सोमवार, १४ सप्टेंबर, २००९

तरुणांनो! डोकी शांत ठेवा


मिरजेतील दंगलीचे लोण आता सांगली, इचलकरंजी ते कोल्हापूरपर्यंत पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना घडलेल्या या घटनेचे अर्थातच आता राजकीय भांडवल केले जाऊ लागले आहे. त्यामुळे तरुणांची डोकी भडकावून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. भावना आणि अस्मितेचा मुद्दा पुढे करून तरुणांचे हात दंगलीसाठी वापरले जात आहेत. याचा संबंधित राजकीय व्यक्तींना लाभ होईल, अगर होणार नाही; मात्र यात अडकणाऱ्या तरुणांच्या भविष्याचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तरुणांनी डोकी शांत ठेवून याचा विचार करण्याची गरज आहे.

इतिहासातील अस्मिता जपलीच पाहिजे, त्याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ते करीत असताना वास्तवाचे भान आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टीही जोपासली पाहिजे. दंगलीमुळे कोणाचा राजकीय फायदा होत असला, तरी दंगल करणाऱ्यांचा फायदा नव्हे, तर तोटाच होतो. सर्वाधिक नुकसान होते ते तरुणांचे. आतापर्यंतच्या दंगली पाहिल्या, तर त्यात अल्पवयीन मुले आणि 18 ते 25 वयोगटांतील तरुणांचाच सहभाग अधिक असतो. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्यांमध्येही अशांची संख्या अधिक असते. खरे तर शिकण्याचे, करिअर करण्याचे हे वय; पण "दंगलखोर' म्हणून शिक्का पडल्याने शिक्षण आणि नोकरीवरही गदा येते. कोणाच्या तरी भडकावण्यावरून दगडफेकीसाठी हात उचलणे महागात पडते आणि पुढील आयुष्यापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.

मिरजेच्या दंगलीचाही आता राजकीय वापर केला जाईल. त्याचा कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल, हे आताच सांगता येणे शक्‍य नसले, तरी त्यात अडकलेल्यांचे आणि सर्वसामान्यांचे मात्र नुकसान होणार हे निश्‍चित. अशा घटनांमध्ये चर्चेतून मार्ग काढणे शक्‍य असते. त्यासाठी पोलिस प्रशासन आणि समाजातील जाणत्या मंडळींनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे; परंतु ज्यांना अशा घटनांचा राजकारणासाठी वापर करायचा आहे, त्यांना यातून मार्ग काढणे अपेक्षित नसते. उलट त्याला खतपाणी घालण्याचे काम ही मंडळी करतात. त्यासाठी तरुणांची माथी भडकावून त्यांचे हात दंगलीसाठी वापरले जातात. राजकीय फायदा झाला, की हीच मंडळी तरुणांना विसरून जातात. सत्ता आणि राजकारणातील पदे मिळविताना तरुणांचा त्यांना विसर पडतो. ही गोष्टही विसरता काम नये.

जे हात विकासासाठी पुढे यायला हवेत, ज्या डोक्‍यांतून सुपीक कल्पना बाहेर येऊन विकासाचे नियोजन व्हायला हवे, ज्यांनी धडाकेबाज निर्णय घेऊन देशाला दिशा देण्याची गरज आहे, अशी तरुण डोकी आणि हात दंगलीत अडकवून काय साध्य होणार आहे? मात्र, जोपर्यंत दंगलीसाठी असे हात आणि डोकी उपलब्ध होत आहेत, तोपर्यंत हे प्रकार घडतच राहणार. त्यामुळे आता तरुण पिढीनेच याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपला इतिहास तर जोपासूच; पण नवा इतिहास रचण्यासाठीही प्रयत्न करू, असा विचारही केला जाऊ शकतो. सत्तेसाठी नकारात्मक राजकारणाचा अवलंब करणाऱ्या नेत्यांकडून काही अपेक्षा करता येणार नाही; मात्र विचारी तरुण पिढीने आपला गैरवापर तरी थांबविला पाहिजे, असाच विचार मिरजेतील दंगल थांबवू शकतो.
(eSAkal)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: