मद्यपी पतीचे आधीच निधन झालेले. संसाराचा भार "तिच्या'वर आलेला. आपल्याला क्षयरोग आहे हे गावातील इतरांना कळाल्यास आपल्याला मजुरीचे कामही मिळणार नाही. मजुरी थांबली तर आपल्या मुलांना दोन वेळची भाकरही मिळणार नाही, त्यांची उपासमार होईल म्हणून "तिने' आपला आजार लपवला. मात्र तो बळावल्याने त्यातच "तिचा' करुण अंत झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांची मुले ज्ञानेश्वर, केतन मात्र अनाथ झाली आहेत.
सखूबाई मनोहर गंगावणे (वय 38) असे या अभागी महिलेचे नाव आहे. सखूबाईचे माहेर कोंढावळ (ता. शहादा) येथील. विवाहानंतर ती नाशिक येथे गेली. सखूबाईच्या पतीला मद्याचे व्यसन होते. त्यात अतिमद्यप्राशनाने सात वर्षांपूर्वी पती मनोहरचे निधन झाले. सखूबाईंना केतन (वय 16) व ज्ञानेश्वर (वय 7), अशी दोन अपत्ये. पतीच्या निधनापूर्वीही आणि निधनानंतर सखूबाई नाशिक येथे मजुरी करत. त्यात मुलांचे पालनपोषण करायच्या. या काळात त्यांना करावे लागणारे श्रम, वारंवार घडणारे उपास यामुळे आरोग्यावर परिणाम झाला. त्यांना क्षयरोगाची लागण झाली. घरात अठराविश्व दारिद्य्रामुळे वेळेवर उपचार झाले नाहीत. तसेच शहरात महागाईमुळे मुलांचे शिक्षण होणार नाही म्हणून त्यांनी माहेरचा, कोंढावळचा (ता. शहादा) आधार घेतला. गाठीशी असलेल्या पुंजीतून त्यांनी लहानसे पत्र्यांचे घरही बांधले.
माहेरी आल्या तरी आजार पिच्छा सोडत नव्हता. दिवसेंदिवस आजार वाढला. स्थानिक दवाखान्यात सखूबाईने तपासणी केली. यात त्यांना क्षयरोग आढळला. परंतु आपल्याला क्षयरोगाची लागण झाली आहे, त्यात वाढ झाली आहे असे गावात समजले तर आपल्याला कुणी मजुरीलाही बोलावणार नाही; घराशेजारील महिला आपल्याशी बोलणार नाहीत, या भीतिपोटी त्यांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचे टाळले. घरातही मुलांना काही सांगितले नाही. एके दिवशी सखूबाईंना रक्ताची उलटी झाली. त्यामुळे मोठा मुलगा केतन घाबरला. त्याने डॉक्टरांची मदत घेतली. त्यात सखूबाईला क्षयरोग झाल्याची माहिती त्याला समजली. त्याने आईला विचारणा केली. मात्र त्यांनी त्याच्या मनसमजुतीसाठी दुसरे कारण सांगून त्याला कामाला पाठविले.
आईशिवाय घरात दुसऱ्या कोणाचाही आधार व कर्ता कुणी नाही.
त्यामुळे केतननेही शिक्षण सोडून मजुरी सुरू केली. आजार दिवसेंदिवस वाढत असल्याचे सखूबाईला कळून आले होते. त्यातच गेल्या 11 मार्चला त्यांचे निधन झाले. सखूबाईच्या निधनाची बातमी गावात पसरताच कुणाचाही विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या सुख- दुःखात सखूबाई सहभागी व्हायच्या, प्रत्येकाशी सखूबाईचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तिच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
घरात कुणी कर्ता पुरुष नसल्याने तसेच केतन अजूनही लहान आहे. त्याच्यावर आता सात वर्षांच्या ज्ञानेश्वरच्या पालनपोषणाची जबाबदारी आली आहे. यात 60 वर्षांच्या आजी आता केतनजवळ आहेत. दोन्ही मुले अनाथ झाल्याने त्यांना आता कुणाचा आधारही उरलेला नाही. (sakal)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा