बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

पोलिस दलातील "भेसळ' रोखण्याचे आव्हान

जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. दूध भेसळीसारखे गुन्हेही त्यांनी उघडकीस आणले. एका बाजूला पोलिस अधीक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना त्यांना जिल्ह्यातील इतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची म्हणावी तेवढी साथ मिळताना दिसत नाही. छाप्याची माहिती फोडण्यापासून पोलिस अधीक्षकांना चुकीची माहिती देण्यापर्यंतचे प्रकार सध्या घडत आहेत. गुन्हेगार आणि राजकीय व्यक्तींशी असलेले अनेक पोलिसांचे संबंध कायम आहेत. त्यामुळेच पोलिस दलातील ही "भेसळ' रोखण्याचे आव्हान पोलिस अधीक्षकांपुढे आहे.
नगर जिल्हा पूर्वीपासूनच पोलिसांसाठी "चांगला' या सदरात मोडणारा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात बदली करवून घेण्यासाठी अनेक अधिकारी धडपडत असतात. जिल्ह्यात मिळणाऱ्या "मलिद्या'ला सोकावलेले अधिकारी पुनःपुन्हा जिल्ह्यात येतात. अवैध धंद्येवाल्यांशी निर्माण झालेल्या त्यांच्या संबंधांमुळे अवैध धंदे फोफावले. केवळ शहरच नव्हे, तर ग्रामीण भागापर्यंत सर्व प्रकारचे काळे धंदे फोफावले. एका बाजूला या धंदेवाल्यांशी संबंध ठेवून पैसा मिळवायचा, दुसरीकडे राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठांना खूष ठेवून आपली खुर्ची कायम ठेवायची, अशी येथील अधिकाऱ्यांची सवय. धडाडीचा आणि प्रामाणिक वरिष्ठ अधिकारी आला, तर कारवाईचा धडका सुरू केल्याचे भासवून त्यांचा विश्‍वास संपादन करवून घ्यायचा. प्रसंगी खोट्या कारवाया करून टिमकी वाजवून घेणारे अधिकारीही जिल्ह्यात कमी नाहीत.

कृष्ण प्रकाश यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडून आपल्या हद्दीत अवैध धंदे सुरू नसल्याबद्दलचे प्रतिज्ञापत्र करवून घेतले. त्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत दिली. सध्या विशेष पथकाद्वारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हे पथक रोज कोठे ना कोठे छापे घालत आहे आणि त्यांच्या हाती आरोपी आणि मुद्देमालही लागत आहे. याचा अर्थ धंदे सुरूच आहेत. मग स्थानिक पोलिसांची जबाबदारी काय? एका बाजूला त्यांच्या हद्दीतील धंदे बंद करण्यासाठी विशेष पथक पाठवावे लागते. गुन्हे घडले, तर पोलिस अधीक्षकांसह इतरही अधिकाऱ्यांना लक्ष घालून तपास करावा लागतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास सर्वांनाच बाहेरचा बंदोबस्त हवा असतो आणि पोलिस ठाण्याच्या पातळीवर सुटतील अशा किरकोळ कामांसाठीसुद्धा नागरिकांना थेट पोलिस अधीक्षकांकडे धाव घ्यावी लागते. असे असेल, तर स्थानिक पोलिस करतात काय? त्यांचे नेमके काम काय, या प्रश्‍नांची उत्तरे शोधावी लागतील.

जिल्ह्याला कृष्ण प्रकाश यांच्यासारखे प्रामाणिक आणि कष्टाळू पोलिस अधीक्षक लाभले, ही चांगली गोष्ट आहे. त्यांचा दिवस पहाटे सुरू होतो आणि रात्री उशिरा संपतो. सतत काम करणारा हा अधिकारी धावपळही तेवढीच करतो. ते कोठे जातात, कधी येतात, याची माहिती इतरांना मिळू नये, अशी त्यांची अपेक्षा असली, तरी "भेसळी'मुळे ती फुटतेच. दूध भेसळीच्या छाप्यांची त्यांची योजना अर्धवट राहिली ती यामुळेच. कृष्ण प्रकाश यांनी दूध भेसळीबाबत छापे घालण्यापूर्वी नगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन माहिती संकलित केली होती. एवढेच नव्हे, तर बीड जिल्ह्यातील स्रोतापर्यंत ते गेले होते. या सर्वांची माहिती घेतल्यावर जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी कारवाई हाती घेऊन सर्व ठिकाणी छापे घालायचे आणि जिल्ह्यातील भेसळीच्या किडीचा बंदोबस्त करायचा, अशी त्यांची योजना होती. याचे प्रमाण श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्‍यात अधिक होते, हेही त्यांनी हेरले; मात्र त्यांची ही योजनाही "लिक' झाली. खुद्द काही पोलिसांकडूनच संबंधितांपर्यंत याची माहिती गेल्याने सावध होऊन माल गायब करण्यास सुरवात झाली. याची माहिती मिळाल्यावर कृष्ण प्रकाश यांच्यासमोर तातडीने छापे घालण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीही मोठ्या प्रमाणात माल आणि आरोपीही त्यांच्या हाती लागले. मात्र, या गुन्ह्याच्या तपासातही पुढे पोलिसांतील "भेसळी'चा फटका बसला. याबद्दलची नाराजी खुद्द कृष्ण प्रकाश यांनीच बोलून दाखविली. त्यामुळे यापुढे त्यांना पोलिसांमधील या भेसळीचा बंदोबस्त करावा लागणार, हे निश्‍चित. "अधिकारी आज येतात अन्‌ उद्या बदलून जातात. आपल्याला रोज येथेच काम करायचे आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि धंदेवाल्यांशी संबंध ठेवून राहावे. काही अडचण आल्यास तेच मदतीला धावून येतील,' अशी जी भावना पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे, ती प्रथम दूर झली पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा आणि घरभेद्यांवर कारवाई, या मार्गानेच पोलिसांमधील "भेसळ' थांबविता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: