मुंबईत रस्त्यावरून चालताना गर्दीत एका पाकीटमाराने त्याचे पाकीट मारले. गावी परतायला पैसे नाहीत म्हणून त्यानेही रस्त्याने चालणाऱ्या एकाची बॅग उचलून पळ काढला. या बॅगेत सापडलेला मोबाईल कमी किमतीत विकून त्याला पैसे मिळाले, पण त्याची हाव अधिकच वाढली. मिळालेल्या पैशांत गाव गाठायचे सोडून त्याने आणखी काही बॅगा पळवून त्यातील मोबाईलसारख्या महागड्या वस्तू चोरल्या, पण या चोऱ्या काही त्याला पचल्या नाहीत. मुंबई पोलिसांनी त्याला थेट दाभोळला जाऊन अटक केली.
डिसेंबर महिन्यात कोकणातून खासगी कामानिमित्त मुंबईत आलेल्या त्या तरुणाचे नाव अविनाश शिर्के. हा तरुण मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होता. एकदा तो गावी निघाला. मात्र मुंबईतील रस्त्यावरच त्याचे पाकीट मारले गेले. गावी परतायला पैसे राहिले नाहीत. आता काय करायचे हा त्याचा पुढचा प्रश्न होता. त्यावर त्याला एक अफलातून आयडिया सुचली. ज्या मार्गाने आपले पैसे गेले, त्याच मार्गाने ते परत मिळवायचे, असे त्याने ठरविले. त्यामुळे त्याने
सांताक्रूझ येथील एका व्यक्तीची बॅग चोरली. या बॅगेतला मोबाईल विकून चांगले पैसे मिळाल्याचे पाहून त्याने गर्दीत लोकांच्या वस्तूंवर हात मारायला सुरुवात केली.
खरे तर पहिल्या चोरीतच त्यासा पुरसे पैसे मिळाले होते. कष्ट करायची सवय असूनही कमी श्रमात मिळालेला पैसा त्याला भूरळ पाडणार ठरला. त्यामुळे तो चोऱ्या करीतच राहिला. त्याने जेथे जेथे चोऱ्या केल्या त्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेले होते. त्याचा पोलिसांनी तपासही सुरू केला होता. विशेष म्हणजे मोबाईल चोरी गेलेले असल्याने पोलिसांच्या दृष्टीने तपास सोपा होता. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने त्यांनी चोरट्याचा मार्ग शोधला. अन् दाभोळमध्ये जाऊन त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन जप्त केले. स्वतःचे पाकीट गेले म्हणून चोरी केलेला अन् नंतर मोह अनावर झालेला शिर्के सध्या पोलिस कोठडीची हवा खातो आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा