या बैठकीत मात्र
बंदोबस्ताला पोलिस लागतात.

दारू आणि पाणी
दारू झाली स्वस्त,
पाणी महागडे आहे.
कुलपात नळकोंडाळे,
बिअर बार उघडे आहे.

ड्राय डे
पुढच्या दाराला कुलूप
मोकळी दारू वाहते,
गांधीजींची जयंतीही,
"लोळून' साजरी होते.

आंदोलन
आंदोलनाचेसुद्धा आता
"फिक्‍सिंग झालेले असते.
उपोषणाला बसण्यापूर्वीच
उठण्याची वेळ ठरलेली असते.

रोडरोमिओ
रोमिओ-ज्युलिअटची कहाणी
रोड-रोडवर आली आहे.
प्रत्येक गावातील सडक
रोडरोमिओंनी भरली आहे.

पत्रक पुढारी
लेखणी जपून ठेवा
बाजार फार झाला
पत्रक पुढाऱ्यांचा
सुळसुळाट फार झाला.

दादा
काम कमी; पण
प्रसिद्धी जादा.
बातमी नाही आली,
की गुरगुरतो दादा.

बॅंक
काल रात्री बॅंक
ढसाढसा रडत होती.
तिजोरीच्या काळजाची
चोरी होत होती.

बोगस डॉक्‍टर
लोकसंख्या नियंत्रणावर
उपाय उत्तम करावा
गावोगावी एक तरी
बोगस डॉक्‍टर पाठवावा

यमाचा पत्ता

तीर्थयात्रेचा संबंध आता
अंत्ययात्रेशीच जुळतो.
बेफाम वाहनचालकांना,
यमाचाच पत्ता मिळतो.

साडेसाती
भक्ताजवळ शनीदेव
ढसाढसा रडत होते.
साडेसाती सोडतो तुझी
लूटमार थांबव, म्हणत होते.

निवडणूक
लढवायची नसली
तरीलढायचे असते,
पोलिसांनाही निवडणुकीची
धास्ती लागलेली असते.

-भरत वेदपाठक
9922419242

रविवार, ८ मार्च, २००९

बांधावरची भांडणे

बांध म्हणजे दोन शेतांच्या सीमा ठरविणारे माध्यम; मात्र त्यावरून होणारी भांडणे दोन कुटुंबांना एकमेकांपासून तोडणारी ठरत आहेत. ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या तंट्यांपैकी बहुतांश तंटे बांधावरूनच उद्‌भवतात. अनेकदा गंभीर गुन्हे आणि कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाणाऱ्या घटनाही यातून घडल्या आहेत. तंटामुक्त गाव मोहिमेलाही असे तंटे मिटविण्यात अद्याप यश आलेले नाही. सुटसुटीत नियम, सोपी पद्धती आणि जलद न्यायदान, याशिवाय बांधावरील तंटे मिटणार नाहीत.भावकी आणि बांधावरची भांडणे वर्षानुवर्षे चालत आली आहेत. काही कुटुंबांमध्ये तर पिढ्यान्‌ पिढ्या अशी भांडणे असल्याचे दिसून येते. वेळ, पैसा आणि आयुष्यही त्यात घालविल्याची अनेक उदाहरणे आहेत. चित्रपट आणि तत्सम प्रसारमाध्यमांतून अनेकदा त्यांचे उदात्तीकरणही होते. शहरी भागात राजकीय कारणातून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जसे अधिक असते, तसे ग्रामीण भागात बांधावरची भांडणे अधिक. सुरवातीला किरकोळ वाटणाऱ्या या भांडणांतूनच पुढे गंभीर गुन्हे घडतात. केवळ संबंधित शेतकरीच नव्हे, तर सरकारी यंत्रणाही बांधावरच्या दाव्यांसाठीच राबताना दिसून येते. बांधाच्या जागेवरून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यासाठी झालेला हा खर्च किती तरी मोठा असतो. इर्ष्या, द्वेष, जळाऊ वृत्ती ही अशा भांडणाची मूळ कारणे आहेत. मनुष्यस्वभावाप्रमाणे ती कमी-अधिक प्रमाणात असू शकतात. शेजारी, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी अशा वादांना खतपाणी घालून अधिकच भडकावून दिलेले असते. अशा वादावर ज्यांचे "व्यावसाय' चालतात, त्यांनाही हे वाद हवेच असतात. त्यामुळे अशा भांडणांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच जाते. सुरवातीला त्यांचे स्वरूप किरकोळ तंटा, असे असते. अदखलपात्र स्वरूपाच्या या तक्रारींची पोलिसही फारशी दखल घेत नाहीत. फार तर दोघांनाही दमबाजी करून परत पाठविले जाते. मूळ प्रश्‍न न सुटल्याने भांडण धुमसतच राहते.मुळात बांधावरच्या तंट्यात पोलिसांचा भाग तसा खूपच मर्यादित. ज्यांच्याकडे हे काम आहे, त्यांचे कायदे गुंतागुंतीचे, प्रक्रिया वेळखाऊ अन्‌ तेथील कर्मचाऱ्यांचा नकारात्मक दृष्टिकोन, यामुळे तेथे जलद न्याय मिळत नाही. बाहेर लोकांनी हा प्रश्‍न त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असल्याप्रमाणे हाती घेतलेला असतो. अनेकदा ते साहजिकही आहे. त्यामुळेच एका दिवाणी तंट्याचा निकाल लागेपर्यंत त्यावरून अनेक फौजदारी तंटे घडलेले असतात. जमीन महसूल अधिनियम, मोजणीची पद्धत, त्यांचे कामकाज, नियम, वेळकाढूपणा या गोष्टी सर्वसामान्यांच्या अकलानाबाहेरील असतात. झटपट न्याय हवा असणाऱ्यांचे तेथे समाधान होऊ शकत नाही. त्यामुळे बाहेर तंटे सुरूच राहतात. हे तंटे मिटविण्यासाठी मुळापासून विचार केला पाहिजे. काही नियम बदलता येतील का? प्रक्रिया सुटसुटीत करता येईल का? दावे झटपट निकाली काढता येतील का, यावर विचार व्हायला हवा. आतापर्यंत घडलेल्या घटनांचा आणि त्यांच्या कारणांचा जरी आढावा घेतला, तरी संबंधित यंत्रणेला यावर उपाय नक्कीच सापडतील; पण त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे, सत्ताधाऱ्यांचे पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे. सुटसुटीत नियम, सोपी पद्धती आणि जलद न्यायदान यांशिवाय बांधावरील तंटे मिटणार नाहीत. जोपर्यंत असे तंटे सुरू राहतील, तोपर्यंत सामाजिक शांतता बिघडलेलीच राहून विकासावरही त्याचा परिणाम होत राहणार.

गुरुवार, ५ मार्च, २००९

सावध रे...!

धावपळीच्या काळात लोक अनेकदा बेसावधपणे वागतात. त्याचाच फायदा गुन्हेगार उठवीत असतात. आपल्या आजूबाजूला बेमालूमपणे चोर वावरत असतात. गुन्हा घडल्यावर पोलिसांत तक्रार करून उपयोग होतोच असे नाही. त्यामुळे आपणच थोडीशी सावधगिरी बाळगली, तर फसले जाण्याचे प्रकार टाळता येऊ शकतात. आपली सुरक्षा आपणच घ्यावी, हाच यामागील संदेश. चला! एकमेकांना सावध करू या. त्यासाठी या काही "टिप्स'....
घराबाहेर पडताना...
- घराचे कुलूप दणकट असल्याची खात्री करावी.
- जास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलिस ठाण्यात त्याची माहिती द्यावी.
- बाहेरगावी कोठे जाणार, तेथील संपर्काचा क्रमांक द्यावा.
- दागिने अगर इतर मौल्यवान वस्तू बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात.
- रात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहील अशी व्यवस्था असावी.

प्रवास करताना....
- बसमध्ये बॅगा व्यवस्थित "लॉक' करून ठेवाव्यात.ै
- मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा शक्‍यतो जवळच ठेवाव्यात.
- अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत.
- जादा सलगी करू पाहणाऱ्या सहप्रवाशापासून सावध राहावे.
- गर्दीत बसमध्ये चढताना आणि उतरताना खिसेकापूपांसून सावध.
- अपरिचित भागातून रात्रीचा प्रवास टाळावा.
- अनोळखी व्यक्तींना "लिफ्ट' देऊ नये.
- रस्त्यात कोणी विनाकारण थांबवत असेल तर, थांबणे टाळावे.

सदासर्वदा सावधान...
- गुन्ह्याला सामोरे जावे लागल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- चोरट्याचे वर्णन, भाषाशैली, लकब आदी तपशील लक्षात ठेवावा.
- अनोळखी व्यक्तीशी बोलताना त्याचे वर्णन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
- अंगावर घाण टाकूण किंवा पैसे पडल्याचे सांगून कोणी लक्ष विचलित करीत असेल तर, जवळचा ऐवज पहिल्यांदा सांभाळा.
- अंगावरील दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे.
- विनाकारण कोणी ओळख काढून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्या व्यक्तीला दूर ठेवा.

सोमवार, २ मार्च, २००९

चोरही लावतात सापळे!

चोराला पकडण्यासाठी पोलिस जसे सापळे लावतात, तसेच सापळे चोरही "सावज' पकडण्यासाठी लावतात. बॅंकांच्या बाहेर, दागिन्यांच्या दुकानाबाहेर, गर्दीच्या ठिकाणी, एवढेच नव्हे, तर तुमच्या घराच्या आसपासही चोरटे दबा धरून संधीची वाट पाहत बसलेले असतात. त्यांना ही संधी मिळू नये, यासाठी आपली आपणच दक्षता घेतलेली बरी!बॅंकेतून पैसे काढताना लोक घाईत असतात. याचा फायदा चोरटे उठवतात. बॅंकेच्या आसपास थांबून, पैसे घेऊन बाहेर पडणाऱ्यांवर ते लक्ष ठेवून असतात. त्यामुळे मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले पैसे लांबविणे, डोळ्यात मिरचीची पूड टाकून पैसे लांबविणे, खाली काही नोटा पडल्या आहेत, असे सांगून, अगर सुटे पैसे करण्याच्या बहाण्याने रोकड पळवून नेली जाते. रस्त्याने जाताना अंगावर घाण टाकून त्याकडे लक्ष वेधले जाते. ती साफ करीत असताना रोकड पळवून नेण्याचा चोरट्यांचा बेत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत सावधानता बाळगून जवळची रोकड असलेली बॅग सांभाळावी. सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्यासाठी चोरटे घराच्या आसपासच दबा धरून बसलेले असतात. कधी "आम्हीच पोलिस आहोत,' असा बहाणा करून सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने वृद्धांकडील ऐवज लांबविला जातो. घरी लग्न समारंभ असल्यास चोरांची नजर त्यावरही असते. गर्दीत घुसून लूट करणे, घरात कोणी नाही, हे पाहून घरफोडी करणे, असे गुन्हे घडतात. दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लांबविण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे महिलांनी अशा लोकांवर विश्‍वास ठेवू नये.स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून रानावनात नेऊन लूटमार करण्याच्या घटना तर जिल्ह्याच्या काही भागात नित्याच्या झाल्या आहेत. दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफी दुकान लुटणे, ग्राहक म्हणून प्रवेश करायचा अन्‌ रोखपालास धाक दाखवून बॅंक लुटायची, रात्री पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या निमित्ताने येऊन लूटमार करण्याचेही प्रकार घडतात. वाहन भाड्याने ठरवून चोरून घेऊन जाणे, नोकर म्हणून कामावर येऊन नंतर चोरी करून पळून जाणे, अशा पद्धतीही चोरटे वापरतात.
सदासर्वदा सावधान
-बॅंकेतून मोठी रक्कम काढताना विश्‍वासू व्यक्तीस बरोबर घेऊन जावे.
-रोख रक्कम वाहनाच्या डिकीत ठेवू नये.
-पैसे काढल्यावर बॅंकेच्या आसपास कोठेही न थांबता सरळ निघून यावे.
-रस्त्यात पडलेली चिल्लर उचलण्याचा मोह टाळावा.
-आपल्या हातातील ऐवज कोणाही परक्‍या व्यक्तीच्या हाती देऊ नये.
-महिलांनी घराबाहेर पडताना दागिन्यांची काळजी घ्यावी.
-बॅंका, पतसंस्था, पेट्रोल पंप, व्यापारी पेढ्या यांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
-नोकर ठेवताना त्याची संपूर्ण चौकशी करावी.
-अडचणीच्या प्रसंगी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेचा नेमका तपशील व चोरट्यांचे वर्णन सांगावे.

रविवार, १ मार्च, २००९

नंबर प्लेट की नेम प्लेट?


वाहनांच्या नोंदणी क्रमांकाच्या रचनेची मोडतोड करून त्यातून नावे तयार करण्याचे किंवा नंबर ऐवजी दुसराच मजकूर लिहिण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या नंबर प्लेट आहेत की नेम प्लेट असा प्रश्‍न पडतो. "आरटीओ'कडे वाहनांची नोंदणी केल्यावर मिळालेला नंबर ठरलेल्या नमुन्यातच रंगवावा लागतो; मात्र हे सर्व नियम पायदळी तुडवून अशा चित्रविचित्र रंगविलेल्या नंबर प्लेट पहायला मिळतात. अशा काही "नमुनेदार' नंबर प्लेटचे हे संकलन .