शुक्रवार, २८ मे, २०१०

महानिरीक्षक जेव्हा फौजदारावर थुंकतात

स्वत:च केलेल्या उशिरामुळे विमान गाठू न शकलेल्या पोलिस महानिरीक्षकाने त्याचा राग एका फौजदारावर थुंकून काढल्याची घटना कोलकता येथे घडली.
उत्तर बंगालचे महानिरीक्षक कुंदनलाल तामता यांना 5 मे रोजी कोलकत्याहून बागडोरा येथे विमानाने जायचे होते. त्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर दाखल झालेले तामता विमान निघण्याची वेळ जवळ आली तरी उपाहारगृहात जेवण करीत बसले. तेथील उपनिरीक्षकाने त्यांच्या वारंवार हे लक्षात आणून दिले. पण, तामता यांनी त्याकडे कानाडोळा केला. अखेर विमान निघण्यास दहा मिनिटे बाकी असताना नियमानुसार विमानाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे तामतासाहेब चिडले व रागारागात त्यांच्या मोटारीत जाऊन बसले.

उपनिरीक्षकाने त्यांना निघताना सॅल्यूट केला असता, पान खात असलेल्या तामतांनी त्याच्या अंगावर पिंक फेकली. यामुळे मनोधैर्य खचलेल्या उपनिरीक्षकाने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सहकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्याने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली. तामता यांनी असे काही घडलेच नसल्याचा कांगावा केला असला, तरी खातेअंतर्गत चौकशी मात्र सुरू झाली आहे.

महाराष्ट्र पोलिस दलतही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकारयावर राग काढण्याच्या घटना घडतात. एवढे खालच्या पातळीवर जाउन नाही.

बुधवार, २६ मे, २०१०

शाब्बास राळेगणकरांनो!

गावात आलेल्या चोरांना गावकऱ्यांनी पिटाळून लावल्याच्या अनेक घटना पहायला मिळतात; मात्र प्रत्यक्ष चोरी करीत असताना गावकऱ्यांनी चोरांना जागीच पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या घटना विरळाच. नगर तालुक्‍यातील राळेगण म्हसोबा या गावात नुकतीच अशी घटना घडली. सुट्टीवर आलेल्या गावातील दोघा लष्करी जवानांच्या धाडसाने आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे चोर पकडला गेला. त्याबद्दल या सर्वांना शाब्बासकी दिलीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्यांचा यथोचित गौरवही झाला पाहिजे. त्यातून इतरांना प्रेरणा मिळू शकेल.
गावात चोर आल्याची आवई उठल्यावर लाठ्या-काठ्या घेऊन रात्ररात्र जागणारी गावे सध्या नगर जिल्ह्यात पहायला मिळतात. चोरांचा पाठलाग करीत डोंगर-दऱ्यांतही रात्री-अपरात्री गावकरी जाऊन येत आहेत; मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळे खरेच चोर होते, की गावकऱ्यांचा भ्रम की आणखी काही हे प्रश्‍न अनुत्तरितच राहतात. या पार्श्‍वभूमीवर राळेगण म्हसोबा गावातील घटना वेगळी ठरते. भापकर कुटुंबाच्या घरात पहाटेच्या सुमारास तिघे चोरटे शिरल्याचे लक्षात आले. या कुटुंबातील अर्जुन व पोपट हे दोघे लष्करात आहेत. सुट्टीसाठी ते गावी आले आहेत. चोर आल्याचे कळताच त्यांनी चोरांना पकडण्यासाठी धाव घेतली. त्यातील एकाला पकडण्यात त्यांना यश आले. चोरट्याकडून झालेली मारहाण सहन करीत त्यांनी दाखविलेले धाडस कौतुकास्पद आहे. पोलिसांचा ढिसाळपणा येथेही अनुभवास आला. पहाटे चोर पकडल्यानंतर पोलिसांना कळविण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस ठाण्यात कोणीच दूरध्वनी घेतला नाही. शेवटी सकाळी संपर्क झाल्यावर पोलिस आले.

ेया घटनेत गावकऱ्यांच्या धाडसाबरोबरच संयम आणि समजूतदारपणाही लक्षात घेतला पाहिजे. प्रत्यक्ष चोरी करताना पकडलेल्या एकट्या दुकट्या चोरावर गावकरी तुटून पडले असते, तर तो जगू शकला नसता. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे नंतर गावकऱ्यांनाच कारवाईला सामोरे जावे लागल्याची उदाहरणे आहेत. राळेगणच्या ग्रामस्थांनी मात्र संयम राखून असे काही कृत्य होऊ दिले नाही. कायदा हातात घेण्याऐवजी त्या चोराला कायदेशीर मार्गाने शिक्षा देण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यामुळे आता पोलिसांची जबाबदारीही वाढली आहे. पळालेल्या चोरांचा शोध घेणे आणि या घटनेचा योग्य तपास करून या चोरांना शिक्षा घडवून आणणे हे आव्हान पोलिसांसमोर आहे. यात कुचराई झाली, तर त्यांना पुन्हा गावकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागले, यात शंका नाही. गावकऱ्यांच्या संतापाची झलक घटनेच्या दिवशी पाहिलेले पोलिस त्यातून नक्कीच बोध घेतील, असे वाटते.

आता आपल्यावर चोर सूड उगवतील काय? अशी एक अनाठायी शंका या ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मात्र, ती शक्‍यता कमी वाटते. कारण गावाची एकी पाहून पुन्हा असे धाडस कोणी करील, असे वाटत नाही. त्यामुळे शंका बाळगण्यापेक्षा गावकऱ्यांनी एकी टिकवून ठेवणे आवश्‍यक आहे. मुख्य म्हणजे, अशीच एकी इतरही गावांत झाली पाहिजे. बदलत्या परिस्थिती आता पोलिसांचा चोरट्यांवर वचक निर्माण होऊ शकत नाही. ते दिवस आता गेले. त्यामुळे गावकऱ्यांचीच भीती चोरट्यांना वाटावी, असे वातावरण गावोगावी तयार झाले पाहिजे. तसे झाले तर चोरांना पळता भुई थोडी होईल. गावात घबराट निर्माण करीत रात्रीची गस्त घालण्यापेक्षा चोरांवर वचक बसेल, अशी कृती ग्रामस्थांनी केल्यास पुन्हा त्या गावाकडे चोरटे फिरकणार नाहीत. दुसऱ्या बाजूला इतर दोघे चोरटे पकडण्यासाठी आणि पकडलेल्यास शिक्षा होण्यासाठी गावकऱ्यांनाच पाठपुरावा करावा लागेल, हेही तितकेच खरे.

मंगळवार, २५ मे, २०१०

पोलीस अधिकारी 'कामा'तून पळाले


'२६/११ हल्ल्याच्या रात्री अतिरिक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते 'कामा' हॉस्पिटलमध्ये दहशतवाद्यांशी झुंजत असताना आझाद मैदान पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेण्याऐवजी 'कामा' हॉस्पिटलमधून भ्याडासारखे पळून गेले' असा अत्यंत गंभीर ठपका कसाबवर खटला चालवणाऱ्या विशेष कोर्टाने ठेवल्याचे उघड झाले आहे.

या हल्ल्याबाबत विशेष कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत उपलब्ध झाली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा नावानिशी उल्लेख करत न्या. एम. एल. टाहलियांनी यांनी कडक शब्दांत त्यांची खरडपट्टी काढली आहे. सीएसटीमध्ये मृत्यूचे थैमान घातल्यानंतर कसाब आणि अबू इस्माईल हे दहशतवादी 'कामा' हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांना प्रतिकार केला तो सदानंद दाते आणि त्यांच्या पथकाने. आझाद मैदान पोलीस ठाण्यापासून सीएसटी व 'कामा' जवळच आहे. 'कामा'मध्ये शिरण्यापूवीर् दाते यांनी कॉन्स्टेबल सुरेश कदम यांना पोलीस ठाण्यातून काही बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि शस्त्रास्त्रे आणण्याचे आदेश दिले होते. पण, आपल्यासह सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर थोरावडे आणि इतर चार पोलीस अधिकारी दाते यांना मदत देण्याऐवजी 'कामा'च्या मागील गेटजवळ बोलेरो जीपमध्येच बसून राहिलो, अशी साक्ष स्वत: कदम यांनीच दिली होती.

मात्र, इतर कोणाच्याही साक्षीमध्ये बोलेरो जीप 'कामा'च्या मागील गेटवर असल्याचे स्पष्ट झाले नसल्याचा धागा न्या. टाहलियानी यांनी पकडला. कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'कामा'मध्ये प्रवेश तर केला; परंतु, तेथे सुरू असलेली धुमश्चक्री पाहून आपला जीव वाचवण्यासाठी मागच्या मागे पळ काढला, असा निष्कर्ष कोर्टाने काढला. (Ma.Ta.)

गुरुवार, २० मे, २०१०

गुरुजींनो! माराल छडी तर पडेल बेडी

नव्या शैक्षणिक विधेयकाचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांऐवजी शिक्षकांनाच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शिकवावे लागेल, अशी स्थिती आहे. विद्यार्थ्यास अपमानास्पद बोलता येणार नाही, मग हात लावणे दूरच अशी तरतूद या विधेयकात आहे. या नव्या शैक्षणिक विधेयकाने शिक्षकांच्याच वर्गातील वर्तणुकीची कसोटी लागणार आहे.

'छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे काव्य आता इतिहासजमा झाले आहे. छडीमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे जरी वळत असला तरी अनेक विद्यार्थी त्याचा ताण घेतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी केवळ छडीच्या भीतीने शाळेपासून लांब गेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार करून अनेक निर्णय घेतले आहेत.

येत्या जूनपासूनच्या शाळाप्रवेशापासूनच विधेयकाची अंमलबजावणी सुरू होत आहे. आठवीपर्यंत आता कुणीही नापास होणार नाही. शिक्षकांना थेट कायद्याच्या चौकटीत आणले जाणार असून एखाद्या विद्यार्थ्याला "गमभन' का आले नाही, म्हणून शिक्षकांना जाब विचारला जाणार आहे. "छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' हे बालगीत ऐकून अनेक पिढ्या घडल्या. आता शिक्षकांना छडी मारता येणार नाही. शिकविण्याचेच काम त्यांना करावे लागणार असून अपमानास्पद शब्द उच्चारता येणार नाहीत. शारीरिक आणि मानसिक इजा होईल, असे वर्तन शिक्षकांनी करू नये, असे विधयेकात म्हटले आहे. सहा ते चौदा वर्षांपर्यंतच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण नव्या विधेयकामुळे मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, लेखनसाहित्य, पाठ्यपुस्तके मोफत दिली जातील. पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर प्रवेश दिला जाईल. आठवीपर्यंत हीच अट तीन किलोमीटरपर्यंत आहे. वर्षभराच्या शैक्षणिक वर्षात संबंधित विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यांकन होईल. एक-दोन विषय राहिले तो विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही.

शाळा व्यवस्थापन समितीत बदल करण्यात आला असून समितीत 75 टक्के पालक असतील. त्यात 50 टक्के महिला पालकांचा समावेश असेल. समितीचे अध्यक्षपद पालकांकडेच असेल. पहिली ते चौथीसाठी दर 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आणि सहावी ते आठवीसाठी 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असेल.

बुधवार, १९ मे, २०१०

"आयपीएस' अधिकाऱ्यांमधील तंटा!

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा पोलिस दलात वेगळाच तंटा सुरू आहे. तो तंटा आहे दोन "आयपीएस' अधिकाऱ्यांचा. इतर काही अधिकारी आणि अवैध धंदेवाले त्याला खतपाणी घालत आहेत. एकीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त झालेली जनता मात्र या नव्या तंट्यामुळे आणखीच वैतागली आहे. इतरांचे तंटे मिटविणाऱ्या पोलिसांतील हा तंटा कोणी मिटवायचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पोलिस अधीक्षक विजय चव्हाण आणि परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्यामधील हा तंटा आहे. काही काळ आतल्याआत धुमसत असलेल्या या तंट्याला आता जाहीर स्वरूप आले आहे. इतर अधिकारी, कर्मचारी आणि काही अवैध धंदेवाल्यांनी हा तंटा लावून दिला आहे. अर्थात हे जाणून घेण्यास या दोन्ही अधिकाऱ्यांनी चूक केली, हेही दुर्लक्षून चालणार नाही. प्रशिक्षण संपल्यानंतर परिविक्षाधीन काळासाठी सिंग नगरमध्ये आल्या. त्यांच्या विनंतीनुसार त्यांना नगर शहरात नियुक्ती देण्यात आली आहे. सुरवातीला त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसोबत काम केले. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना या काळात जास्तीत जास्त धडाडीने काम करून प्रमाणपत्र मिळवावी लागतात, ती त्यांना पुढील काळासाठी उपयुक्त ठरतात. शिवाय कामाचा प्रत्यक्ष अनुभवही येतो. त्यासाठी त्यांना विविध ठिकाणी नियुक्ती दिली जाते. अवैध धंद्यावर छापे घातल्यानंतर धडाडी अधिक दिसून येत असल्याने परिविक्षीधन अधिकाऱ्यांचा त्यावर भर असतो. सिंग यांनीही त्याच पद्धतीने कामाला सुरवात केली. सुरवातीचे काही छापे त्यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत जाऊन घातले. त्यानंतर मात्र त्यांना पोलिस दलातील इतर काही पोलिस आणि माहिती देणाऱ्या इतर व्यक्ती भेटल्या. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेला सोडून स्वतंत्रपणे छापे घालण्यास सुरवात केली. छापे घातल्यानंतर त्यांना प्रसिद्धीही मोठी मिळून लागली. बऱ्याचदा तर छाप्याच्यावेळीच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासमवेत असत. तशी व्यवस्था त्यांच्यासोबत असलेले पोलिस करीत असत. छाप्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना अनेकदा सिंग आपले काम सांगताना स्थानिक दलावर टिकाही करीत. त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्याही वागणुकीत फरक पडला. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचाही ते अवम

ान करू लागले. सिंग यांचा हा करिष्मा पाहून अवैध धंदेवाल्यांनी आपल्यातील खुन्नस काढून घेण्यास सुरवात केली. मुळात येथील अनेक पोलिसांचे धंदेवाल्यांशी संबंध आहेत. केवळ संबंध नाहीत, तर त्यावरून त्यांच्यात गटबाजी आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी धंद्यावर छापा घालण्यासाठी त्याची माहिती सिंग यांच्यापर्यंत या पोलिसांमार्फत पोचविली जाऊ लागली. त्यानुसार कारवाई होऊ लागल्याने हे प्रकार वाढतच गेले.

यामुळे दुखावल्या गेलेल्या पोलिसांच्या एका गटाने पोलिस अधीक्षक चव्हाण यांच्यापर्यंत या गोष्टी पोचविल्या. त्यांनी यामध्ये लक्ष घालून सिंग यांना सावधगिरीचा इशारा दिला. मात्र, सिंग यांच्यासोबत फिरणाऱ्या पोलिसांनी त्यांचा वेगळा अर्थ काढून वादाची ठिणगी पाडली. दरम्यानच्या काळात पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियुक्‍तीची मुदत संपल्याने सिंग यांना नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांना पूर्वी देण्यात आलेले जिल्हा विशेष शाखेचे वाहन काढून घेण्यात आले. त्याचेही मोठे राजकारण झाल्याने गैरसमजात आणखी भर पडली. दुसरीकडे तालुका पोलिस ठाणे दिले असतानाही सिंग यांनी नगर शहरासह इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत छापे घालणे सुरूच ठेवले. त्यांच्या भोवतीच्या मंडळींनी चव्हाण यांच्याबद्दल वरिष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवकांकडे तक्रारी पोचविण्यास सुरवात केली. त्यामुळे चव्हाणही अस्वस्थ झाले. त्यातूनच त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत रुईछत्तिशी येथील कथित डान्सबारवर छापा घातला. दुसऱ्या बाजूकडून त्याचेही भांडवल करून हा डाव चव्हाण यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न केला.

दुसरीकडे जनतेमध्ये या तंट्याबद्दल गैरसमज पसरविणारे वातावरण तयार केले जात आहे. सिंग यांना नगरलाच पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्त करा, अशी अवास्तव मागणीही पुढे येत आहे. ज्यांच्या परिविक्षाधीन काळाचे आणखी काही टप्पे आणि पोलिस अधीक्षक होईपर्यंतचा नोकरीचा बराचसा टप्पा अजून पूर्ण व्हायचा आहे, त्यांना लगेच पोलिस अधीक्षक कसे करता येईल? जनतेमध्ये मात्र यातून बरेच गैरसमज पसरण्यास सुरवात झाली आहे.

या तंट्यात दोन्ही अधिकाऱ्यांची चूक आहे. सिंग यांनी आपल्याभोवतीची माणसे तपासून सरळमार्गी काम केले असते, तर ते अधिक प्रभावी आणि वादातीत झाले असते. यापूर्वी अविनाशकुमार किंवा अन्य अधिकाऱ्यांनी अशाच पद्धतीने काम करून आपला ठसा उमटविला होता. छापे घालताना पोलिस यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेण्याची गरज नव्हती. गुन्हेगारांवर कारवाई करताना अनेकदा त्यांच्याच क्षेत्रातील लोकांचा वापर करावा लागतो, हेही खरे पण त्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी होती. जिल्ह्यात कामासाठी मोठा वाव असताना केवळ ठराविक धंद्यांवरच कारवाई केल्यानेही अशी परिस्थिती ओढावली असावी. कित्येक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, सराफी दुकानांवर दरोडे घालणारा नांगऱ्या, अंबिका डुकरेचा खून करणारा अनिल जगन्नाथ पवार असे किती तरी गंभीर गुन्ह्यांतील आरोपी वर्षानुवर्षे फरारी आहेत. त्यांना पकडले असते, महिलांची छेड काढणाऱ्या रोमिओंना चोप दिला असता, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले व्यवसाय, टपोरेगिरी करत फिरणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त केला असता, मंगळसूत्र चोरणाऱ्यांच्या हातात बेड्या ठोकल्या असत्या, शहर आणि तालुक्‍यातील अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असती, तर त्यांचे काम अधिक प्रभावी झाले असते. मुळात "सिस्टिम'मध्ये राहून काम करण्याची सवय लावून घेणे, हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंगा न घेता, त्यांना विश्‍वासात घेऊनच काम करण्याची पद्धत त्यांनी आतापासूनच अवलंबण्यास हवी आहे. पोलिस दलाच्या शिस्तीसाठी ती आवश्‍यक बाबही आहे.

पोलिस अधीक्षक चव्हाण यांनीही त्यांना विश्‍वासात न घेता केलेल्या या कामाबद्दल एवढे मनाला लावून घ्यायला नको होते. शेवटी तेच जिल्ह्याचे प्रमुख आहेत. इतर अधिकारी जर ही कामे करीत नसतील, तर त्यांनी ती अशा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांकडून करून घेणे गरजेचे होते; परंतु त्यांच्यात सुरवातीपासूनच फारसा संवाद झाला नसावा. दोघांच्याही भोवती असलेल्या टोळक्‍यांनी त्यांच्यामध्ये संवाद होऊ न देता विसंवादच वाढल्याने हा तंटा उद्‌भवला आहे. आता जिल्हा पोलिस दलाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पी अन्बलगन यांनीच यात लक्ष घालून तंटा मिटविला पाहिजे आणि सिंग यांचा राहिलेला दोन महिन्यांचा कालावधी चांगला जाईल व त्यांच्याकडून राहिलेली कामे होतील, आणि चांगले प्रशिक्षण व अनुभव मिळेल, असे पाहिले पाहिजे.

मंगळवार, ११ मे, २०१०

शनिशिंगणापुरातून चोरी झाली पण....


शनी देवाच्या कृपेमुळे गावात चोऱ्या होत नाहीत, म्हणून लोकांनी घराला दारेच बसविलेली नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात सुरू असलेली प्रथा आजही सुरू आहे. त्यामुळे कितीही चांगले घर बांधले तरी त्याला दारे बसविली जात नाहीत. गावात चोरी झाली तरी शनीदेव त्याला अद्दल घडवितो, अशी लोकांची श्रद्धा आहे. दोन दिवसांपूर्वी याला बळकटी देणारी घटना या गावात घडली. औरंगाबादच्या चोरट्यांनी या गावाच्या हद्दीत एक तवेरा गाडी चोरून नेण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्या गाडीला अपघात होऊन ते पकडले गेले. गावाच्या सीमेबाहेर जाण्याअधीच पकडले जाऊन त्यांच्या हातात बेड्या पडल्या. यामध्ये योगायोग किती अन्‌ शनीची कृपा किती हे तेथील लोकच ठरू जाणे.
त्याचे असे झाले, औरंगाबादमधील किशोर गायकवाड याने सिडको भागात राहणाऱ्या वीरभद्र गादगे यांची तवेरा गाडी शिंगणापूला जायचे म्हणून भाड्याने ठरविली. ती घेऊन गाडीचा चालक विजयसिंग जागरवाल यांच्यासह गायकवाड शिंगणापूरकडे निघाला. वाटेत त्याने त्याचे आणखी सहा सहकारी गाडीत घेतले. रस्त्यात चालकाला मारहाण करून गाडी घेऊन पळून जायचे, असा त्यांचा बेत होता. त्यामुळे गाडी शनिशिंगणापूर जवळ येताच त्यांनी चालकाला चाकूचा धाक दाखवून गाडीच्या मागील सीटवर घेतले आणि त्यांचा एक सहकारी गाडी चालवू लागला. निर्जन ठिकाणी गेल्यावर चालकाला उतरवून देण्याची त्यांची योजना होती. मात्र भरधाव वेगाने गाडी चालविताना ती शिंगणापूर ट्रॅस्टच्या रूग्णालयाच्या भिंतीला धडकली.

हा प्रकार पाहणाऱ्या लोकांना वाटले शनिभक्तांच्या गाडीला अपघात झाला. त्यामुळे ते मदतीला धावले. त्यांनी गाडीतील जखमींना बाहेर काढण्यास सुरवात केली. पण ज्याला बाहेर काढले तो लगेच पळून जात होता. शेजारच्या उसाच्या शेतात आणि वाट दिसेल तिकडे गाडीतील तरुण पळत होते. हा प्रकार पाहून मदत करणारे ग्रामस्थही भांबावले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. गाडीत बांधून ठेवलेल्या चालकाने ग्रामस्थांना या चोरट्यांची माहिती दिली. त्यामुळे ग्रामस्थ व पोलिस यांनी शोधाशोध करून मुख्य सूत्रधार गायकवाड याच्यासह तिघांना पकडले. वाहनाची चोरी टळली. तसा प्रयत्न करणारे आता पोलिस कोठडीची हवा खात आहेत.

या घटनेनंतर गावात शनी देवाच्या लिलेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मध्यंतरी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गावकऱ्यांच्या या श्रद्धेला आव्हान दिले होते. गावात जाऊन चोरी करून दाखविण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. लोकांचा वाढता विरोध लक्षात घेता पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन आतापर्यंत होऊ शकले नाही. आता मात्र ही घटना घडल्याने गावातील लोकांना आपली बाजू पटवून देण्याची संधी मिळाली आहे.

रविवार, ९ मे, २०१०

विद्यार्थ्यानेच रचला अपहरणाचा बनाव

लोणी खुर्द (ता. राहाता) येथील श्रीराम भास्कर दिघे (वय 17) या महाविद्यालयीन युवकाने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव रचला आणि आई-वडिलांसह नातलगांमध्ये घबराट उडवून दिली. लोणी पोलिसांनी त्याला 24 तासांच्या आत पुण्यात जाऊन ताब्यात घेऊन घरी आणल्यानंतर या नाट्यामागील गूढ उकलले.

 श्रीराम हा नुकताच अकरावी उत्तीर्ण झाला. परीक्षेत 44 टक्केच गुण मिळाल्यामुळे त्याने खाडाखोड करून गुणपत्रकावर 74 टक्के गुण वाढविले. श्रीरामच्या वडिलांना या प्रकाराचा संशय आला. महाविद्यालयात जाऊन या प्रकाराची चौकशीच करतो, असे ते श्रीरामला म्हणाले. त्यामुळे रागावलेला श्रीराम पहाटे घरातून बेपत्ता झाला. जाताना त्याने कपाटातून 50 हजार रुपये नेले. स्वतःचा मोबाईल घरी ठेवून गड्याच्या नावावरील सिम कार्ड बरोबर नेले.

श्रीरामच्या वडिलांना  गड्याच्या क्रमांकावरून फोन आला. "तुमच्याकडे द्राक्षाचे भरपूर पैसे आहेत. तुमचा मुलगा पाहिजे असेल, तर हॉटेल ताजला 50 लाख रुपये आजच घेऊन या,' अशी धमकी श्रीरामच्या वडिलांना देण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता पुण्यातील बुधवार पेठेतून दूरध्वनी आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खंडणीसाठीच श्रीरामचे अपहरण झाल्याचा दिघे कुटुंबीयांचा संशय बळावला. दरम्यान, श्रीरामचा त्याच्या वडिलांना पुन्हा दूरध्वनी आला. आपल्याला खूप मारले आहे हे पटवून देण्यासाठी अनोळखी आवाजात श्रीरामच्या वडिलांशी बोलणेही करवून दिले.
पोलिसनी  मोबाईल क्रमांक व पुण्यातील पीसीओ क्रमांकाच्या आधारे तपासाची सूत्रे गतीने हलविली. यांनी शिवाजीनगर बस स्थानकाजवळील एका लॉजमधून श्रीरामला ताब्यात घेतले. श्रीरामने आपल्या मेहुण्याच्या नावावर लॉजमध्ये स्वतःची नोंद केली होती. त्याने लॅपटॉप, मोबाईल बॅग व कपड्यांसह 40 हजारांची खरेदी केली.

शुक्रवार, ७ मे, २०१०

कसाबची फाशी प्रत्यक्षात केव्हा ?


 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला आज विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली असली तरी ती प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी बऱ्याच कायदेशीर प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यामुळे या शिक्षेची लगेचच अंमलबजावणी होऊ शकणार नाही. मुख्य म्हणजे यापूर्वी फाशीची शिक्षा झालेल्या 29 जणांची प्रकरणे अद्याप राष्ट्रपतींकडे पडून आहेत. त्यामध्ये 1993 मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी, राजीव गांधी हत्येच्या प्रकरणातील आरोपीस, संसदेवरील हल्ल्यातील मोहमद अफजल गुरू अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची आरोपींच्या फाशीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. या "प्रतीक्षा' यादीत कसाबचा क्रमांक तिसावा लागेल.
अर्थात कसाबचे प्रकरण यापेक्षा विशेष प्राधान्याने घेतले तरी त्यासाठीच्या कायदेशीर प्रक्रियेतून ते न्यावे लागणार आहे. सत्र न्यायायलयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाकडून शिक्का मोर्तब करून घ्यावे लागत असते. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी आरोपीला सहा महिन्यांची मुदत असते. जरी आरोपीने अपील केले नाही, तरी सरकारकडूनच हे प्रकरण उच्च न्यायालयात मान्यतेसाठी नेले जाते. त्यासाठी सत्र न्यायालयातील निकालाची कागदपत्रे संकलित करून पाठविली जातात. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. मुळातच या प्रकरणातील कागदपत्रेही खूप मोठ्या संख्येने आहेत.

हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यावर तेथे पुन्हा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होतो. प्रत्यक्षात साक्षिदारांची तपासणी व उलट तपासणी तेथे चालत नसली तरी त्यासंबंधी सत्र न्यायालयात नोंदविण्यात आलेले जबाब मात्र तपासले जातात. उच्च न्यायालयाने फाशीवर शिक्षा मोर्तब केल्यानंतर आरोपीला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा असते. त्यालाही मुदत असते. तेथेही शिक्षा झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा असते. तेथेही अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष फाशी देण्याचा दिवस ठरविला जातो. ती प्रक्रियाही मोठी किचकट आहे. कसाबच्या प्रकरणात आतापर्यंतचे कामकाज पाहिले तर सरकार पक्षाने कोणताही धोका न पत्करता सर्व प्रक्रिया ठरल्याप्रमाणे होऊ दिल्याचे दिसते. कसाबने गुन्हा कबुल करूनही त्याच्याविरूद्धचा खटला चालवूनच निकाल देण्यात आला. तसेच यापुढील प्रक्रियेच्या बाबतीत केले जाऊ शकते. त्यामुळे या वर्षात तरी शिक्षेची प्रत्यक्ष अमंलबजवाणी होईल, असे वाटत नाही. (e Sakal)

बुधवार, ५ मे, २०१०

मदतीला धावून येणारे पालकमंत्री

रस्त्यात अपघात झालेला पहिल्यावर केवळ बघ्याची भूमिका घेणारे अन्‌ निघून जाणारे लोक सर्रास दिसतात. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे मात्र अतिशय कमी. "व्हीआयपी' लोकांचे तर हे कामच नाही; मात्र नगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते हे याला अपवाद म्हणावे लागतील. मंत्री झाले म्हणूनच नाही, तर पूर्वीपासूनच अपघातग्रस्तांना मदत करण्याची त्यांची सवय आहे. मंत्री झाले तरी त्यांनी ती जपली आहे. अर्थात, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असू शकतील. कोणी याला प्रसिद्धीचा "स्टंट' म्हणेल, तर कोणी हे त्यांचे कर्तव्यच आहे असे म्हणेल. एक गोष्ट मात्र निश्‍चित, श्री. पाचपुते यांच्या या कृतीतून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा एक चांगला संदेश लोकांमध्ये जातो. एखादा मंत्रीच जर अपघातग्रस्तांच्या मदतीला तत्काळ धावून जात असेल, तर सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकही यातून काही बोध घेतील, असे वाटते. त्यादृष्टीने पालकमंत्री करीत असलेले काम मोलाचे ठरते.

अपघातानंतर पोलिस चौकशीचा ससेमिरा मागे लागतो, असा एक समज लोकांमध्ये रूढ झाला आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती कमी झाली आहे. वेळेवर मदत न मिळाल्याने अपघातात दगावणाऱ्यांची संख्या वाढते. कोणी मदतीसाठी थांबला, तर इतर वाहनचालक त्यांना सहकार्य करण्यास तयार होत नाहीत. एवढेच काय, सरकारी अधिकारी, कर्मचारी, ड्युटीवर नसलेले पोलिससुद्धा अशा वेळी मदतीला धावून येत नाहीत. एका बाजूला पोलिस चौकशीची भीती आणि दुसरीकडे उदासीनता. यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्याचे टाळले जाते. विशेष म्हणजे, एकदा अपघातातून बचावलेली माणसेसुद्धा दुसऱ्याच्या अपघाताच्या वेळी धावून जात नाहीत, असेही आढळून येते.

यासाठी लोकांचे प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. आता नियम खूप बदलले आहेत. अघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना आता पूर्वीसारखे नसत्या चौकशांना सामोरे जावे लागत नाही. मात्र, याची लोकांना फारशी माहिती नाही. ती व्हावी, यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रबोधनासाठी प्रयत्नही केले जात नाहीत. वाहतूक सुरक्षा सप्ताहातूनसुद्धा यावर भर दिला जात नाही. अपघात झाल्यास मदत करण्याचे काम पोलिसांचे आहे, आपले नाही, असाच समज लोकांमध्ये रूढ होत आहे. त्यामुळे काही जण दूरध्वनी करून पोलिसांना अपघात झाल्याचे कळवितात आणि निघून जातात. अपघातग्रस्तांच्या असहायतेचा गैरफायदा उठवत त्यांच्याजवळच्या चीजवस्तू लांबविणारेही काही लोक पाहायला मिळतात, ही गोष्ट वेगळी.

या पार्श्‍वभूमीवर श्री. पाचपुते यांचे काम वेगळे ठरते. प्रत्यक्ष कृतीतून लोकांचे प्रबोधन ते करीत आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता, सर्व ठिकाणी श्री. पाचपुते किंवा प्रशासन पोचू शकत नाही. त्यासाठी लोकांनीच मदतीसाठी पुढे आले पाहिजे, हा एक संदेश यातून जाणार आहे. कामात व्यग्र असणारे मंत्री स्वतः अपघाताच्या ठिकाणी थांबतात, रक्ताने माखलेल्या लोकांना आपल्या वाहनात घेतात, त्यांना दाखल करण्यासाठी रुग्णालयात जातात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रवचनकार असलेले श्री. पाचपुते त्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करीत आहेत; परंतु त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून केलेले प्रबोधन अधिक प्रभावी आणि उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे या विषयाला प्रसिद्धी मिळालीच पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत श्री. पाचपुते यांचा हा कृतिसंदेश गेला पाहिजे. त्यातूनच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.

मंगळवार, ४ मे, २०१०

पत्रकारिता पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्त गाव मोहिमेतील पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल विजयसिंह होलम यांचा सत्कार करताना नगरचे पालकमंत्री बबनराव पाचपुते. समवेत जिल्हाधिकारी डा. पी. अन्बलगन व इतर अधिकारी. नाशिक विभागातील प्रथम क्रमांकाचा १ लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.