नईम शेख
भिंगार येथे लष्कराचा स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करून त्याच्या आईकडून तीन लाखांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. अपहृत तरुणाची सुखरूप सुटकाही करण्यात आली असून, येथील कुख्यात आरोपी "टकलू'सह त्याच्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल, दोन मारुती व्हॅन, दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी माहिती अशी ः भिंगारमध्ये लष्करात नोकरीला असलेल्या जमिला शेख अब्दुल रहीम यांनी भिंगार कॅंप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, की लष्करातच स्वयंपाकी म्हणून काम करणारा त्यांचा मुलगा नईम अब्दुल रहीम शेख (वय 25) हा 14 मार्चला सायंकाळी स्कूटी घेऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला. तेव्हा काही लोकांनी त्याचे अपहरण केले असून, सुटकेसाठी तीन लाखांची खंडणी ते मागत आहेत. त्यानुसार भिंगार कॅंपचे सहायक पोलिस निरीक्षक बाबूराव गंजे यांनी गुन्हा दाखल करवून घेतला. अपहरण केलेल्या नईमच्या मोबाईलवरून त्याच्या आईशी संपर्क करून आरोपी खंडणीसाठी धमकावत होते.
याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिस अधीक्षक विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक रजपूत यांनी तपास सुरू केला. फिर्यादी महिलेच्या मदतीने त्यांनी आरोपींना नटराज हॉटेलजळच्या दर्ग्याजवळ पैसे घेण्यास बोलाविले. तेथे सापळा लावण्याचे निश्चित झाले. आरोपींनी मंगळवारी पहाटे तीन वाजता तेथे येण्याचे कबूल केले. पथकाने नटराज हॉटेलजवळ सापळा रचला.
ठरल्यानुसार दोघे आरोपी दुचाकीवरून पैसे घेण्यासाठी आले. पोलिसांनी त्या महिलेजवळ नकली नोटांची बंडले करून दिली होती. ते पैसे देताना महिलेने "आपला मुलगा कोठे आहे,' याची विचारणा केली; मात्र आरोपी उत्तर न देताच पैसे घेऊन पळून जाऊ लागले. त्या गडबडीत दुभाजकाला दुचाकी धडकून ते कलंडले. तोपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. अशाही स्थितीत आरोपींनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. ते दोघे आरोपी म्हणजे घडफोड्या आणि चोऱ्यांचे कित्येक गुन्हे दाखल असलेला शेख इसरार ऊर्फ टकलू मुक्तार शेख (वय 25, रा. कोठला) आणि त्याचा साथीदार अमजद ऊर्फ जवई हमीद शेख (वय 26, रा. कोठला) हे होते. त्यांच्याकडे अपहृत तरुणाबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्याला केडगावजळ लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिस त्यांना घेऊन तिकडे गेले. तेथे एका व्हॅनमध्ये नईमला ठेवले होते. त्या व्हॅनमध्ये असलेला तिसरा अरोपी सिकंदर नजीर शेख (वय 28, रा. कोठला) यालाही अटक करण्यात आली. नईमची त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली. व्हॅनवर लक्ष ठेवून असलेले अन्य तिघे आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
आरोपींनी पाळत ठेवून हा गुन्हा केला. फरार असलेला आरोपींचा एक साथीदार नईम व त्याच्या आईच्या ओळखीचा आहे. नईमच्या आईने काही दिवसांपूर्वीच दीड लाख रुपयांची ठेव बॅंकेत ठेवली होती. शिवाय, या महिन्यातच नईमचे लग्न होणार होते. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे असल्याचा अंदाज आल्याने आरोपींनी कट करून हा गुन्हा केला. नईम पेट्रोल पंपावर आल्यावर दोघा आरोपींनी तेथे जाऊन त्याला सांगितले, की तू झेंडीगेटला एका तरुणीची छेड काढली आहे. ते लोक तुला शोधत आहेत. त्यामुळे आपणच तेथे जाऊ व प्रकरण मिटवून घेऊ. असे सांगून आरोपींनी त्याला तेथून नेले. नंतर त्याच्याकडील स्कूटी नटराज हॉटेलजवळच्या पाण्याच्या टाकीखाली लावून त्याला व्हॅनमधून नेले. शेवगाव व नगर शहरात त्याला फिरविले. पहिल्या दिवशी एक व्हॅन, तर दुसऱ्या दिवशी दुसरी व्हॅन आरोपींनी वापरली. यातील एक आरोपीच्या मालकीची असून, दुसरी व्हॅन चालक असलेल्या एका साथीदाराने आणली होती. मधल्या काळात ते नईमच्या आईशी संपर्क साधून पैशासाठी धमकावत होते. शेवटी आरोपी पकडले गेले.
गोळीबारातून पोलिस बचावले
पोलिसांनी जेव्हा आरोपींवर झडप घातली, त्या वेळी सावध झालेल्या आरोपींनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला; मात्र गोळी अडकून बसल्याने ती उडाली नाही. त्यामुळे सर्वांत आघाडीवर असलेले पोलिस कर्मचारी संजय इस्सर थोडक्यात बचावले. तेवढ्यात इतर पोलिसांनी पुढे होऊन आरोपींवर झडप घातली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा