शुक्रवार, ७ मे, २०१०

कसाबची फाशी प्रत्यक्षात केव्हा ?


 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला आज विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे या शिक्षेची लगेचच अंमलबजावणी होऊ शकणार नाही. मुख्य म्हणजे यापूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या 29 जणांची प्रकरणे अद्याप राष्ट्रपतींकडे पडून आहेत. त्यामध्ये 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी, राजीव गांधी हत्येच्या प्रकरणातील आरोपीस, संसदेवरील हल्ल्यातील मोहमद अफजल गुरू अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची आरोपींच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या "प्रतीक्षा' यादीत कसाबचा क्रमांक तिसावा लागेल.
अर्थात कसाबचे प्रकरण यापेक्षा विशेष प्राधान्याने घेतले तरी त्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेतून ते न्यावे लागणार आहे. सत्र न्यायायलयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाकडून शिक्का मोर्तब करून घ्यावे लागत असते. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपीला सहा महिन्यांची मुदत असते. जरी आरोपीने अपील केले नाही, तरी सरकारकडूनच हे प्रकरण उच्च न्यायालयात मान्यतेसाठी नेले जाते. त्यासाठी सत्र न्यायालयातील निकालाची कागदपत्रे संकलित करून पाठविली जातात. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. मुळातच या प्रकरणातील कागदपत्रेही खूप मोठ्या संख्येने आहेत.

हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर तेथे पुन्हा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होतो. प्रत्यक्षात साक्षिदारांची तपासणी व उलट तपासणी तेथे चालत नसली तरी त्यासंबंधी सत्र न्यायालयात नोंदविण्यात आलेले जबाब मात्र तपासले जातात. उच्च न्यायालयाने फाशीवर शिक्षा मोर्तब केल्यानंतर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा असते. त्यालाही मुदत असते. तेथेही शिक्षा झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असते. तेथेही अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष फाशी देण्याचा दिवस ठरविला जातो. ती प्रक्रियाही मोठी किचकट आहे. कसाबच्या प्रकरणात आतापर्यंतचे कामकाज पाहिले तर सरकार पक्षाने कोणताही धोका न पत्करता सर्व प्रक्रिया ठरल्याप्रमाणे होऊ दिल्याचे दिसते. कसाबने गुन्हा कबुल करूनही त्याच्याविरूद्धचा खटला चालवूनच निकाल देण्यात आला. तसेच यापुढील प्रक्रियेच्या बाबतीत केले जाऊ शकते. त्यामुळे या वर्षात तरी शिक्षेची प्रत्यक्ष अमंलबजवाणी होईल, असे वाटत नाही. (e Sakal)

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

kasabla nantar agodar tyacya vakilala chagla chopa