![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgV4AC7KVvGFnk-lwWEoCiWizXELS6KPmFxH6n_ThRofgxgkd2csUrtqtaNgHSPmhbPatMgf-dOxXD8aL7mlwcEDnVlNBLMaSGQth0ZwP1hHJluOJXvmcOlIOkV8OO6KLSzyuDRzcad9xw/s200/savadh.jpg)
केवळ लोकशाही आणि सरकारी व्यवस्थाच नव्हे, तर समाजातील सर्वच घटना-घडामोडींकडे उदासीनतेने पाहण्याची वृत्ती लोकांमध्ये बळावत आहे. सामाजिक जबाबदारीच नव्हे, तर आपल्या लोकशाहीने आपल्याला दिलेल्या अधिकारांचाही विसर त्यातून पडला आहे. जणू सर्वच गोष्टी आता हाताबाहेर गेल्या आहेत, अशी हताश वृत्तीही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. सत्तेसाठी हपापलेल्या राज्यकर्त्यांना आपण त्यांची जागा दाखवू शकतो, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेलाही वठणीवर आणू शकतो आणि बिघडत चाललेली समाजव्यवस्थेची घडी आपण सावरू शकतो, यावरचा लोकांचा विश्वासच उडत चालला आहे. त्यालाही ही नकारात्मक मनोवृत्ती कारणीभूत आहे. आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, आपण आपले कर्तव्य पार पाडून थोडी सजगता पाळली, तरी बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात.
अर्थात हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, ही गोष्टही तितकीच खरी आहे; परंतु सुरवात तर करायला हवी. भ्रष्टाचार का होतो, तर आपण पैसे द्यायला तयार होतो म्हणून. रोगराईच्या काळात आपण किती दक्षता घेतो? रस्त्यावर थुंकू नका, संसर्ग टाळा, अशा सूचनांकडे आपण किती गांभीर्याने पाहतो? विनाकारण भाववाढ झाली, तरी आपण त्याचा जाब न विचारता खरेदीसाठी गर्दी करतोच. नागरी सुविधा मिळत नसल्या, तरी पुन्हा दारात आलेल्या उमेदवाराला मत देतोच. सत्ता मिळविण्यासाठी राजकीय मंडळी ज्या खटपटी-लटपटी करतात, ज्या तडजोडी करतात, त्यालाही आपण बळी पडतो. पैसे घेऊन केलेले मतदान निकोप लोकशाही कशी घडविणार? अशा लोकप्रतिनिधींकडून चांगल्या कामाची अपेक्षा तरी कशी करणार? बेकायदेशीर कामांसाठी प्रशासनावर दबाव आणायला कोण भाग पाडते? दर्जाशी तडजोड करून अवतीभोवती सुरू असलेल्या कामांकडे का दुर्लक्ष केले जाते? लोकशाही राज्यात सरकारकडून आपण मोठ्या अपेक्षा करताना हे सरकार बनविण्यासाठी आणि चालविण्यासाठी आपली जी कर्तव्ये आहेत, ती आपण कशी पार पाडतो, याकडे कधी पाहिले जाते का?
सामाज बिघडला आहे, असे म्हणणे सोपे आहे; पण त्याच समाजाचा घटक म्हणून आपण कसे वागतो, याकडेही पाहिले पाहिजे. वाहतुकीची कोंडी होते, तेव्हा आपले वर्तन कसे असते? सार्वजनिक इमारतींचे कोपरे घाण कसे होतात? बंदी असतानाही भर रस्त्यात आणि कार्यालयांत सिगारेट कोण ओढते? इतरांचा विचार न करता मोबाईलवर जोरजोरात कोण बोलते? खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी मुलांच्या हाती वाहने आणि महागडे मोबाईल कोण देते? अफवा कोण परविते, या छोट्या-छोट्या गोष्टी असल्या, तरी दुर्लक्ष करण्यासारख्या नक्कीच नाहीत.
आपल्या आसपास घडणाऱ्या घटना-घडमोडींवरही आपली प्रतिक्रिया थंडच असते. अपघात झाला, तर जखमींना मदत किंवा पोलिसांना कळविण्याची तसदी आपण घेत नाही. अडचणीत सापडेल्या शेजाऱ्याच्या मदतीला धावून जात नाही. आपल्या डोळ्यांदेखत कोणाची फसवणूक होत असेल, तर आपण दुर्लक्ष करतो. एवढेच काय, स्वतःची फसवणूक होणार नाही, यासाठीही सावध होत नाही आणि झालीच, तर "अक्कलखाती जमा' म्हणून सोडून देतो. कायदा पाळण्यापेक्षा तो मोडून आपलाच फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो. आपली ही भूमिका एकूण व्यवस्थेला आणि आपल्यालाही मारक ठरणारी असते. निकोप लोकशाहीसाठी मतदानाचा अधिकार योग्य तऱ्हेने बजावणे, समाजिक जाणिवेचे भान आणि दक्ष नागरिकाची भूमिका बजावली तरी मोठे काम होऊ शकेल. त्यासाठीच उदासीनतेचे सीमोल्लंघन करावे लागेल.
1 टिप्पणी:
समाजवादाचा विजय असो म्हटल्यावर प्रायव्हसीचे याप्रमाणेच रक्षण होणार.
टिप्पणी पोस्ट करा