रविवार, ११ मार्च, २०१२

का वाढतायेत "एम गुन्हे'?

गे ल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात न्यायालयाच्या आदेशानुसार म्हणजे 156 (3) नुसार गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांच्या भाषेत अशा गुन्ह्यांना "एम गुन्हे' म्हणतात. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करताना पोलिस ठाण्यातील डायरीत गुन्हा नोंदणी क्रमांकाच्या आधी "एम' असे लिहिले जाते. त्यामुळे हा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झाला आहे, हे लक्षात येते. अर्थात यामध्ये बेकायदेशीर काही नाही. फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 156 (3) नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना अशा प्रकारे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्यानुसार तपास करणेही पोलिसांना क्रमप्राप्त ठरते. मात्र, अशा प्रकारे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार वाढणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे ठरते. कारण दखलपात्र गुन्ह्यांची पोलिसांनी दखल घेतली नाही, म्हणून तक्रारदाराने न्यायालयात धाव घेऊन खासगी दावा दाखल केलेला असतो, त्यामध्ये न्यायदंडाधिकारी असे आदेश देतात. याचाच अर्थ तक्रारदाराचे समाधान करण्यात पोलिस कमी पडलेले दिसून येतात. अर्थात या प्रक्रियेचा वापर करून अनेकदा खोट्या तक्रारी करून त्याचे गुन्हे दाखल करून घेण्याचेही प्रकार घडतात.
नगर जिल्ह्यात खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार नवीन नाहीत. पोलिसांनी दखल घ्यावी, यासाठी किरकोळ गुन्हे गंभीर स्वरूपात सांगण्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यामुळेच दरवर्षी दाखल होणाऱ्या तांत्रिक दरोड्यांच्या प्रकरणांत वाढ होते. निवडणुकीच्या काळात तर हे गुन्हे अधिकच वाढतात. या काळात आलेल्या तक्रारी पाहिल्या, तर असे वाटते, की जिल्ह्यातील प्रत्येक जण हातात तलवारी, गुप्त्या, काठ्या अशी हत्यारे घेऊनच फिरत असतो आणि प्रत्येक तक्रारदाराच्या गळ्यात सोनसाखळी, हातात अंगठी आणि खिशात रोख रक्कम असते. या ऐवजासह तो रात्री-अपरात्री एकटा फिरत असतो आणि हल्लेखोर मात्र पाच पाचच्या टोळक्‍याने फिरत असतात. या काळात पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारी पाहिल्या असता, त्यात असेच काहीसे वर्णन असते. परस्परविरोधी फिर्यादी दाखल होण्याचेही प्रमाण या काळात जास्त असते. अनेकदा तर एकाची तक्रार आली, की पोलिस दुसऱ्याला बोलावून घेऊन त्याचीही तक्रार नोंदवून घेतात, तर अनेकदा दोघेही एकाच वेळी फिर्याद देण्यासाठी आलेले असतात. अशावेळी पोलिसांचा कस लागतो. तक्रारदार काहीही हकीगत सांगत असले, तरी खरा काय प्रकार आहे, त्यावेळी परिस्थिती काय होती, याचा विचार करून पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढून घडल्या तेवढ्या प्रकाराची खरीखुरी नोंद केली, तर वाद तेथेच थांबतो. असे कौशल्य काही अधिकाऱ्यांमध्ये असते. मात्र, काहींना हे जमत नाही. तेथे तक्रारदार आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत न्यायालयात दाद मागतात. तेथे जाण्यासाठी आणि गेल्यावरही त्यांना अनेक "गुरू' भेटतात. त्यामुळे मूळ हकीगत आणखी गंभीर बनविली जाते. अशा गंभीर घटनेचे आणि कलमांचे प्रकरण समोर आल्यावर न्यायालय त्याची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश देते. कारण त्यावेळी न्यायालयापुढे दुसरा पर्याय नसतो, त्याची चौकशी करण्याची यंत्रणाही न्यायालयाकडे नसते. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा संबंधित पोलिसांकडेच पाठवावे लागते. सुरवातीला साधी घटना नोंदविण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना आता हे गंभीर प्रकरण नोंदवून घ्यावे लागते. अर्थात तपासात त्याचे पुढे काय होते, प्रकरण आपसांत कसे मिटते, ही गोष्ट वेगळी. अनेकदा प्रकरण परत येईपर्यंत त्यात पोलिसांनाही लक्ष्य केलेले असते. त्यामुळे पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची वेळ येते. एका साध्या घटनेचे रूपांतर मोठ्या घटनेत होते. त्याकडे सर्वांचेच लक्ष वेधले जाते. यातून आणखी एक गोष्ट घडते, ती म्हणजे पोलिस दखल घेत नाहीत, त्यासाठी न्यायालयात जावे लागते, असा एक संदेश नागरिकांमध्ये जातो. त्यामुळे इतरही तक्रारदार पोलिस ठाण्याऐवजी थेट न्यायालयाचीच वाट धरतात. परिणामी अशा गुन्ह्यांची संख्या वाढतच राहते.

हे प्रकार टाळण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे वर्तन पक्षपाती नसावे. तेथे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्याबद्दल विश्‍वास असावा. त्यासाठी या अधिकाऱ्यांनी कोणासोबत उठबस ठेवावी, कोणाला जवळ करावे, कोणाबद्दल काय जाहीर वक्तव्ये करावीत, यावर नियंत्रण ठेवले पाहिजेत. या बारीक-सारीक गोष्टींतून नागरिक त्यांचे परीक्षण करीत असतात. त्यामुळे अशा अधिकाऱ्याकडून आपल्याला न्याय मिळणार नाही, ही भावना तयार होऊन न्यायालयात जाण्याची वृत्ती वाढीस लागते.

गुरुवार, १ मार्च, २०१२

मद्यपी चालकाला 2 वर्षे शिक्षा, 5 हजार दंड

नवी दिल्ली - मद्य प्राशन करून बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांना चाप बसण्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा कडक तरतुदी असलेल्या मोटर वाहन कायद्यातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (गुरुवार) संमती दिली.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जरब बसण्यासाठी मोटर वाहन कायद्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने आज संमती दिल्याने आता विधेयक संसदेत संमत होण्याची वाट मोकळी झाली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक मांडले जाणार आहे.

या विधेयकातील तरतुदींनुसार, गाडीचा सीटबेल्ट लावला नाही, दुचाकी चालविताना हेल्मेट वापरले नाही किंवा सिग्नल तोडला तर चालकाकडून तब्बल 500 रुपये दंड वसूल केला जाईल. गाडी चालविताना मोबाईल फोन वापरला तरीही चालकाकडून दंड वसूल करण्याची तरतूद यात आहे. एकाच नियमाचा वारंवार भंग केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मद्यपी चालकांना जरब बसण्यासाठी विधेयकात आर्थिक दंडासह कारावासाची शिक्षा सुचविण्यात आली आहे. मर्यादेपेक्षा जास्त मद्य प्राशन करून गाडी चालविल्यास चालकाला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 5 हजार रुपये दंड तसेच दोन्ही होऊ शकतात. अल्पवयीन चालकाने वाहतुकीचे नियम तोडल्याचे लक्षात आल्यास गाडीच्या मालकाकडून दंड वसूल करण्याची तरतूद या विधेयकात आहे.

गाडी चालवताना सीटबेल्ट लावला नाही, दुचाकीवर हेल्मेट घातले नाही आणि सिग्नल तोडल्याचे वारंवार लक्षात आल्यावर चालकावर 500 रुपयांपासून 1 हजार 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. गाडी चालविताना मोबाईल वापरल्यास प्रारंभी 500 रुपये आणि त्यानंतर सुमारे 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. गाडी चालविताना चालक मोबाईल फोनवर बोलत असल्याने रस्त्यांवरील अपघातात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गाडी चालविताना मोबाईल फोन वापरणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

जागते रहोऽऽऽ पुलिस सो रही है।



नगर जिल्ह्यात सध्या सर्वत्र दरोडे आणि घरफोड्या, असे गुन्हे वाढले आहेत. चोरट्यांकडून लोकांना मारहाणही होत असल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. लोकसंख्या आणि विस्ताराच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिस दल कमी आहे, हे मान्य असले तरी उपलब्ध संख्याबळही क्षमतेने काम करीत आहेत का, असा प्रश्‍न पडतो. विविध कारणांमुळे पोलिस दलात नाराजी आणि गटबाजी झाल्याने त्याचा कामावर परिणाम होत आहे. पोलिसांनी गुंडगिरीविरुद्ध मोहीम उघडून बड्या बड्यांना जेरबंद केल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत असला, तरी दरोडे थांबविण्यात मात्र यश आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पोलिसांबद्दल नाराजी आहे. राजकीय गुंडगिरीवरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलिसांना चोर-दरोडेखोरांवर वचक का बरे बसविता येत नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असताना त्याकडे डोळझाक करणारी पोलिस यंत्रणा झोपली आहे की अन्य कामांत व्यस्त आहे, असा संशय निर्माण झाला असून, लोकांनाच रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत चोऱ्या-दरोडे वाढतात, ही नित्याचीच गोष्ट आहे. शिवाय सात जिल्ह्यांची सीमा असलेल्या नगर जिल्ह्यात आतील आणि बाहेरच्या जिल्ह्यांतील टोळ्यांचा मोठा उपद्रव आहेच. पूर्वीपासूनचे हे प्रकार पूर्णपणे थांबणे शक्‍य नाही. मात्र, त्यांना काही प्रमाणात आळा मात्र घालता येतो, हे आतापर्यंत अनेकदा सिद्धही झाले आहे. त्यासाठी या टोळ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण करावा लागतो. त्यांच्यावर केली जाणारी प्रतिबंधात्मक कारवाई, रात्रीची प्रभावी गस्त, गुन्ह्यांचा जलद गतीने केला जाणारा तपास आणि घटनास्थळी तातडीने पोचणारी पोलिस मदत यातून काही प्रमाणात या घटनांना आळा घालता येतो. या दृष्टीने आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली होती. दरोडा प्रतिबंधक योजना, गुन्हेगार दत्तक योजना, टोळ्यांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, ग्रामसुरक्षा दल सक्रिय करणे, ग्रामीण भागात लोकांच्या बैठका घेऊन त्यांच्या मनातील भीती काढून टाकून पोलिसांबद्दल विश्‍वासाचे वातावरण निर्माण करणे, अशा गोष्टीही यासाठी उपयुक्त ठरतात.

सध्या मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. योजना सुरू असल्या, तरी त्यांचा प्रभाव दिसत नाही. ग्रामीण भाग दूरच शहरी भागातसुद्धा तातडीची पोलिस मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. अवैध धंद्यांवर छापे घालण्यासाठी कित्येक पोलिस पथके कार्यरत आहेत. ही पथके नेमके काय काम करतात, कशी कारवाई करतात, त्यामुळे खरेच धंदे बंद झाले का, या गोष्टी वेगळ्याच. मात्र, दरोडेखोरांवर वचक निर्माण करण्यासाठी पथके का स्थापन करू नयेत? लोकांना दिलासा देण्यासाठी किती वेळा वरिष्ठ अधिकारी गावात जातात? घटना घडल्यावर पोलिसांची मदत किती वेळात पोचते? गुन्ह्यांचा तपास केव्हा लागतो? गेल्या काही काळात दरोडेखोरांना कडक शिक्षा झाल्याची उदाहरणे आहेत का? पोलिसांनी उपद्रव करणाऱ्या टोळ्या शोधून काढून त्यांच्यावर हद्दपारी अगर इतर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे काय? शेजारच्या जिल्ह्यांतील टोळ्या येथे येऊन उपद्रव करीत असतील, तर तसे त्या जिल्ह्यातील पोलिसांना कळवून, त्यांच्या मदतीने कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे समाधानकारक नाहीत. त्यामुळेच गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही.

मधल्या काळात दरोडेखोरांवर कारवाई करताना काही पोलिसच अडचणीत आले होते. अशा वेळी वरिष्ठांनी हात वर केले, समाजानेही दुर्लक्ष केले, तर पोलिसांची कारवाईसाठी हिंमत कशी होणार? वरिष्ठांचा कनिष्ठांवर विश्‍वास नसणे, एकतर्फी माहितीच्या आधारे होणारी कारवाई, संघभावना नसणे, एकमेकांवर संशय घेणे, केवळ प्रसिद्धी मिळेल अशाच स्वरूपाची कारवाई करणे, अशा काही दोषांनी सध्या पोलिस यंत्रणेला ग्रासले आहे. त्यामुळे एकूण कामावर आणि प्रतिमेवर परिणाम झाला आहे. त्याचा गैरफायदा चोरट्यांनी उठविल्याचे दिसते. त्यामुळे आता लोकांनाच हातात लाठ्या-काठ्या घेऊन जागण्याची वेळ आली आहे. पण अशा किती रात्री जागून काढणार? ज्यांना या कामासाठी नियुक्त केले आहे, त्यांनी अशा "झोपा' काढायच्या आणि दिवसभर शेतात राबलेल्यांनी रात्री पुन्हा संरक्षणांसाठी जागायचे, हे कितपत योग्य आहे? त्यासाठी जनतेने आवाज उठवून "झोपलेल्या' यंत्रणेला जागे करून आपल्या खऱ्या कामाकडे वळविले पाहिजे.