शनिवार, १७ जुलै, २०१०

गावोगावी पसरलेत गावठी कट्टे!

पूर्वी स्वसंरक्षणासाठी लोक घराघरांत लाठ्या-काठ्या आणि कुऱ्हाडी ठेवत. भांडणे झाली की त्यांचा वापर होत असे. आता त्यांची जागा बेकायदा गावठी कट्ट्यांनी (पिस्तूल) घेतली आहे. गावागावांत हे गावठी कट्टे पोचले आहेत. स्वस्तात आणि सहज उपलब्ध होणारे हे गावठी कट्टे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्या पोलिसांनी त्याविरोधात मोहीम उघडून काही प्रकरणे उघडकीस आणली असली, तरी हे केवळ हिमनगाचे टोक आहे.

मध्य प्रदेशातून नगर जिल्ह्यात गावठी कट्टे आणून विकणारी यंत्रणाच कार्यरत आहे. ती एवढी फोफावली आहे, की पोलिस अद्याप तिच्या मुळापर्यंत जाऊ शकले नाहीत. वाळूतस्करी, गुंडगिरी, राजकारणातील गुंडगिरी आणि चोऱ्यामाऱ्यांसाठी गावठी कट्टे वापरले जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांकडे असे कट्टे हमखास असतात. हे कट्टे घेऊन खुलेआम फिरणारी ही मंडळी राजकीय पक्षांच्या बैठका, निवडणुका, सभा-समारंभातही आलेली पहायला मिळतात. पोलिसांना मात्र ते सापडत नाहीत, हेही विशेष. संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या वास्तव्याने पावन झालेली नेवासे भूमीही याला अपवाद नाही. उलट तेथेच जास्त प्रमाणात या घटना घडत आहेत. वाळूतस्करी हे या मागील प्रमुख कारण आहे. पूर्वी चंदन तस्करीतून जसा अफाट पैसा मिळायचा, तसा आता वाळूतस्करीतून मिळतो आहे. प्रत्यक्ष वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांबरोबरच गाड्या भरणारे, भरून देणारे, त्यासाठी मदत करणारे, नदीकाठी मद्य आणि खाद्यपदार्थांची विक्री करणारे, सरकारी यंत्रणेला "मॅनेज' करण्यासाठी दलाल म्हणून काम करणारे, या सर्वांकडे मोठ्या प्रमाणावर कमी कष्टातील पैसे येत आहेत. या लोकांच्या मनात असलेली एक अनामिक भीती, आपसांतील स्पर्धा आणि "स्टेट्‌स सिंबॉल' म्हणून गावठी कट्टे बाळगण्याचे प्रमाण वाढले आहे. "सुपारी गुंड', टपोरेगिरी करणारे महाविद्यालयीन युवक ते भुरट्या चोरांपर्यंत सर्वांच्या कमरेला गावठी कट्टे लटकताना दिसतात.

आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू होत आहेत. या काळातही गावठी कट्ट्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या काळात परवानाधारक शस्त्रे जमा करून घेतली जातात. त्यामुळे निवडणुकीत दहशत करण्यासाठी अशी बेकायदा शस्त्रे परवडत असल्याने लोकांचा त्याकडे कल आहे. नगरमध्ये ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज भरतानाच एक जण असे शस्त्र घेऊन आलेला असताना पकडला गेला. यावरून आगामी निवडणुकांमध्ये अशा शस्त्रांचा वापर होणार हे स्पष्ट झाले आहे.

सुमारे महिनाभरापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील दोन टोळ्या उघडकीस आणल्या आहेत. त्यातील एका टोळीचा म्होरक्‍या तर तुरुंगातून याची सूत्रे चालवीत होता. आतापर्यंत 22 जणांना अटक करून त्यांच्याकडून 13 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. एका अंदाजानुसार जिल्ह्यात वितरित झालेल्या गावठी कट्ट्यांची संख्या यापेक्षा किती तरी जास्त आहे. शिवाय गुन्हे शाखेशिवाय इतर पोलिसांचे याकडे लक्षही नाही. सध्या सुरू असलेला तपासही फार काही चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असेही म्हणता येणार नाही. त्यामुळेच अशा लोकांचे फावते आहे. मुळात प्रश्‍न असा आहे की परराज्यांतून आलेली ही शस्त्रे गावोगावी वितरित होईपर्यंत पोलिसांना कसे कळाले नाही? एखाद्या गुन्ह्यात शस्त्र मिळाले, तर त्याचा सखोल तपास करून पोलिस मुळापर्यंत का गेले नाहीत? तुरुंगातील आरोपी ही टोळी चालवीत असताना तेथे नियुक्त केलेले पोलिस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी झोपले होते का? या सर्व घटना एका रात्रीतून घडलेल्या नाहीत. बऱ्याच काळापासून हे प्रकार सुरू असावेत. या टोळ्यांकडून पद्धतशीरपणे शस्त्रे वितरित केली जात असताना पोलिसांनाही त्याची माहिती असणारच. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले असावे, असे म्हणण्यास वाव आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: