मंगळवार, १७ मार्च, २००९

स्वस्तात सोन्याचे आमिष!

नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व कोपरगाव तालुके ही जणू सुवर्णभूमी असावी, असा समज सर्वदूर पसरला आहे. या तालुक्‍यांतील शेकडो भामटे राज्यभरात सावज हेरून स्वस्तात सोने देण्यासाठी त्यांना येथे आणतात. सोनं देणं तर दूरच; सोबतचा ऐवज गमावण्याबरोबरच भरपूर "प्रसाद' मात्र त्यांच्या नशिबी येतो. प्रसंगी आरोपी मोकळे राहून फिर्यादीच गजाआड दिसतो. या गुन्हे पद्धतीला पोलिसांच्या भाषेत "ड्रॉप' असे संबोधले जाते.
अशा घटना अनेकदा घडूनही फसणारे फसतातच त्यामुळे पोलिसही या प्रकारांना आळा घालू शकलेले नाहीत.राज्याच्या अनेक भागांत अधूनमधून स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुटण्याचे प्रकार घडतात. नगर जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. मुख्य म्हणजे यात फसलेली मंडळी कोणी कष्टकरी, देवभोळे किंवा निरक्षर नाहीत. डॉक्‍टर, वकील, नगरसेवक, व्यापारी, अगदी पोलिस अधिकारीदेखील या जाळ्यात अडकले आहेत. "ड्रॉप' यशस्वी झाला, तर त्याची वाटणी ठरलेली असते. मूळ गुन्हेगार, नंतर मध्यस्थ, त्यानंतर प्रकरण मिटवणारा, असे वाटेकरी यात असतात. पोलिसांच्या आश्रयानेच "ड्रॉप' फोफावले, असा आरोप होऊन पोलिसांची "सीआयडी' चौकशीदेखील झाली. फिर्यादीलाच जेव्हा पोलिस अटक करू लागले, तेव्हा लुटले जाऊनदेखील फिर्याद द्यायला पुढे येण्याचे प्रकार कमी झाले.
दरोडयांच्या तुलनेत "ड्रॉप'मध्ये यशाची हमी अधिक, भरपूर मलिदा, सुरक्षितता व गुन्ह्याची तीव्रता कमी करणारी यंत्रणा. यामुळे गुन्हेगारांचे फावत गेले. दोन लाख रुपयांपासून ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत "ड्रॉप' झाले आहेत. आजवर लुटण्यात आलेली रक्कम काही कोटी रुपये असेल. यात आरोपी अटकेचे आणि शिक्षेचे प्रमाणही कमीच आहे. असे गुन्हे घडू नयेत, यासाठी केवळ पोलिसांची ठोस भूमिका पुरेशी नाही. अचानक धनलाभाचा हव्यास असणारे सावज जोपर्यंत आहेत, तोवर हे प्रकार होणारच. सावज अडकविण्यापूर्वी गुन्हेगार त्याचा विश्‍वास संपादन करतात. भिक्षा मागण्याचा निमित्ताने किंवा अन्य कारणांनी त्याच्याकडे जा-ये वाढवितात. अनेकदा थेट संपर्क न करता मध्यस्थ सोडतात. प्रारंभी खरे सोने देऊन खात्री पटविली जाते. चार-दोन वेळा असे केले, तर कितीही चाणाक्ष व्यक्ती असो; समोरच्यावर भरवसा ठेवते. घटनेच्या वेळी माणूस गांगरून जातो. पैशाची बॅग घेऊन, तसेच मोबाईल, अंगावरील दागिने घेऊन गुन्हेगार पलायन करतात. अशा वेळी मदतीलाही कोणी येत नाही. उलट तुम्ही या फंदात का पडलात म्हणून त्याची हेटाळणी होते. काही प्रकरणांत आरोपींनी नकली दागिने देऊन फसविले. काही भामट्यांनी कप-बशीचे बारीक तुकडे पोत्यात भरून ठेवले यात चांदीची नाणी आहेत, असे भासविले. कप-बशीच्या तुकड्यांचा आवाज नाण्यांप्रमाणे भासला व सावज जाळ्यात अडकले. हे गुन्हे केवळ पुरुषच करीत नाहीत, तर यात महिला, मुले व वृद्धदेखील असतात. जोपर्यंत हव्यासापोटी स्वस्तात माल मिळविण्याची वृत्ती संपत नाही, तोपर्यंत असे प्रकार सुरूच राहणार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: