बलात्काराची व्याख्या आणखी व्यापक करून त्यामध्ये सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचारांचा समावेश करणारे विधेयक तयार करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज लोकसभेत दिली. गुदमैथुन, प्राण्यांबरोबरील अनैसर्गिक संबंध यांसारख्या गुन्ह्यांचाही बलात्काराच्या व्याख्येत समावेश होणार आहे.
नवे विधेयक भारतीय दंडविधानात (आयपीसी) दुरुस्ती सुचविणारे आहे. बलात्काराऐवजी लैंगिक अत्याचार असा शब्दप्रयोग केल्यामुळे आता पुरुषांबरोबरच स्त्रियांवरही भारतीय दंडविधानातील 375 व्या कलमान्वये गुन्हा दाखल करता येणार आहे. आतापर्यंत हे कलम केवळ पुरुषांविरुद्धच लावले जात असे. एवढेच नव्हे तर या कलमान्वये बालकांनाही दाद मागता येणार आहे. समलिंगी संबंध ठेवणे हा गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने जुलै 09 मध्ये दिला होता. समलैंगिक आणि अन्य अनैसर्गिक संबंधांच्या गुन्ह्यांचा समावेश असणारे 377 वे कलम दुरुस्त करण्याचा आदेश त्या निकालात होता. त्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या या नव्या विधेयकाने समलिंगी संबंधांतील लैंगिक अत्याचार बलात्काराच्या व्याख्येत येणार आहेत.
""व्याप्तीवाढीची शिफारस गृहसचिव जी. के. पिल्लई यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने केली होती. यापूर्वी अशीच शिफारस कायदा आयोगानेही केली होती,'' असे सांगून चिदंबरम म्हणाले, ""या प्रस्तावित बदलांमुळे मूळ बलात्काराची व्याख्या पातळ होणार नाही.''
गृहमंत्रालयाकडील माहितीनुसार, दररोज सरासरी 191 महिला बलात्कार, लैंगिक अत्याचार किंवा विनयभंगाला बळी पडतात. 2006 मध्ये 19348, 2007 मध्ये 20737 आणि 2008 मध्ये 21467 बलात्काराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. बालकांवरील बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या 2006 मध्ये 4721, 2007 मध्ये 5045, तर 2008 मध्ये 5446 एवढी आहे. भारतीय दंडविधानातील 376 व्या कलमान्वये बलात्कारासाठी किमान सात वर्षे सश्रम कारावास, तर कमाल जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
हुंडाप्रकरणी नातेवाइकांना अटक नको
हुंड्यासाठीच्या छळ प्रकरणात सासरच्या मंडळींना त्रास दिला जातो, या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले, ""छळ करणाऱ्यांनाच फक्त अटक केली जावी. त्यांच्या नातेवाइकांना अटक करू नये, असा सूचना सर्वांना दिलेल्या आहेत.'' त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2008 मध्ये हुंड्याचे 8172 गुन्हे नोंदविण्यात आले असून, 5814 जणांना शिक्षा झालेली आहे.
(sakal)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा