सायंकाळच्या वेळी भर बाजारपेठेतील सराफी दुकानात जायचे, दगडफेक करून दशहत पसरवायची, रस्त्यावर भांडणे झाल्याचा बनाव करून गर्दीचे लक्ष वेधायचे अन् दुकानात घुसून सोन्याचे दागिने लुटून पळ काढायचा, अशा पद्धतीचे दरोडे घालणाऱ्या टोळीने तीन वर्षांपूर्वी राज्यभर उच्छाद मांडला होता. त्या टोळीचा प्रमुख दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्या (मूळ रा. गुणवडी, ता. नगर) आज पहाटे पकडला गेला. भुरट्या चोऱ्या करणाऱ्या नांगऱ्याने अशाच चोऱ्या करणाऱ्यांना एकत्र करून ही "सोनेरी' टोळी तयार केली व त्यांचा "डॉन' बनला.
गेल्या चार वर्षांपासून पोलिस ज्याच्या मागावर होते, त्या नांगऱ्याला आज पहाटे आष्टी (ता. बीड) शिवारात पकडण्यात सोलापूर पोलिसांना यश आले. या नांगऱ्याचा इतिहासही तसा रंजक आहे. सुरवातीला भुरट्या चोऱ्या करणारे ते एक अल्पवयीन पोर होते. पाच वर्षांपूर्वी रागाच्या भारात त्याने पत्नीच्या तोंडात गोळ्या झाडून तिचा खून केला. त्यामध्ये पोलिसांनी त्याला अटक केली; मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात झाली. चपळ आणि चतुर असलेल्या दीपकने तेथून पळ काढला. त्या काळात विश्वास नांगरे-पाटील नगरला पोलिस अधीक्षक होते. त्यांनी गुन्हेगारांवर मोठा वचक बसविला होता. भानसहिवरे (ता. नेवासे) येथील एका दरोडे प्रकरणातील मुख्य आरोपी चकमकीत मारला गेला होता. तो दीपकचा मित्र होता. सुधारगृहातून पळालेल्या दीपकचाही पोलिस शोध घेत होते. आता आपली खैर नाही, नांगरे-पाटील आपल्याला सोडणार नाहीत, या भीतीने दीपक नगर जिल्ह्यातून मराठवाड्यात पळून गेला. तिकडे गेल्यावर त्याने आपले नाव बदलले. नांगरे यांच्याबद्दलीची भीती मनात कायम असल्याने त्याने आपले नाव "नांगऱ्या' असेच करून घेतले. मराठवाड्यातील त्याच्या समाजातील लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी तेथे जाऊन त्याने दुसरे लग्न केले.
याच काळात आंतरराज्य टोळीतील एक गुन्हेगार फपड्या काळे याच्याशी संपर्कात तो आला. सराफी दुकानांवर दरोडे घालण्याची नवी कल्पना फपड्यानेच त्याला शिकविली. भुरट्या चोऱ्या करण्यापेक्षा हा चांगला मार्ग असल्याचे चाणाक्ष नांगऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने यासाठी आपली टोळी तयार करण्यास सुरवात केली. काही नातेवाइकांच्या मदतीने त्याने टोळी तयार केली. शशिकांत डॉक्टऱ्या भोसले ऊर्फ काल्या (रा. वलघूड, ता. श्रीगोंदे) हा त्याचा विश्वासू साथीदार. त्याच्या मदतीने त्याने टोळी वाढवीत नेली. पहिला प्रयोग मराठवाड्यात करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी राज्यभर उच्छाद मांडला. एकापाठोपाठ एक सराफी दुकाने लुटली जाऊ लागली. आरोपी मात्र सापडत नव्हते. सराफी व्यावसायिकांमध्ये प्रचंड दहशत आणि संताप निर्माण झाला. मोर्चे निघू लागले; मात्र आरोपी सापडत नव्हते आणि गुन्हेही थांबत नव्हते.
नगर जिल्ह्यातही असे गुन्हे घडले. सुरवातीला हे गुन्हे कोण करते आहे, याचीही पोलिसांना माहिती मिळत नव्हती. शेवटी गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली. नगरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील रामानंद यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील इतरही अधिकारी नियुक्त करण्यात आले. उपअधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस निरीक्षक देविदास सोनवणे यांनी यामध्ये विशेष कामगिरी करून या टोळीचा छडा लावला. महिनाभरातच सुमारे 33 आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर सुमारे 49 आरोपींविरुद्ध "मोक्का' लावण्यात आला. काल्या, शेऱ्या, श्रीमंत्या असे अनेक मोहरे पोलिसांच्या गळाला लागले. गुन्ह्यांचे सत्रही थांबले; मात्र नांगऱ्या काही सापडला नाही. त्याची आई, भाऊ आणि अन्य नातेवाइकांनाही अटक झाली, तरीही नांगऱ्या सापडत नव्हता. मधल्या काळात त्याने तिसरे लग्न केले. सतत जागा बदलत राहणारा नांगऱ्या मोबाईलच्या मोहात अडकत नव्हता. त्यामुळे तो सापडणे अवघड झाले होते. अखेर तो पकडला गेला.
सुमन काळे प्रकरणाचा व्यत्यय
या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांची खबरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुमन काळे या महिलेचा नगर पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे तपास पथक संशयाच्या फेऱ्यात अडकले. पुढे पथकातील अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले. तेव्हापासून या प्रकरणाचा तपासच थंड झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा