सोमवार, १९ जुलै, २०१०

नगर जिल्ह्यातील "सोनेरी टोळ्या'

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने संबंधितांना निर्जन भागात आणून लुटमार करण्याच्या घटना नगर जिल्ह्याच्या काही भागांत वारंवार घडतात. असे गुन्हे करणाऱ्या टोळ्याच जिल्ह्यात कार्यरत असून, अद्याप त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई झालेली नाही. मुख्य म्हणजे, चोरीचा माल किंवा गुप्तधन खरेदी करणे हाही गुन्हाच असल्याने, हव्यासापोटी तो घेण्यासाठी येणाऱ्यांवरही कारवाई होण्याची गरज आहे.
जिल्ह्यात श्रीगोंदे तालुका, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे तालुक्‍यांतील काही गावांत असे गुन्हे वारंवार घडतात. पोलिसी भाषेत त्यांना "ड्रॉप' असे म्हटले जाते. श्रीगोंदे तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा गुन्हे घडल्याने व दूरदूरचे लोक यात फसले गेल्याने या भागाची अपकीर्ती राज्यभर पसरली आहे, तरीही लोक अशा आमिषाला बळी पडतात. हा त्यांचा केवळ भोळेपणा नसतो, तर हव्यासापोटी जाणीपूर्वक केलेली ती कृती असते. त्यामुळे अशा प्रकारांमध्ये लुटमार करणाऱ्यांबरोबरच चोरीचा माल घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फिर्यादींवरही गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांनी यासाठी आणलेला पैसाही कष्टाचा असतोच असे नाही.

मोठ्या शहरांतील व्यापारी, व्यावयायिक यांचा विश्‍वास संपादन करून त्यांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले जाते. कधी हा माल लुटीतील असल्याचे, तर कधी गुप्तधन असल्याचे सांगण्यात येते. पैसे घेऊन हा माल घेण्यासाठी आलेल्यांची पिटाई करून लूट केली जाते. असा हा ठरलेला "पॅटर्न' आहे. त्यामध्ये ग्राहक पटविणारा मध्यस्थ, प्रत्यक्ष लुटमार करणारे लोक आणि काही प्रमाणात गुन्हा दडपण्यास किंवा सौम्य कारवाई करण्यास मदत करणारे पोलिस यांची वाटणी ठरलेली असते. घटनेच्या वेळी माणूस गांगरून जातो. पैशाची बॅग घेऊन, तसेच मोबाईल, अंगावरील दागिने घेऊन गुन्हेगार पलायन करतात. अशा वेळी मदतीलाही कोणी येत नाही. उलट, तुम्ही या फंदात का पडलात, म्हणून त्याची हेटाळणी होते. काही प्रकरणांत आरोपींनी नकली दागिने देऊन फसविले. काष्टी भागात काही भामट्यांनी कप-बशीचे बारीक तुकडे पोत्यात भरून ठेवले. यात चांदीची नाणी आहेत, असे भासविले. कप-बशीच्या तुकड्यांचा आवाज नाण्यांप्रमाणे भासला व सावज जाळ्यात अडकले. हे गुन्हे केवळ पुरुषच करीत नाहीत, तर यात महिला, मुले व वृद्धदेखील असतात. अशी कितीतरी उदाहरणे घडलेली आहेत.

दरोड्यांच्या तुलनेत "ड्रॉप'मध्ये यशाची हमी अधिक, भरपूर मलिदा, सुरक्षितता व गुन्ह्याची तीव्रता कमी करणारी यंत्रणा. यामुळे गुन्हेगारांचे फावत गेले. दोन लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत येथे "ड्रॉप' झाले. आजवर लुटण्यात आलेली रक्कम काही कोटी रुपये असेल. यात आरोपींच्या अटकेचे आणि शिक्षेचे प्रमाणही कमीच आहे. काही प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मध्यंतरी हे "ड्रॉप' थंडावले होते. असे गुन्हे घडू नयेत, यासाठी केवळ पोलिसांची ठोस भूमिका पुरेशी नाही. अचानक धनलाभाचा हव्यास असणारे सावज जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हे प्रकार होणारच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: