मंगळवार, २५ मे, २०१०

पोलीस अधिकारी 'कामा'तून पळाले


'२६/११ हल्ल्याच्या रात्री अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते 'कामा' हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी झुंजत असताना आझाद मैदान पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेण्याऐवजी 'कामा' हॉस्पिटलमधून भ्याडासारखे पळून गेले' असा अत्यंत गंभीर ठपका कसाबवर खटला चालवणाऱ्या विशेष कोर्टाने ठेवल्याचे उघड झाले आहे.

या हल्ल्याबाबत विशेष कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत उपलब्ध झाली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावानिशी उल्लेख करत न्या. एम. एल. टाहलियांनी यांनी कडक शब्दांत त्यांची खरडपट्टी काढली आहे. सीएसटीमध्ये मृत्यूचे थैमान घातल्यानंतर कसाब आणि अबू इस्माईल हे दहशतवादी 'कामा' हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांना प्रतिकार केला तो सदानंद दाते आणि त्यांच्या पथकाने. आझाद मैदान पोलीस ठाण्यापासून सीएसटी व 'कामा' जवळच आहे. 'कामा'मध्ये शिरण्यापूवीर् दाते यांनी कॉन्स्टेबल सुरेश कदम यांना पोलीस ठाण्यातून काही बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि शस्त्रास्त्रे आणण्याचे आदेश दिले होते. पण, आपल्यासह सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर थोरावडे आणि इतर चार पोलीस अधिकारी दाते यांना मदत देण्याऐवजी 'कामा'च्या मागील गेटजवळ बोलेरो जीपमध्येच बसून राहिलो, अशी साक्ष स्वत: कदम यांनीच दिली होती.

मात्र, इतर कोणाच्याही साक्षीमध्ये बोलेरो जीप 'कामा'च्या मागील गेटवर असल्याचे स्पष्ट झाले नसल्याचा धागा न्या. टाहलियानी यांनी पकडला. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'कामा'मध्ये प्रवेश तर केला; परंतु, तेथे सुरू असलेली धुमश्चक्री पाहून आपला जीव वाचवण्यासाठी मागच्या मागे पळ काढला, असा निष्कर्ष कोर्टाने काढला. (Ma.Ta.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: