पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी जिल्ह्यात सूत्रे घेऊन आता एक महिना पूर्ण झाला. त्यांनी आल्यावर सांगितल्याप्रमाणे, प्रथम जिल्ह्याचा अभ्यास करून आता कामाला सुरवात केली आहे. त्यांचा मुख्य भर जिल्ह्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यावर आहे. त्याकरिता त्यांनी जनतेसाठी काही योजना जाहीर केल्या आहेत. आणखी काही जाहीर केल्या जाणार आहेत. लोकांना पोलिस अधीक्षकांशी थेट बोलता यावे, अवैध धंद्यांची माहिती, गुन्हेगारांची माहिती, तक्रारी, सूचना करता याव्यात, यासाठी पोलिस अक्षीक्षकांनी आपला मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. एकूणच, कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी आपल्या बाजूने तयारी सुरू केली आहे.
यासाठी लोकांनी पुढे यावे, लोकांनी गुन्हेगारीबद्दल बोलावे, तक्रारी कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. "वाइटाला वाईट म्हणण्यात मोठी ताकद आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये वाइटाला रोखण्याची नैतिक ताकद यावी,' अशी त्यांची अपेक्षा योग्यच आहे. लोकांचाच वचक निर्माण झाल्याशिवाय गुन्हेगारीला आळा बसू शकत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी. कायद्याचे राज्य प्रस्थापित करायचे असेल, तर या गोष्टी आवश्यकच; पण या गोष्टी सहजासहजी होणाऱ्या नाहीत. आधी जनता व पोलिसांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागले, तेव्हाच लोक पुढे येतील. पोलिस हे जनतेचे मित्र नसून गुन्हेगारांचे पाठीराखे आहेत, राजकीय लोकांच्या हातचे बाहुले आहेत, ही प्रतिमा सर्वप्रथम पुसून काढावी लागेल. पोलिसांच्या कृतीमधून हा संदेश जनेतेमध्ये गेला पाहिजे. त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय धोपावकर यांचे उदाहरण देता येईल. त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केल्याने आता या विभागाकडे तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
सध्या पोलिस दलातील चित्र पाहिले, तर कायद्याच्या राज्यापेक्षा तेथे "काय द्यायचे ?' राज्यच सुरू असल्याचे दिसते. कृष्ण प्रकाश यांच्यासारखे कडक शिस्तीचे अधिकारी येऊनही पोलिसांतील लाचखोरी अद्याप थांबलेली नाही. ते आल्यापासून महिनाभरात दोन पोलिस लाच घेताना पकडले गेले. जनतेच्या कामासाठी लाच घेण्याचे प्रकार जोपर्यंत थांबत नाहीत, तोपर्यंत पोलिसांबद्दल लोकांच्या मनात विश्वास कसा संपादन होणार? अवैध धंद्यांचे हप्ते सोडले, तरी गुन्हा नोंदविण्यासाठी पैसे, न नोंदविता मिटविण्यासाठी पैसे, विविध दाखले, कागदपत्रे देण्यासाठी पैसे, न्यायालयात पोलिसांची बाजू न मांडण्यासाठी आणि मांडण्यासाठीही पैसे, असे पैसे मिळविण्याचे कितीतरी मार्ग पोलिसांनी शोधले आहेत. केवळ अधिकारीच नव्हे, तर कर्मचारीही बिनधास्तपणे मोठमोठ्या रकमा मागतात आणि वसूलही करतात. एखादा मोठा गुन्हा उघडकीस आला, की त्यात गुंतविण्याची धमकी देऊन पैसे वसूल करणारे महाभाग पोलिसही जिल्ह्यात कमी नाहीत. त्यामुळेच कित्येक पोलिस कर्मचाऱ्यांनी गडगंज संपत्ती कमावली आहे. गुन्हेगारी आणि राजकारण्यांसोबत त्यांचे संबंध आहेत. एका बाजूला गुन्हेगारी टोळ्या, त्यांना पाठीशी घालणारे राजकारणी, दुसरीकडे सामान्य जनतेला नाडणारे आणि गुन्हेगार व राजकारण्यांपुढे झुकणारे पोलिस, असे जर चित्र निर्माण झालेले असेल, तर सामान्य जनता कोणाबद्दल बोलणार, कोणाकडे बोलणार? कोणाला वाईट म्हणणार?
अर्थात, यावर मात करण्यासाठी कृष्ण प्रकाश यांनी सुरू केलेली योजना उपयुक्त ठरेल. मुकाटपणे अन्याय सहन करणाऱ्या लोकांना आता तक्रारी करण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांना अशा तक्रारी सांगणारे दररोज कित्येक दूरध्वनी येतील. त्यावर खरेच कारवाई होते आहे, हे लक्षात आल्यावर आणखी प्रमाण वाढेल. अर्थात याचा गैरवापर करून खोट्या तक्रारीही केल्या जाऊ शकतात. तसाच प्रकार गावात जाणाऱ्या पोलिसांकडूनही होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागेल. आपल्या जिल्ह्यात एजंटांची कमी नाही. त्यामुळे या पोलिसांचे गावपातळीवरही एजंट तयार होऊन तिकडे वेगळीच कामे सुरू व्हायची!
कृष्ण प्रकाश यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणाला शंका घेण्याचे कारण नाही. त्यांची काम करण्याची धडपड पाहता, त्यांना अपेक्षित असलेले कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते निश्चित प्रयत्न करतील. यासाठी खूप काम करावे लागणार आहे. अनेकांशी, विशेषतः राजकीय मंडळीशी वाईटपणा घ्यावा लागणार आहे, हेही त्यांनी गृहीत धरले असलेच. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कधी फौजदाराचे, रंजल्या-गांजलेल्यांच्या मदतीसाठी मोठ्या भावाचे, तर कधी पोलिसांना शिस्त लावण्यासाठी कुशल आणि कठोर प्रशासक होण्याचे काम त्यांना एकाच वेळी करावे लागणार आहे. त्या वेळी त्यांना अपेक्षित असलेला जनतेचा प्रतिसाद मिळेल आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा