रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

जागे रहा! केवळ रात्रच नव्हे, तर दिवसही वैऱ्याचा आहे...

रोजच्या धावपळीच्या जीवनात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण खूपच बेसावध झालो आहोत. अनेकदा धोका होऊनही आपण सावध होत नाही. स्थानिक चोरटे आणि गुन्हेगारांच्या उपद्रवापाठोपाठ आता दहशतवाद्यांचा उपद्रवही उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्याला जबाबदार कोण? सरकार व पोलिसांचे यशापयश यांचा लेखाजोखा काय करायचा तो केला जाईलच; पण अशा प्रकारांना खतपाणी मिळते ते लोकांच्या बेसावधपणामुळे, ही गोष्टही तितकीच खरी आहे. पूर्वी चोऱ्यामाऱ्यांसारखे प्रकार बहुतेक वेळा रात्री व्हायचे; पण आता दिवसाही असे प्रकार होऊ लागले आहेत. पुण्यात झालेल्या बॉंबस्फोटाचे उदाहरण यासाठी ताजे आहे.

ग्रामीण भागापेक्षा शहरातील जीवन वेगवान झाले आहे. जगण्याच्या स्पर्धेत जो तो आपला वाटा मिळविण्यासाठी पळतो आहे. यांत्रिक पद्धतीच्या जीवनात नाती आणि माणूसपणही विसरले जाते आहे. आपले कुटुंब आणि आपण, एवढाच मर्यादित विचार करण्याची वृत्ती वाढली आहे. आपल्या देशात, शहरात घडणाऱ्या गोष्टी सोडाच; आपल्या शेजारी काय चालू आहे, याकडे लक्ष देण्यास आपल्याला वेळ नाही. वेळ नाही म्हणण्यापेक्षा, तशी आपली इच्छा नाही. रस्त्यात जाताना अपघात झाला, तर कोणी मदतीसाठी पुढे येत नाही. वाट चुकलेल्याला रस्ता सांगण्यातही आपल्याला कमीपणा वाटतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडेही आपण संवेदनशीलपणे पाहत नाही. "आपल्याला काय त्याचे,' अशीच आपली वृत्ती असते. जे काही करायचे ते पोलिसांनी करावे किंवा सरकारने करावे, असेच आपले मत असते. अपघात झाला तर बघे म्हणून थांबण्यात आपल्याला आनंद वाटतो. रस्त्यात कोणाचे भांडण सुरू असेल, तर गाडी थांबवून आपण त्याची "मजा' लुटत असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली तरी आपण मान वर करून, जागा मिळेल तेथे घुसून "गंमत' पाहत असतो; परंतु भांडण सोडवावे, पोलिसांना बोलवावे, रस्त्यावर पडलेल्या जखमीला उचलावे, वाहतूक सुरळीत करावी, असे आपल्यापैकी किती जणांना वाटते? रस्ता चुकलेल्या बालकाला मदत करण्यासाठी, अडचणीत सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी आपण कधी पुढाकार घेतो का? आपल्या आसपास घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, वस्तू यांची कधी चौकशी करतो का? आपल्या भागात येणाऱ्या अनोळखी माणसांची कधी दखल घेतो का? आपली सामाजिक जबाबदारी म्हणून कधी याची माहिती पोलिसांना कळवितो का?

आपल्या या वृत्तीचा गैरफायदा उठवत गुन्हेगारी वाढते आणि आता दशहतवादही पसरत आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची असली, तरी त्याची माहिती देणे आणि जागरूक राहणे, हे आपलेही कर्तव्य आहे. येथे पोलिसांची भूमिकाही नागरिकांमध्ये उदासीन वृत्ती वाढीस लागण्यास कारणीभूत ठरणारी आहे, हेही नाकारून चालणार नाही. माहिती देणारा अगर मदतीसाठी पुढे येणाराच पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकतो. त्यामुळे त्या वाटेला जाण्यास लोक धजावत नाहीत. मात्र, अलीकडे यामध्ये खूप सुधारणा झाली आहे. नियमांमध्ये त्यासाठी अनुकूल बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून आता पहिल्यासारखी वागणूक मिळत नाही, या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात.

एखादी घटना घडून गेल्यावर त्यावर मते व्यक्त करण्यासाठी, यंत्रणा आणि सरकारला दोष देण्यासाठी सगळेच जण सरसावतात;
पण घटना घडू नये म्हणून आणि घटनेच्या वेळी किती लोक मदतीसाठी सरसावतात, याचाही विचार केला पाहिजे. शेवटी सुरक्षा यंत्रणेलाही मर्यादा असतात. त्यांना माहिती मिळणे आवश्‍यक असते. ते काम लोकांनी करायचे असते. सुरक्षा यंत्रणेचे डोळे, कान, नाक आपणच आहोत. वेळेत माहिती मिळाली आणि दक्षता घेतली तरी बरेच नुकसान टळू शकते. शेवटी सरकार आणि यंत्रणाही आपल्यासाठीच आहेत. यंत्रणा राबते ती आपल्याच सुरक्षेसाठी. मग आपणही जरा दक्षता घेतली तर बिघडले कोठे? ही वृत्ती आपल्यात कधी निर्माण होणार? त्यामुळे चला, जागे राहून संकटांचा मुकाबला करू या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: