गेल्या काही काळात गुन्हेगारीची ही पद्धत पाहायला मिळत आहे. ठाण्यापासून मराठवाड्यापर्यंतच्या पट्ट्यात गेल्या दोन-तीन वर्षात अशा प्रकारच्या गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे. यामध्ये सर्वांत गंभीर गोष्ट म्हणजे दरोडेखोर चोरी करताना जबर मारहाण करून लोकांचा जीव घेत आहेत. या पट्ट्यात गेल्या तीन वर्षात अशी कितीतरी माणसे चोरट्यांनी मारली. सराफ दुकाने लुटणे, पेट्रोल पंप लुटणे, घरांवर दरोडे घालून, लोकांचा जीव घेऊन ऐवज पळविणे, बॅंका, पतसंस्थांवरील दरोडे, असे गुन्हे सध्या वाढले आहेत. यामध्ये गुन्हेगारांकडून मोबाईल, वाहने, पिस्तूल या आधुनिक साधनांबरोबरच नव्या युक्त्याही वापरल्या जात आहेत. त्यामुळे पोलिस आणि लोकांनाही गुंगारा देऊन आरोपी दीर्घ काळ फरार राहू शकतात.
पोलिस तपासाची ठरलेली पद्धत असते. त्यांचे काही ठोकताळे असतात. त्यानुसारच तपासाची दिशा ठरते; मात्र आता असे ठोकताळेही कुचकामी ठरत आहेत. गुन्हेगारांना ना प्रदेशाचे बंधन राहिले आहे, ना जाती-जमातींचे. कुठलेही गुन्हेगार कोठेही गुन्हे करून काही वेळात दूरवर निघून जात आहेत. पोलिस मात्र स्थानिक पातळीवर, स्थानिक संशयितांकडे तपास करीत बसतात. पोलिसांच्या तपासाला मदत ठरणाऱ्या खबऱ्यांनाही याची माहिती नसते. त्यामुळे सर्वच बाजूंनी पोलिसांची अडचण होत आहे. बदलत्या स्वरूपाची गुन्हेगारी आणि पारंपरिक पद्धतीची पोलिस यंत्रणा, असेच स्वरूप सध्या पाहायला मिळत आहे. अचानक कोठूनही येऊन गुन्हा करून काही काळायच्या आत निघून जाणारे गुन्हेगार पोलिसांच्या नाकेबंदी आणि दरोडेप्रतिबंधक योजनेतही अभावानेच अडकतात. अमावस्येच्या रात्रीच गुन्हे घडतात, ही संकल्पनाही आता जुनी होत असून, भरदिवसा दरोडे पडण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
बदलती समाजव्यवस्था आणि वाढता चंगळवाद, ही या बदलाची कारणे मानसशास्त्रज्ञ सांगतात. दृक्श्राव्य प्रसारमाध्यांचा वाढता प्रसार, त्यातून होणारे श्रीमंतीचे दर्शन, त्याचा इतरांना वाटणारा हव्यास आणि प्रत्यक्षात समाजात असलेली टोकाची आर्थिक विषमता, हेही यामागील कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे चांगल्या घरातील तरुणही गुन्हेगारीकडे वळालेले पाहायला मिळतात. दरोडे घालायचे, मिळालेल्या पैशातून मौजमजा करायची, जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत मजा करून घ्यायची, अशी वृत्ती वाढलेली दिसून येते. आर्थिक विषमतेतून निर्माण झालेला राग चोरी करताना जीव घेण्यास कारणीभूत ठरतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा