गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस दलात वेगळाच तंटा सुरू आहे. तो तंटा आहे दोन "आयपीएस' अधिकाऱ्यांचा. इतर काही अधिकारी आणि अवैध धंदेवाले त्याला खतपाणी घालत आहेत. एकीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेली जनता मात्र या नव्या तंट्यामुळे आणखीच वैतागली आहे. इतरांचे तंटे मिटविणाऱ्या पोलिसांतील हा तंटा कोणी मिटवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलिस अधीक्षक विजय चव्हाण आणि परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्यामधील हा तंटा आहे. काही काळ आतल्याआत धुमसत असलेल्या या तंट्याला आता जाहीर स्वरूप आले आहे. इतर अधिकारी, कर्मचारी आणि काही अवैध धंदेवाल्यांनी हा तंटा लावून दिला आहे. अर्थात हे जाणून घेण्यास या दोन्ही अधिकाऱ्यांनी चूक केली, हेही दुर्लक्षून चालणार नाही. प्रशिक्षण संपल्यानंतर परिविक्षाधीन काळासाठी सिंग नगरमध्ये आल्या. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना नगर शहरात नियुक्ती देण्यात आली आहे. सुरवातीला त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसोबत काम केले. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना या काळात जास्तीत जास्त धडाडीने काम करून प्रमाणपत्र मिळवावी लागतात, ती त्यांना पुढील काळासाठी उपयुक्त ठरतात. शिवाय कामाचा प्रत्यक्ष अनुभवही येतो. त्यासाठी त्यांना विविध ठिकाणी नियुक्ती दिली जाते. अवैध धंद्यावर छापे घातल्यानंतर धडाडी अधिक दिसून येत असल्याने परिविक्षीधन अधिकाऱ्यांचा त्यावर भर असतो. सिंग यांनीही त्याच पद्धतीने कामाला सुरवात केली. सुरवातीचे काही छापे त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन घातले. त्यानंतर मात्र त्यांना पोलिस दलातील इतर काही पोलिस आणि माहिती देणाऱ्या इतर व्यक्ती भेटल्या. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेला सोडून स्वतंत्रपणे छापे घालण्यास सुरवात केली. छापे घातल्यानंतर त्यांना प्रसिद्धीही मोठी मिळून लागली. बऱ्याचदा तर छाप्याच्यावेळीच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासमवेत असत. तशी व्यवस्था त्यांच्यासोबत असलेले पोलिस करीत असत. छाप्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना अनेकदा सिंग आपले काम सांगताना स्थानिक दलावर टिकाही करीत. त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्याही वागणुकीत फरक पडला. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचाही ते अवम
ान करू लागले. सिंग यांचा हा करिष्मा पाहून अवैध धंदेवाल्यांनी आपल्यातील खुन्नस काढून घेण्यास सुरवात केली. मुळात येथील अनेक पोलिसांचे धंदेवाल्यांशी संबंध आहेत. केवळ संबंध नाहीत, तर त्यावरून त्यांच्यात गटबाजी आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी धंद्यावर छापा घालण्यासाठी त्याची माहिती सिंग यांच्यापर्यंत या पोलिसांमार्फत पोचविली जाऊ लागली. त्यानुसार कारवाई होऊ लागल्याने हे प्रकार वाढतच गेले.
यामुळे दुखावल्या गेलेल्या पोलिसांच्या एका गटाने पोलिस अधीक्षक चव्हाण यांच्यापर्यंत या गोष्टी पोचविल्या. त्यांनी यामध्ये लक्ष घालून सिंग यांना सावधगिरीचा इशारा दिला. मात्र, सिंग यांच्यासोबत फिरणाऱ्या पोलिसांनी त्यांचा वेगळा अर्थ काढून वादाची ठिणगी पाडली. दरम्यानच्या काळात पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियुक्तीची मुदत संपल्याने सिंग यांना नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना पूर्वी देण्यात आलेले जिल्हा विशेष शाखेचे वाहन काढून घेण्यात आले. त्याचेही मोठे राजकारण झाल्याने गैरसमजात आणखी भर पडली. दुसरीकडे तालुका पोलिस ठाणे दिले असतानाही सिंग यांनी नगर शहरासह इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत छापे घालणे सुरूच ठेवले. त्यांच्या भोवतीच्या मंडळींनी चव्हाण यांच्याबद्दल वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवकांकडे तक्रारी पोचविण्यास सुरवात केली. त्यामुळे चव्हाणही अस्वस्थ झाले. त्यातूनच त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुईछत्तिशी येथील कथित डान्सबारवर छापा घातला. दुसऱ्या बाजूकडून त्याचेही भांडवल करून हा डाव चव्हाण यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे जनतेमध्ये या तंट्याबद्दल गैरसमज पसरविणारे वातावरण तयार केले जात आहे. सिंग यांना नगरलाच पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करा, अशी अवास्तव मागणीही पुढे येत आहे. ज्यांच्या परिविक्षाधीन काळाचे आणखी काही टप्पे आणि पोलिस अधीक्षक होईपर्यंतचा नोकरीचा बराचसा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे, त्यांना लगेच पोलिस अधीक्षक कसे करता येईल? जनतेमध्ये मात्र यातून बरेच गैरसमज पसरण्यास सुरवात झाली आहे.
या तंट्यात दोन्ही अधिकाऱ्यांची चूक आहे. सिंग यांनी आपल्याभोवतीची माणसे तपासून सरळमार्गी काम केले असते, तर ते अधिक प्रभावी आणि वादातीत झाले असते. यापूर्वी अविनाशकुमार किंवा अन्य अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने काम करून आपला ठसा उमटविला होता. छापे घालताना पोलिस यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेण्याची गरज नव्हती. गुन्हेगारांवर कारवाई करताना अनेकदा त्यांच्याच क्षेत्रातील लोकांचा वापर करावा लागतो, हेही खरे पण त्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी होती. जिल्ह्यात कामासाठी मोठा वाव असताना केवळ ठराविक धंद्यांवरच कारवाई केल्यानेही अशी परिस्थिती ओढावली असावी. कित्येक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, सराफी दुकानांवर दरोडे घालणारा नांगऱ्या, अंबिका डुकरेचा खून करणारा अनिल जगन्नाथ पवार असे किती तरी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी वर्षानुवर्षे फरारी आहेत. त्यांना पकडले असते, महिलांची छेड काढणाऱ्या रोमिओंना चोप दिला असता, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले व्यवसाय, टपोरेगिरी करत फिरणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त केला असता, मंगळसूत्र चोरणाऱ्यांच्या हातात बेड्या ठोकल्या असत्या, शहर आणि तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असती, तर त्यांचे काम अधिक प्रभावी झाले असते. मुळात "सिस्टिम'मध्ये राहून काम करण्याची सवय लावून घेणे, हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंगा न घेता, त्यांना विश्वासात घेऊनच काम करण्याची पद्धत त्यांनी आतापासूनच अवलंबण्यास हवी आहे. पोलिस दलाच्या शिस्तीसाठी ती आवश्यक बाबही आहे.
पोलिस अधीक्षक चव्हाण यांनीही त्यांना विश्वासात न घेता केलेल्या या कामाबद्दल एवढे मनाला लावून घ्यायला नको होते. शेवटी तेच जिल्ह्याचे प्रमुख आहेत. इतर अधिकारी जर ही कामे करीत नसतील, तर त्यांनी ती अशा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांकडून करून घेणे गरजेचे होते; परंतु त्यांच्यात सुरवातीपासूनच फारसा संवाद झाला नसावा. दोघांच्याही भोवती असलेल्या टोळक्यांनी त्यांच्यामध्ये संवाद होऊ न देता विसंवादच वाढल्याने हा तंटा उद्भवला आहे. आता जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पी अन्बलगन यांनीच यात लक्ष घालून तंटा मिटविला पाहिजे आणि सिंग यांचा राहिलेला दोन महिन्यांचा कालावधी चांगला जाईल व त्यांच्याकडून राहिलेली कामे होतील, आणि चांगले प्रशिक्षण व अनुभव मिळेल, असे पाहिले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा