
आत्महत्या हा काही आजचा प्रश्न नाही. पूर्वीपासूनच आत्महत्या होत आहे; मात्र अलीकडे त्यांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे त्यांचे गांभीर्य वाढले. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चर्चेचा विषय झाला होता. त्या थांबविण्यासाठी विविध उपाय पुढे आले. त्यांतील किती यशस्वी झाले, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. तोपर्यंत गेल्या काही काळापासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. आयुष्याच्या सुरवातीलाच आलेल्या काही अडचणी त्यांना काळोखाकडे घेऊन जात आहेत. परीक्षा आणि रॅगिंग ही त्यांच्या आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचे आतापर्यंतच्या घटनांवरून पुढे आले आहे. राहुरीच्या प्रशांत चितळकर या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने नुकतीच रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. तो पुण्याच्या विधी महाविद्यालयात शिकत होता. रॅगिंग करणारेही तेथीलच विद्यार्थी. त्यांना कायद्याची थोडीबहुत ओळख झालेलीच असणार. त्यामुळे रॅगिंगविरुद्धच्या कायद्याची आणि त्यातील शिक्षेचीही त्या दोघांनाही माहिती असणारच. शिवाय प्रशांतचे वडील पोलिसमध्ये आहेत. असे असूनही कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचे सोडून प्रशांतने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ, यासंबंधीच्या कायद्याचा अद्याप वचक निर्माण झालेला नाही. कायदे असले तरी त्यांचा वापर करण्यातील अडचणी आणि अंमलबजावणीतील त्रुटी यांमुळे त्यावर लोकांचा अद्याप विश्वास बसलेला नाही, हेच यातून दिसून येते.
रॅगिंग ही आजची गोष्ट नाही. ती एक विकृतीच म्हणावी लागेल. साधारणतः 80 च्या दशकापासून हा प्रकार सुरू झाला. सुरवातीला चेष्टेचे स्वरूप असलेला हा प्रकार पुढे वाढत गेला. चित्रपटांतून त्याला स्थान मिळाल्याने युवा वर्गात त्याबद्दल माहिती पोचली. त्याचे स्वरूप बदलत गेले. हलकीफुलकी मजा म्हणून सुरू झालेला हा प्रकार सध्या भलताच विकृत होऊन बसला आहे. खरे तर वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करवून दिला पाहिजे. मैत्रीची भावना वाढली पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशासाठी क्रांती केल्याचा इतिहास असलेल्या या देशात, ब्रिटिशांचे अन्याय- अत्याचारही हसत हसत झेलल्याचा इतिहास असलेल्या या देशात रॅगिंगसारख्या घटनांनी खचून जाणारे विद्यार्थी घडावेत, ही न पटणारी
गोष्ट आहे. रॅगिंगला बळी पडणाऱ्यांबरोबरच रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचाही विचार केला पाहिजे. ही एक प्रकारची गुंडगिरीच म्हणावी लागेल. अशी मुले पालकांचे तरी काय नाव काढणार? आपल्या मुलामुळे कुणा विद्यार्थ्याला जीव गमवावा लागणे, ही त्या रॅगिंग करणाऱ्यांच्या पालकांना तरी भूषणावह वाटणारी गोष्ट आहे काय, याचाही विचार करण्याची गरज आहे. केवळ कायदे करून, समित्या नेमून आणि हमीपत्र घेऊन हे प्रकार थांबणार नाहीत. रॅगिंग करणाऱ्यांची मनोवृत्ती त्यापलीकडची असते.
दुसरा प्रकार आहे, तो परीक्षा बळींचा. परीक्षेतील गुण म्हणजेच करिअर, त्याआधारेच नोकरी आणि पैसा मिळणार, त्या पैशातूनच मौजमजा करायची, म्हणजेच जीवन. जे आम्हाला जमले नाही, ते मुलांनी करून दाखवावे, ही पालकांची अपेक्षा. मुलांनी काय व्हावे, हेही तेच ठरविणार. तसे झाले नाही तर त्याच्यावर रागवणार. त्यामुळे अपयश आले म्हणजे सर्व काही संपले, आता जगण्याच्या सगळ्या वाटाच बंद झाल्या, असे समजून हे सुंदर जीवन संपविण्याचा निर्णय विद्यार्थी घेतात. त्यांनी विचार केला पाहिजे, की जीवनात अडचणी या येणारच. शिकण्याचा काळ हा अशा अडचणींतून मार्ग काढायला शिकविणाराही असतो. अपयश पचविण्याची आपल्यात क्षमता नाही काय, आव्हाने पेलण्यास आपण समर्थ नाहीत काय? आयुष्याची एक वाट अडचणीची ठरली म्हणून दुसऱ्या वाटा नाहीत काय, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. हा विचार रुजविण्याचे काम घरातून पालकांनी, शाळेतून शिक्षक आणि सहकारी विद्यार्थ्यांनी, समाजाने आणि प्रसारमाध्यमांनी केले, तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. चला, ही तर सुरवात आहे, असा सकारात्मक विचार करून सुंदर आयुष्याचे सोने करू या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा