बुधवार, २८ जुलै, २०१०

अवैध धंदेवाल्यांची शिरजोरी वाढतेय !

अवैध धंद्यांवर छापे घालण्यास गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यापासून ते दंगली घडविण्यापर्यंतचे प्रकार आता पाहायला मिळू लागले आहेत. अकोले येथे गेल्या आठवड्यात घडलेली घटना याच प्रकारात मोडणारी आहे. अवैध धंदेवाल्यांची शिरजोरी वाढत असल्याचे हे लक्षण असून, ही शिरजोरी वेळेत मोडीत काढावी लागेल. हे काम एकट्या पोलिसांचे नसून, राजकीय पक्षांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. आज धंदे चालविण्यासाठी पोलिसांवर हल्ले करणारे हे लोक उद्या सत्तास्थाने मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी राजकारण्यांवरही हल्ले करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल.

पूर्वी अवैध धंदे चोरून-लपून चालत असत. पोलिसी भाषेत त्याला दोन नंबरचे धंदे म्हणतात. पोलिसांपुढे आणि समाजात वावरतानाही हे लोक खाली मान घालून वावरत असत. आपला धंदा काय, हे इतरांना सांगण्याची त्यांना लाज वाटत असे. समाजात फारसे स्थान नसलेल्या या लोकांना राजकारणातही स्थान नव्हते. त्यानंतर धंद्यांसाठी हप्ते देण्याची पद्धत सुरू झाली. धंदा सुरू ठेवायचा असेल, तर त्या भागातील पोलिसांना हप्ता द्यावा लागत असे. पोलिसांचाच आशीर्वाद मिळू लागल्याने हे धंदे फोफावत गेले. धंदेवाल्यांनाही पैसा मिळू लागला. ही गोष्ट पोलिसांवर नियंत्रण असलेल्या सत्ताधारी राजकीय लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यांनी या धंदेवाल्यांकडून फायदा करवून घेण्यास सुरवात केली. त्यांच्याकडून मिळणारा पैसा निवडणुकांसाठी वापरला जाऊ लागला. त्याबदल्यात त्यांना संरक्षण देण्यास सुरवात झाली. त्यातूनच धंदेवाले राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते बनले. हळूहळू राजकारणातील शक्तीचा या धंदेवाईक कार्यकर्त्यांना अंदाज येऊ लागला. राजकारणी पोलिसांना कसे झुकवितात, याचीही माहिती त्यांना झाली. त्यामुळे त्यांच्यामध्येही राजकीय सत्ता मिळविण्याची इच्छा होऊ लागली. अवैध धंद्यांतून मिळालेल्या पैशाच्या आधारे त्यांतील अनेकांचा राजकारणात प्रवेश कसा झाला आणि त्यांनी सत्तास्थाने कशी काबीज केली, हे जनतेला आणि पोलिसांनाही कळाले नाही. त्यामुळे सध्या बहुतांश राजकारण्यांची पार्श्‍वभूमी अशा अवैध धंद्याची आहे, तर अनेकांचे राजकारण असे धंदे करणाऱ्यांवर अवलंबून आहे.

या सर्व घडामोडींत पोलिसांचे या अवैध धंद्यांवरील नियंत्रण सुटले. राजकारण्यांच्या पाठबळामुळे या धंद्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. पूर्वी लपूनछपून वावरणारे हे लोक उजळ माथ्याने फिरू लागले. धंदेही उघडपणे सुरू झाले. उलट, त्यांच्याकडेच सत्ता असल्याने सामान्य जनतेलाच त्यांच्यासमोर झुकावे लागू लागले. तीच अवस्था पोलिसांची झाली. त्यातून अवैध धंदे करणे हा आपला हक्क आहे आणि पोलिसांना हप्ते देऊन आपण त्यांना पोसतो आहे, अशी उपकाराची भावना अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये निर्माण झाली. हप्तेखोरीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या पोलिसांना लाचारी पत्करत धंदेवाल्यांकडून हप्ते जमा करण्याची वेळ आली. आता खाली मान घालून जाण्याची वेळ पोलिसांवर आली. हप्ते दिले काय अन्‌ नाही दिले काय, धंद्यावर कारवाई करण्याचा नैतिक अधिकारच पोलिस गमावून बसले की काय, असेच वातावरण तयार झाले आहे. पोलिस कारवाईसाठी आलेच, तर कधी बदली करण्याची धमकी देऊन, खोट्या तक्रारी करण्याची भीती घालून, तर कधी हल्ला करून त्यांना परतवून लावण्याची पद्धत या धंदेवाल्यांनी सुरू केली आहे. कोणी ठामपणे कारवाई केलीच, तर अकोल्यासारख्या घटनाही घडू लागल्या. एकूणच, धंद्यांवर कारवाईसाठी येण्याची पोलिसांची हिंमत होऊ नये, असे वातावरण तयार करण्यात आले.

पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांना मात्र ही पद्धत मान्य नाही. अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते म्हणाले होते, ""अवैध धंदेवाले उजळ माथ्याने फिरता कामा नयेत. त्यांच्यासमोर पोलिसांनी झुकू नये. पोलिसांच्या आशीर्वादामुळे आपण धंदे करू शकतो, अशी उपकाराची भावना त्यांच्यामध्ये असली पाहिजे. आपण या जिल्ह्यातून बदलून गेल्यावर धंदे सुरू झालेच, तर किमान पोलिसांची प्रतिमा तरी बिघडू देऊ नका.''

कृष्ण प्रकाश यांचा हा सल्ला पोलिसांना कितपत पटला आहे, हे येणाऱ्या काळात कळेलच; पण सध्या धंदेवाल्यांची वाढलेली शिरजोरी पाहता, हे काम एकट्या पोलिसांचे राहिलेले नाही. धंदेवाल्यांना राजकारणात स्थान मिळू नये, यासाठी राजकीय पक्ष आणि लोकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे, की आज या लोकांनी पोलिसांना खिशात घालून आपला रंग दाखवायला सुरवात केली आहे. उद्या हेच लोक राजकीय नेते आणि जनतेशीही असेच वागून, सत्ता हा आपला हक्क आहे, अशा थाटात वावरतील, तो लोकशाहीला सर्वांत मोठा धोका ठरेल.

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

क्रष्ण्प्रकाश चांगले अधिकारी आहेत. त्यांनी सांगली मध्ये चांगले काम केले आहे.

नगर जिल्ह्यात चांगले काम करतील अशी आशा करु या.