बुधवार, ३ मार्च, २०१०

तंटामुक्तीचा एकतर्फी उपदेश!

राजकारणी मंडळी सत्तेसाठी एकमेकांशी भांडत आहेत, सरकारमधील घटक पक्षांच्या मंत्र्यांचे आपसांत पटत नाही, एकाच पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये तंटे आहेत, पुढारी मंडळी पदांसाठी भांडत आहेत, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोक्‍याच्या जागांवरील बदल्यांवरून वाद आहेत, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मंडळींमध्येही श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावर आपसांत मतभेद आहेत... अशा स्थितीत गावातल्या लोकांकडून मात्र तंटामुक्तीची अपेक्षा केली जात आहे. त्यासाठी गावांना रोख बक्षिसे देण्यात येत असली, तरी त्यांच्यासमोर ठेवण्यासाठी तंटामुक्तीचा आदर्श मात्र नाही.

राज्य सरकारने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे तिसरे वर्ष आता संपत आले आहे. राज्यातील हजारांवर गावे आतापर्यंत याद्वारे तंटामुक्त झाली आहेत. या वर्षीही बहुतांश गावे या मोहिमेत सहभागी झाली आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मोहीम आहे. ग्रामविकासमंत्री असताना त्यांनीच आखलेल्या स्वच्छता अभियानाला चांगले यश मिळाले होते. ती मोहीम अद्याप सुरू आहे. त्याच धर्तीवर त्यांनी गृहमंत्री झाल्यावर तंटामुक्तीची मोहीम आखली. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यावर, स्वच्छतेपेक्षा तंटामुक्तीचे काम अवघड असल्याचे आढळून येते. चोऱ्या आणि भांडणे या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. त्यांचे स्वरूप मात्र बदलत आहे. असे असले, तरी आबांनी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आणि ती राबवायलाही सुरवात केली. तिचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, ही गोष्टही नाकारून चालणार नाही. आपले तंटे आपणच मिटविले पाहिजेत, तंट्यांमुळे सर्वांचेच नुकसान होते, याची जाणीव गावकऱ्यांना झाली. त्यामुळे गावेच्या गावे यासाठी पुढे आली.

मात्र, यानिमित्ताने एक विरोधाभास समोर आला. ज्यांनी समाजाचे नेतृत्व करायचे, तंटे करू नका असा उपदेश करायचा, तेच आपसांत भांडत असतील, तर जनतेने कोणता आदर्श घ्यायचा? ज्यांना आदर्श मानले, ती मंडळी आपसांत भांडत असेल, तर आपसांतील तंटे मिटवायला जनतेला प्रोत्साहन कसे मिळणार? आपसांत भांडणारी नेतेमंडळी आणि सरकारी अधिकारी तरी त्यांना कोणत्या तोंडाने तसा उपदेश करणार? त्यांचा हा उपदेश एकतर्फी ठरतो.

गावातील भांडणे ही मालमत्ता आणि राजकारणावरून अधिक प्रमाणात होतात. त्याच कारणांवरून अधिकारी आणि पुढारीही भांडत आहेतच. त्यांना कोणी "तंटामुक्त व्हा' म्हटले तर त्यांना तरी ते शक्‍य आहे का? सत्ता, पद आणि पैसा या त्यांना जीवनमरणाच्या गोष्टी वाटत असतील, तर शेतकऱ्यांनाही त्यांच्या बांधाच्या बाबतीत असे का वाटू नये? दोघा राजकीय पक्षांच्या नेत्यांची भांडणे न्यायालयात जात असतील, दोघा मंत्र्यांतील वाद सोडवायला दिल्ली गाठावी लागत असेल, त्यांच्या वादाच्या बातम्यांनीच वृत्तपत्रांचे रकाने भरत असतील, तर सामान्यांना "तंटामुक्त व्हा' असे कोण सांगणार? तरीही या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहता, या सर्वांपेक्षा आपला गावाकडचा माणूस अधिक समजदार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

1 टिप्पणी:

आशिष देशपांडे म्हणाले...

"या सर्वांपेक्षा आपला गावाकडचा माणूस अधिक समजदार आहे"---He awadale...aankhi baryach ankhi te khara aahe!