स्थळ- नेवासे पोलिस ठाणे... रात्रीचे अकरा वाजून गेलेले... एक महिला धावत पळत पोलिस ठाण्यात आली.... आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले, अंगावरील मारहाणीच्या खुणाही दाखविल्या. तिने सांगितलेली कथा ऐकून पोलिसही हादरून गेले. लगेच तपास सुरू झाला, आरोपीलाही पकडून आणले गेले; पण तपास जसजसा पुढे जात होता, तसा घटनेबद्दल पोलिसांना संशय येऊ लागला. शेवटी हा सर्व बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला बदनाम करून त्यांचा पत्ता कट करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या गटाने रचलेला हा बनाव होता. पोलिस निरीक्षक कैलास गावडे यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. अन्यथा राजकारणासाठी पोलिसांचा वापर तर झालाच असता, शिवाय एक कुटुंबही उद्ध्वस्त झाले असते. ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारणासाठी कशा खोट्या फिर्यादी दिल्या जातात. याकडे "सकाळ'मधील "पोलिसनामा' या सदरातून मागील आठवड्यातच प्रकाश टाकण्यात आला होता.
नेवासे तालुक्यात देवाचे नाव धारण करणाऱ्या एका गावात चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. विरोधी गटातील एका उमेदवाराचे एका महिलेशी नाजूक संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या गटाने या महिलेला हाताशी धरून तिला उमेदवारीचे आमिष दाखवून ही कथा रचण्यास भाग पाडले होते. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत खरी घटना उघडकीस आली. या महिलेचे माहेर नगरच्या मुकुंदनगर भागातील आहे. नेवासे तालुक्यातील या गावात तिचे पती डॉक्टर आहेत. परिसरात फिरून ते व्यवसाय करतात. या महिलेच्या घराशेजारीच गावातील राजकारणात सक्रिय असलेला एक कार्यकर्ता राहतो. गेल्या काही वर्षांपासून त्यांचे "नाजूक संबंध' आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये हा कार्यकर्ताही उतरणार होता. त्यामुळे त्याचा पत्ता कट करण्यासाठी विरोधकांनी हा बनाव रचला. ठरल्याप्रमाणे महिला रडत पोलिस ठाण्यात गेली. श्री. गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिची विचारपूस केल्यावर तिने अंगावरील मारहाणीचे वळही त्यांना दाखविले. बुरख्यात आलेली ही महिला पोलिसांना सुरवातीला चांगल्या घरातील व चांगल्या वळणाची वाटली. मात्र, चौकशीत हळूहळू तिच्याबद्दल संशय येऊ लागला. शेवटी तिने आरोप केलेल्या व्यक्तीला पोलिसांनी रात्रीच उचलून आणले. आपल्यावर या महिलेने केलेला आरोप पाहून तोही हादरून गेला. त्याने तिच्याशी असलेले आपले "खरे संबंध'ही पोलिसांना सांगून टाकले. आपल्याशी झालेल्या भांडणातूनच तिला मारहाण केल्याचेही कबूल केले. मग मात्र, ही महिला थोडी गडबडली. घटनेबद्दल सारवासारव करू लागली.
त्यानंतर तिच्या पतीचा शोध सुरू झाला. पोलिसांनी त्याला घटना घडली तेव्हा कोठे होता, याची विचारणा केली. तेव्हा त्याने एका रुग्णाला तपासण्यासाठी गेल्याचे सांगितले. डॉक्टरने नाव सांगितलेल्या रुग्णाकडे पोलिसांनी चौकशी केली, तर त्याने आपण ठणठणीत असून, कोणाही डॉक्टराला बोलाविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावत गेला. मधल्या काळात या महिलेच्या मोबाईलवर गावातील काही व्यक्तींचे दूरध्वनी येत होते. त्यांना ही महिला "नाही अजून, कारवाई सुरू आहे,' अशी त्रोटक उत्तरे देत होती. वारंवार येणाऱ्या या दूरध्वनींचा पोलिसांना संशय आला. त्यांनी तो मोबाईल तपासला असता हे दूरध्वनी गावातीलच दुसऱ्या गटाच्या नेत्याकडून येत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी काही काळ त्या महिलेला असेच बोलत राहण्यास सांगितले. तेव्हा गुन्हा कसा दाखल करायचा, काय बनाव करायचा याच्या सूचनाही दूरध्वनीवर दिल्या जात असल्याचे लक्षात आले.
आता मात्र हा बनाव असल्याची पोलिसांची खात्री पटली. मात्र, नियमानुसार महिलेची तक्रार आहे, म्हटल्यावर ती नोंदवून घेणे भाग होते. त्यामुळे पोलिसांनी तशी तयारी सुरू केली. त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची तयारी झाली. जर अहवाल सकारात्मक आला, तर गुन्हा दाखल होईल, असे तिला पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मात्र ही महिला आणखीच गडबडली. तिच्यासोबत असलेले लोकही गडबडले. बलात्कार नव्हे तर प्रयत्न झाल्याची बतावणी त्यांनी सुरू केली. शेवटी जेव्हा प्रत्यक्ष तक्रार देण्याची वेळ आली, तेव्हा मात्र केवळ मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी त्यावरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून प्रतिबंधात्मक कारवाईखाली त्या व्यक्तीला अटक केली.
तरीही हेतू साध्य....
एवढी सगळी घटना घडून गेल्यावर बलात्काराचा आरोप झालेल्या त्या व्यक्तीने निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत केले. राजकारण गेलं चुलीत, एका मोठ्या घटनेतून वाचलो, अशी भावना त्याने व्यक्त केली. विशेष म्हणजे विरोधी गटाने त्या महिलेलाही उमेदवारी दिली नाही.
1 टिप्पणी:
mebody has said, `Politics is a game of Scoundrles`. Kahi Baikanchya rajkiya ambitions itkya vadhalya ahet ki tya purna karnyasathi tya kontya he starala agdi sahaj javu(khali padu) shaktat! PI Gawade Sudharla mhanaycha ka? To Shevgavla a...stana `Nitin Kakde` Vs `Mahesh Gore`prakarnat, Me tyachi puravyanishi takrar keli hoti n tyat tyala doshi dharun ek increment stop jhaley hotey!!! To Srigondyala astana tyachya bhavachya navane kahi avaidh dhande chalu aslyachya takrari majhya kade alya hotya. Tyachyvar laksha thevney garjeche ahey!!
टिप्पणी पोस्ट करा