लोणी खुर्द (ता. राहाता) येथील श्रीराम भास्कर दिघे (वय 17) या महाविद्यालयीन युवकाने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव रचला आणि आई-वडिलांसह नातलगांमध्ये घबराट उडवून दिली. लोणी पोलिसांनी त्याला 24 तासांच्या आत पुण्यात जाऊन ताब्यात घेऊन घरी आणल्यानंतर या नाट्यामागील गूढ उकलले.
श्रीराम हा नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला. परीक्षेत 44 टक्केच गुण मिळाल्यामुळे त्याने खाडाखोड करून गुणपत्रकावर 74 टक्के गुण वाढविले. श्रीरामच्या वडिलांना या प्रकाराचा संशय आला. महाविद्यालयात जाऊन या प्रकाराची चौकशीच करतो, असे ते श्रीरामला म्हणाले. त्यामुळे रागावलेला श्रीराम पहाटे घरातून बेपत्ता झाला. जाताना त्याने कपाटातून 50 हजार रुपये नेले. स्वतःचा मोबाईल घरी ठेवून गड्याच्या नावावरील सिम कार्ड बरोबर नेले.
श्रीरामच्या वडिलांना गड्याच्या क्रमांकावरून फोन आला. "तुमच्याकडे द्राक्षाचे भरपूर पैसे आहेत. तुमचा मुलगा पाहिजे असेल, तर हॉटेल ताजला 50 लाख रुपये आजच घेऊन या,' अशी धमकी श्रीरामच्या वडिलांना देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता पुण्यातील बुधवार पेठेतून दूरध्वनी आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खंडणीसाठीच श्रीरामचे अपहरण झाल्याचा दिघे कुटुंबीयांचा संशय बळावला. दरम्यान, श्रीरामचा त्याच्या वडिलांना पुन्हा दूरध्वनी आला. आपल्याला खूप मारले आहे हे पटवून देण्यासाठी अनोळखी आवाजात श्रीरामच्या वडिलांशी बोलणेही करवून दिले.
पोलिसनी मोबाईल क्रमांक व पुण्यातील पीसीओ क्रमांकाच्या आधारे तपासाची सूत्रे गतीने हलविली. यांनी शिवाजीनगर बस स्थानकाजवळील एका लॉजमधून श्रीरामला ताब्यात घेतले. श्रीरामने आपल्या मेहुण्याच्या नावावर लॉजमध्ये स्वतःची नोंद केली होती. त्याने लॅपटॉप, मोबाईल बॅग व कपड्यांसह 40 हजारांची खरेदी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा