शनिवार, २८ फेब्रुवारी, २००९

खोट्या गुन्ह्यांसाठी स्त्रीत्व पणाला!

रात्रीअपरात्री एखादी महिला पोलिस ठाण्यात धावत येते, आपल्यावर सामुदायिक अत्याचार झाल्याची तिची तक्रार असते. दुसरी एखादी महिला आपल्या पतीसोबत येते, शेजारच्यांनी विनयभंग केल्याची तिची तक्रार असते. सुरवातीला गंभीर वाटणाऱ्या या घटना पुढे तपासात बनावट असल्याचे आढळूने येते. विरोधकांना गारद करण्यासाठी हा खोटा बनाव केला जातो. असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी स्त्रीत्व पणाला लावण्याची पद्धत सुरू झाल्याचे दिसून येते आहे. खोटे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार नवे नाहीत. राजकीय अगर इतर कारणांतून विरोधाकांना धडा शिकविण्यासाठी हे हत्यार वापरले जाते. आतापर्यंत यात दरोडा, दंगल किंवा फार तर "ऍट्रोसिटी'च्या गुन्ह्याचा (अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) वापर केला जात होता. दरोड्याचे 50 गुन्हे दाखल झाले असतील, तर त्यातील 30 हून अधिक गुन्हे हे अशा प्रकारात मोडणारे असल्याचे आढळून येते. आता त्याही पुढे जाऊन खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी महिलांचा वापर केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे यासाठी घरातीलच महिलांना पुढे करणारे महाभागही कमी नाहीत. पुरुष मंडळींच्या दबावामुळे या महिलांनाही नाइलाजाने अशा प्रकारांत सहभागी होऊन स्वतःच्या इज्जतीचाच पंचनामा करावा लागत आहे. याकडे महिला संघटनाही लक्ष देत नाहीत. महाभारतात पांडवांनी जुगार खेळण्यासाठी द्रौपदीलाच पणाला लावले होते, तसे आजचे आधुनिक पांडव स्वतःच्या पत्नीला पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत. महिलेची फिर्याद पोलिसांना टाळता येत नाही. त्यामुळे ती दाखल करून पुढील कारवाई करावीच लागते. न्यायालयात काय होईत ते होईल, पण सध्या तरी ज्यांच्याविरूद्ध तक्रार आहे, त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागते. पुढे ही प्रकरणे तडजोडीने मिटणारी असतात. मात्र, त्यासाठी स्त्रीत्व आणि पोलिस यंत्रणेचा वापर केला जातो.अशा घटना वाढत राहिल्यास खऱ्या घटनांवरील विश्‍वासही उडून जाईल. खऱ्या घटनांमध्येही महिलांना मदत मिळणे अवघ होईल, हा एक यातील मोठा धोका आहे. तो ओळखून महिला संघटनांनी तरी यासाठी विरोध केला करण्याची गरज आहे.दुसऱ्या बाजूला अनेकदा स्त्रियाही आपल्या स्त्रीत्वाचे भांडवल करून घरातील व्यक्ती किंवा इतरांना त्रास देतात. हुडांप्रतिबंधक कायद्याचा त्यासाठी गैरवापर केला जातो. माहेरच्या मंडळींच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे अशा घटना टोकाला जाऊन शेवटी गुन्हे दाखल होतात, अन्‌ त्या महिलेचा संसार मोडतो. महिलांच्या आरक्षणासंबंधी बोटचेपे धोरण घेणारी मंडळी राजकारणासाठी मात्र महिलांचाच पुरेपुर वापर करून घेतात. घरातील महिलांना रिंगणात उतरून त्यांच्यावतीने काम पाहण्याबरोबरच विरोधकांना धडा शिकविण्यासाठी महिला संघटनांना हाताशी धरून आंदोलने करण्यास भाग पाडले जाते.

३ टिप्पण्या:

HAREKRISHNAJI म्हणाले...

फारच वाईट बाब. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी.

अनामित म्हणाले...

हा अतिशय वाईट प्रकार आहे. याविरोधात महिला संघटनांनी खरेच पुढे यायला हवे. हा केवळ कायद्याचा गैरवापर नसून समाजिक स्वरुपचा गुन्हा आहे. संबंधित महिलांनीही याला बळी पडू नये यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे.

अनामित म्हणाले...

अरे अरे काय हे, हे तर अधुनिक पांडवच... खरे तर पोलिसांनी अशा पुरुषांनाच अटक केली पाहिजे.
चक्रधर