गुंड आणि पोलिसांच्या वादात फरफट होत असलेल्या अत्याचारित महिलेला सर्वतोपरी आधार देऊन पुन्हा उभे करण्यासाठी मदतीची जबाबदारी येथील स्नेहालय संस्थेने स्वीकारली आहे. संस्थेच्या एका सत्यशोधन समितीने ही महिला आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला. त्याला त्यांनीही तत्त्वतः संमती दर्शविली असून होकार मिळताच तिला तिच्या मुलांसह संस्थेत दाखल केले जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी "सकाळ'ला दिली.
नेवासे तालुक्यातील वाळू तस्करी आणि गावठी पिस्तूल प्रकरणातील आरोपी शिवसेनेचा पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे व त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध एका महिलेवर सामुदायिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतरही पोलिस आणि गुंडांच्या वादात या महिलेची फरफट सुरू होती. यासंबंधी "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत येथील स्नेहालय संस्थेने या प्रकरणी सत्यशोधन समिती स्थापन केली. डॉ. गिरीश कुलकर्णी, ऍड. श्याम आसावा, अनिल गावडे, अंबादास चव्हाण, मीना शिंदे, संदीप कुसाळकर, सारिका माकोडे, रोहित परदेशी, अजय वाबळे यांच्या समितीने नेवाशात या महिलेच्या घरी आणि माहेरी (कुकाणे) जाऊन चौकशी केली. नेवाशातील इतरही लोकांकडे विचारपूस करून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमका प्रकार समजावून घेतला. ही महिला गुंडांच्या वासनेची आणि नंतर राजकारणाची बळी ठरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
संबंधित महिला, तिचे सासरचे आणि माहेरचे लोकही रोजंदारीवर उपजिविका करतात. तिला दोन मुले आहेत. पतीने आत्महत्या केल्याने संसाराचा भार तिच्यावरच असून गुंडांचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे तिला नगरला आणून स्नेहालय संस्थेत ठेवायचे, तिला रोजगार उपलब्ध करून द्यायचा, तिच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करायची आणि या गुन्ह्यात तिला कायदेशीर मदतही करायची, असा निर्णय समितीने घेतला आहे. तिच्या नातेवाइकांना याबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी यासाठी संमती दर्शविली असली, तरी विचार करण्यासाठी थोडा अवधी मागितला आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते आता त्यांच्याकडून येणाऱ्या निरोपाची वाट पाहत असून होकार मिळताच महिलेला तिच्या मुलांसह सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येणार आहे.
हे प्रकरण दडपण्याच्या मार्गावर असताना त्यातील वास्तव "सकाळ'नेच मांडले. त्या महिलेची अत्याचारानंतरची फरफटही "सकाळ'मुळे समजली. त्यामुळेच आम्हाला तेथे जाऊन त्या महिलेला मदत करता आली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून "स्नेहालय'तर्फे डॉ. कुलकर्णी यांनी "सकाळ'ला धन्यवाद दिले.
आरोपींना "मोक्का' लावण्याची मागणी
दरम्यान, या विवाहितेवर अत्याचार करून तिच्या पतीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपींवर "मोक्का'नुसार कारवाई करावी, अशी मागणी येथीस स्वयंसेवी संस्थांच्या महासंघातर्फे करण्यात आली आहे. महासंघातर्फे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेवाशाच्या गंगानगर भागात राहणाऱ्या या विवाहितेवर सामुदायिक अत्याचार करण्यात आला. फिर्याद द्यायला निघालेल्या या महिलेला अण्णा लष्करेने धमकावले. या टोळीची या भागात मोठी दशहत असून, वाळू तस्करीतून मिळालेला पैसा आणि दहशतीच्या जोरावर महिलांवर अत्याचार करण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपींवर कडक कारवाई होण्याची गरज आहे. महासंघातर्फे ऍड. श्याम आसावा, अंबादास चव्हाण, रत्ना शिंदे, मीना शिंदे, डॉ. गिरीश कुलकर्णी, ऍड. निर्मला चौधरी, ऍड. विनायक सांगळे, हनीफ शेख, सुवालाल शिंगवी, मिलिंद कुलकर्णी, यशवंत कुरापाटी, संदीप कुसाळकर, प्रसन्न धुमाळ, रोहित परदेशी आदींनी ही मागणी केली आहे.
सारे गप्प कसे?
नेवाशात गुंडांच्या सामुदायिक अत्याचाराला बळी पडलेल्या या महिलेची फरफट उघडपणे दिसत असूनही सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष गप्प कसे? याच तालुक्यात काही वर्षांपूर्वी अंबिका डुकरे या विद्यार्थिनीच्या बाबतीत अशी घटना घडली, तेव्हा अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. तेही आता गप्प कसे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वाळू तस्करी आणि गावठी शस्त्रांशी संबंधित गुंडांच्या टोळीने या महिलेवर सामुदायिक अत्याचार केला. त्याला वैतागून तिच्या पतीने आत्महत्या केली. पाच महिन्यांनी या प्रकरणाला वाचा फुटली असली, तरी पोलिस-गुंडांच्या वादात महिलेची फरफट सुरूच आहे. अशा परिस्थितीत तिच्या मागे कोणीही उभे राहिले नाही. एरवी महिला अत्याचार प्रकरणी तातडीने धावून येणाऱ्या, किमान पत्रके काढून निषेध व्यक्त करणाऱ्या राज्यस्तरावरील महिला संघटनांनीही अद्याप या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. हे गुंड ज्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, त्यांच्याकडून या प्रकरणाला "वेगळा रंग' देण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यांचे विरोधकही याविरोधात पुढे आले नाहीत. ही त्या संबंधित आरोपींची व त्यांच्या पाठीराख्यांची दहशत, की तालुक्यातील लोकांची उदासीनता, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा