रविवार, १ फेब्रुवारी, २००९

उमलत्या कळ्या मोहाच्या जाळ्यात!


प्रसारमाध्यमांतील जाहिराती व शहरातील उच्चभ्रूंचे राहणीमान यांचे आकर्षण असलेल्या; परंतु आर्थिक परिस्थितीने नाडलेल्या अल्पवयीन मुली तात्पुरत्या मोहाला बळी पडून वाममार्गाला लावणाऱ्या दलालांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना फसविणारे दलाल बऱ्याचदा जवळचे नातेवाईक अगर मित्र परिवारातील असतात आणि मोहाला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्‌ध्वस्त होते. फसविण्याची, त्यांना वाममार्गाला लावण्याची आणि ग्राहकांना पटविण्याचीही दलालांची पद्धत ठरलेली असते.
असे टाकतात जाळे
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्याच्या मुलींना वाममार्गाला लावणारे दलाल "सावज' हेरताना नात्यातील अगर ओळखीच्या; परंतु घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या मुलींची निवड करतात. सुरवातीला त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांशी गोड बोलून विश्‍वास संपादन करतात. मुलीचे लग्न जमवून देतो, नोकरीला लावतो किंवा दोन-चार दिवस आमच्याकडे राहू द्या, असे म्हणून मुलींना आणले जाते. त्यांना चांगले कपडेलत्ते, महागडे मोबाईल, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण देऊन खूश केले जाते. त्या बदल्यात त्यांच्याकडून विकृत काम करवून घेतले जाते.
अशी होते फसगत
सुरवातीला क्षणिक भुलभुलय्यात अडकल्याने यासाठी तयार झालेल्या मुली फसतच जातात. ही गोष्ट घरी अगर इतरांना सांगणेही त्यांना अवघड होते. त्या बदल्यात मिळणारा मोबदला घेऊन त्याही गप्प बसतात. आपल्या जवळच्याच लोकांनी मुलीला अशा मार्गाला लावले असेल, याची शंका त्यापैकी अनेकांच्या पालकांना येत नाही. बऱ्याच पालकांना यामध्ये लक्ष देण्यास वेळही नसतो. ज्यांच्या लक्षात येते; तेही "घराची इज्जत' म्हणून गप्प बसतात.
विकृतीसाठी मुलींचा "बाजार'
धनदांडग्यांची वासनेची भूक, हे दलालांचे खरे भांडवल! त्यामुळे त्यांना हवा तसा पुरवठा करून हे दलाल मुलींना जाळ्यात अडकवितात. त्यासाठी फसवून आणलेल्या या मुलींचा चक्क बाजार मांडण्यांपर्यंत त्यांची मजल जाते. हॉटेल आणि लॉजमालकांच्या मदतीने हा "धंदा' चालतो. स्त्रीला उपभोग्य वस्तू मानण्याची विकृती समाजात आहे. संबंधित मुलींचे वय, त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती याचे भान कोणालाच नसते. अनेकदा त्या मुलींच्या वयाच्या मुली असलेले बापही असे कृत्य करतात.
असा भरतो "बाजार'
विकृत वृत्तीच्या "ग्राहकां'ना वेगवेगळ्या प्रकारच्या मुली हव्या असतात. कोणाला शालीन, तर कोणाला "हायफाय' राहणीमानाच्या "बोल्ड'. त्यानुसार दलाल मुलींची वेषभूषा करून त्यांना "ग्राहकां'समोर "पेश' करतात. त्याच्या आवडीनुसार तिला वेषभूषा आधीच केलेली असते. नंतर "भाव' ठरविला जातो आणि पुढील व्यवहार होतो. ग्राहकांच्या दृष्टीने जुन्या झालेल्या मुली नंतर सोडून दिल्या जातात. आपले सर्वस्व हरवून बसलेल्या आणि पैशाला चटावलेल्या यातील बहुतांश मुली पुढे हाच मार्ग अवलंबितात.
संस्कृतीची पायमल्ली करणारे डान्स बार बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला खरा; मात्र त्याचे इतरत्र उमटणारे पडसाद रोखण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. बार बंद झाल्याने विकृत लोकांनी आपल्या वासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी अल्पवयीन मुलींचा पर्याय निवडला आहे. डान्स बारकडे जाणारा पैसा आता अशा मार्गाने उडविला जात असून, बारपेक्षाही भयानक प्रकार सुरू झाल्याचे यातून दिसून येते.
प्रबोधन व जागरूकता हवी
या घटना टाळण्यासाठी समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना लोकांनीही मदत केली पाहिजे. पोलिसांनीही अशा घटनांची तत्परतेने दखल घेऊन कारवाई करायला हवी. पालकांचे मुलींवर आणि मुलांवरही लक्ष असणे, ही तर सर्वांत मोठी गोष्ट. संबंधितांचे प्रबोधन आणि समाजाची जागरूकता, हेच सद्यःस्थितीत उपाय आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: