मंगळवार, ११ मे, २०१०

शनिशिंगणापुरातून चोरी झाली पण....


शनी देवाच्या कृपेमुळे गावात चोऱ्या होत नाहीत, म्हणून लोकांनी घराला दारेच बसविलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात सुरू असलेली प्रथा आजही सुरू आहे. त्यामुळे कितीही चांगले घर बांधले तरी त्याला दारे बसविली जात नाहीत. गावात चोरी झाली तरी शनीदेव त्याला अद्दल घडवितो, अशी लोकांची श्रद्धा आहे. दोन दिवसांपूर्वी याला बळकटी देणारी घटना या गावात घडली. औरंगाबादच्या चोरट्यांनी या गावाच्या हद्दीत एक तवेरा गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्या गाडीला अपघात होऊन ते पकडले गेले. गावाच्या सीमेबाहेर जाण्याअधीच पकडले जाऊन त्यांच्या हातात बेड्या पडल्या. यामध्ये योगायोग किती अन्‌ शनीची कृपा किती हे तेथील लोकच ठरू जाणे.
त्याचे असे झाले, औरंगाबादमधील किशोर गायकवाड याने सिडको भागात राहणाऱ्या वीरभद्र गादगे यांची तवेरा गाडी शिंगणापूला जायचे म्हणून भाड्याने ठरविली. ती घेऊन गाडीचा चालक विजयसिंग जागरवाल यांच्यासह गायकवाड शिंगणापूरकडे निघाला. वाटेत त्याने त्याचे आणखी सहा सहकारी गाडीत घेतले. रस्त्यात चालकाला मारहाण करून गाडी घेऊन पळून जायचे, असा त्यांचा बेत होता. त्यामुळे गाडी शनिशिंगणापूर जवळ येताच त्यांनी चालकाला चाकूचा धाक दाखवून गाडीच्या मागील सीटवर घेतले आणि त्यांचा एक सहकारी गाडी चालवू लागला. निर्जन ठिकाणी गेल्यावर चालकाला उतरवून देण्याची त्यांची योजना होती. मात्र भरधाव वेगाने गाडी चालविताना ती शिंगणापूर ट्रॅस्टच्या रूग्णालयाच्या भिंतीला धडकली.

हा प्रकार पाहणाऱ्या लोकांना वाटले शनिभक्तांच्या गाडीला अपघात झाला. त्यामुळे ते मदतीला धावले. त्यांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास सुरवात केली. पण ज्याला बाहेर काढले तो लगेच पळून जात होता. शेजारच्या उसाच्या शेतात आणि वाट दिसेल तिकडे गाडीतील तरुण पळत होते. हा प्रकार पाहून मदत करणारे ग्रामस्थही भांबावले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. गाडीत बांधून ठेवलेल्या चालकाने ग्रामस्थांना या चोरट्यांची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थ व पोलिस यांनी शोधाशोध करून मुख्य सूत्रधार गायकवाड याच्यासह तिघांना पकडले. वाहनाची चोरी टळली. तसा प्रयत्न करणारे आता पोलिस कोठडीची हवा खात आहेत.

या घटनेनंतर गावात शनी देवाच्या लिलेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावकऱ्यांच्या या श्रद्धेला आव्हान दिले होते. गावात जाऊन चोरी करून दाखविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेता पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन आतापर्यंत होऊ शकले नाही. आता मात्र ही घटना घडल्याने गावातील लोकांना आपली बाजू पटवून देण्याची संधी मिळाली आहे.

1 टिप्पणी:

DINESH NISANG म्हणाले...

कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ झाली म्हणायची