मोठ्या शहरांतील पोलिस जाऊ द्या; पण ग्रामीण भागातील पोलिस प्रामाणिकपणात अघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. कर्तव्यकठोरता नसली, तरी इमानदारीत नोकरी करणारे पोलिस ग्रामीण भागात जास्त असतात, असे आढळून येते. अर्थात नगरही त्याला अपवाद नाही. इमानदारीत नोकरी करणारे पोलिस येथेही आहेत. त्याचबरोबर एखाद्या राजकारण्याला किंवा उद्योगपतीला लाजवेल अशी संपत्ती जमवून मोठे बंगले बांधणारे, महागड्या गाड्या घेणारे पोलिसही नगरमध्ये कमी नाहीत. पोलिस खात्याकडून मिळणारा पगार पाहता, केवळ पगारावर हे शक्यच नाही. मोक्याच्या जागी बदली करवून घेण्यासाठी आधी "पेरणी' करायची आणि नंतर मग कमाईच कमाई, ही पोलिसांची पद्धत सर्वत्रच आहे. अर्थात नगर जिल्ह्यात जुगाराची कीड काही नवीन नाही. राजकीय व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती, सरकारी नोकर, व्यावसायिक, डॉक्टर, वकील अशी मंडळीही जुगार खेळताना पकडली गेल्याची उदाहरणे आहेत. गावागावांत आणि शहरातही लोक दिवसभर जुगार खेळत बसलेले असतात. वर्षानुवर्षांची ही कीड मोडून काढण्यात पोलिसांना यश येत नाही.
नगरच्या मुख्यालयात मात्र जरा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. तेथील बॉक्सिंग हॉलमध्ये म्हणे पोलिसांनीच जुगारअड्डा सुरू केला होता. गेल्या वर्षी पोलिसांच्या मोठ्या संख्येने बदल्या झाल्या. त्यामध्ये तांत्रिक कारणाने अनेकांच्या बदल्या मुख्यालयात करण्यात आल्या. त्यामुळे साडेआठशेहून अधिक पोलिस तेथे आहेत. शिवाय, ज्यांच्या बाहेर बदल्या झाल्या, त्यांच्यापैकी बरेच जण कामावर न जाता नगरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यामुळे काम नसलेल्या पोलिसांची संख्या वाढली. मुख्यालय म्हणजे "वरकमाई' नसलेले ठिकाण. वेगळे उद्योग करण्याचीही सोय नाही. अशा पोलिसांनी वेळ घालविण्यासाठी म्हणून पत्ते सुरू केले. पुढे त्याचे रूपांतर जुगारात कधी झाले ते कळालेच नाही. अशा धंद्यावर छापा घालताना त्यांचा जवळून अभ्यास असलेल्या पोलिसांनी मग त्याच पद्धतीने आपला अड्डाही चालविण्यास सुरवात केली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या भेटीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांची आणखी नाचक्की नको म्हणून गुन्हा दाखल करण्याचे टाळण्यात आले असले, तरी संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई होत आहे. मात्र, या प्रकारातून लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो, याचे भान पोलिसांनी ठेवले पाहिजे. उद्या पोलिस कोणत्या तोंडाने इतर ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापे घालण्यासाठी जाणार? "जुगार खेळणारे' अशी जर पोलिसांची प्रतिमा होणार असेल, तर त्यांचा गुन्हेगारांवर वचक कसा राहणार? सामान्य जनतेला त्यांचा आधार कसा वाटणार, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा