मारामाऱ्या आणि दंगली नवीन नाहीत. निवडणुकांच्या काळात त्याला आणखी जोर येतो. मात्र, सध्या लग्नातच मारामाऱ्या होण्याच्या घटना वाढल्या आहेत. लग्न म्हणजे मंगल सोहळा; पण त्यातच हे अमंगळ घडत आहे. मिरवणुकीत नाचण्यावरून, जेवणावरून आणि मानपानावरूनही मारामाऱ्या होत आहेत. कोठे वऱ्हाडी मंडळींमध्ये आपसांत, तर कोठे वऱ्हाडी व गावकरी यांच्यात मारामाऱ्यांचे प्रकार होत आहेत. पोलिसांनाही हे एक नवीनच काम लागले असून, भविष्यातील कौटुंबिक कलहाची बीजेही यातून रोवली जात आहेत.
उशिरा सुरू झालेल्या लग्नसराईचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. एकाच दिवशी कित्येक सोहळे उरकले जात आहेत. अलीकडे लग्नांमध्ये अवास्तव खर्च करण्याकडे कल वाढला आहे. वरात व त्यामध्ये वाजविण्याच्या वाद्यांवर होणारा खर्च केवळ "तरुणाई'च्या अग्रहाखातर केला जातो. पूर्वी बॅंडबाजाच्या साथीने निघणारी नवरदेवाची ही मिरवणूक आता "डॉल्बी'शिवाय निघत नाही. नाचणारे पाच-दहाच असले, तरी हजारो रुपये खर्चून ही व्यवस्था करावी लागते. काही नवरदेव तर लग्न जमवितानाच ते ठरवून घेतात. नवरदेवांच्या मित्रांचा हा हट्ट पुरवावाच लागतो. कितीही गरीब घरातील लग्न असले, जेवणाचा बेतही साधारणच असला, तरी नवरदेवाच्या मिरवणुकीत मात्र "डॉल्बी' असतोच, असे चित्र सध्या पाहायला मिळते. आता मिरवणुकीत नाचायचे म्हणजे "घेतल्या'शिवाय थोडेच जमणार? त्यामुळे ही तरुणाई नवरदेवाच्या खर्चाने "ढोसून'च मिरवणुकीत सहभागी होते. नाचण्याच्या नादात किती "ढोसली' याचा हिशेबच लागत नाही. त्यामुळे त्यांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि ते नवदेवाचे मित्र असल्याने इतर कोणी त्यांना नियंत्रणात आणू शकत नाही. एवढेच काय, खुद्द नवरदेवाचेही ते ऐकत नाहीत. नागापूरला तर मित्रांनी आणि नातेवाइकांनी या कारणावरून नवदेवालाच मारहाण केली. उशीर होत चालल्याची जाणीव जाणत्या मंडळींनी करून दिली, की मग वादाला सुरवात होते. त्याचे रूपांतर चक्क मारामारीत होते. बोधेगावमध्येही असाच प्रकार घडला. आठ-दहा तरुणांच्या टोळक्याने चक्क गाव वेठीस धरले. पोलिस ठाण्यावरच दगडफेक केली. लग्नात वाद नको, असा विचार करून गावकरी आणि इतर वऱ्हाडी समजुतीने घेतात. त्यामुळे लोक आपल्याला घाबरले आहेत, असा समज होऊन या झिंगलेल्यांना आणखी जोर चढतो. गावकऱ्यांवरही हल्ला करण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे कित्येकदा गावकरी आणि वऱ्हाडी यांच्यात मारामाऱ्या होऊन
वऱ्हाडींना गावकऱ्यांनी बदडून काढल्याचीही उदाहरणे आहेत. प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने लग्नासाठी आलेल्यांना तुरुंगाची हवा खाण्याची वेळ येते.
दुसरा प्रकार आहे तो वऱ्हाडींमधील अतंर्गत भांडणांचा. यामध्ये वरपक्ष आणि वधूपक्ष यांच्यात मानपानावरून होणाऱ्या भांडणांचे प्रमाण अधिक असते. हे प्रकरणही कित्येकदा मारामाऱ्यांवर जाते. यामध्ये बहुतांश वेळा भांडण लावून देणारे त्रयस्थ असतात. नातलगांपैकीच कोणी तरी वरपक्षाची अस्मिता जागृत करून देऊन भांडणे लावून देतात. चांगल्या कार्यक्रमात विघ्न अणण्याची अपप्रवृत्ती काहींमध्ये असते. त्यातून सदसदविवेक हरवलेली माणसे एकमेकांशी भांडत बसतात. नगर शहरात एका लग्नात तर, लग्नपत्रिका मिळाली नाही, या कारणावरून नातेवाइकांनी वधूपित्याला मारहाण केली होती. कित्येकदा किरकोळ कारणासाठी लग्न मोडण्यापर्यंत मजल जाते.
ज्या दोन कुटुंबांमध्ये लग्नसोहळा होत असतो, त्या दोघांचा एकमेकांशी पुरेसा परिचय झालेला नसतो. स्थळ नवीन व लांबचे असेल, तर लग्नापूर्वी या कुटुंबांतील कर्ती मंडळी एक-दोनदाच भेटलेली असतात. काही लग्ने ताणाताणी होऊन, सौदेबाजी होऊन कशीबशी जमविलेली असतात. त्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी वधूपक्षाने आधीच कित्येक खटपटी केलेल्या असतात. ही जुळवाजुळव करताना वधूपिता आणि त्याच्या घरातील इतर सदस्य वैतागलेले असतात. त्यामुळे लग्नात ऐन वेळी पुढे आलेल्या मागणीमुळे त्यांच्या रागात भर पडते. वरपक्षाकडे इतर नातेवाईक मंडळी दुसऱ्यांच्या लग्नांची उदाहरणे देत त्यांची अस्मिता जागृत करून देतात. यावरूनही भांडणे होतात. मोठा खर्च करून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सोहळ्याला गालबोट लागते.
प्रकरण एवढ्यावर थांबत नाही. लग्नातील या भांडणांचे पडसाद या दोन कुटुंबांवर पुढे कित्येक वर्षे उमटत राहतात. कलुषित झालेली ही मने लवकर साफ होऊ शकत नाहीत. त्यातूनच पुढे विवाहितांच्या छळाच्या घटना घडतात. लग्नात झालेली ही भांडणे एवढी महागात पडत असल्याने ती वेळीच रोखली पाहिजेत. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या जाणत्या मंडळींनी पुढाकार घेऊन आधीपासूनच नियोजन केले पाहिजे.
४ टिप्पण्या:
सध्या सगळीकडेच चर्चेचा ठरलेल्या या विषयावर पोलीसनामा छान लिहिला आहे, या प्रकारांमुळे लग्ना सारख्या पवित्र सोहळ्याला नाहक गालबोट लागते. न आनंदावर विरजण पडते. शिवाय पारंपारिक विवाहपद्धतीत काही गैरप्रकारांनी अतिक्रमण सुरु केले आहे. केवळ मित्रमंडळींचा अट्टाहास पूर्ण करण्यासाठी 'डीजे' लावणे अन दारूच्या बाटल्यांचा खच रिचविणे चुकीचेच आहे. लग्नात गालबोट लावणाऱ्या अशा मित्रांना समजावणार्या एका नवरदेवालाही मार खावा लागला, हेही वाईटच. आपली संस्कृती व्यवस्थित समजून घेऊन लग्नातील प्रत्येक विधीमागचा अर्थ लक्षात घेतला तर या गोष्टींना नक्कीच आळा बसेल.शेवटी 'सोलूशन'हि छान दिले आहे.
It is the newly wed bride whose has to suffer mostly in such situations.Such so called traditions should be set aside if the society has to progress. It seems people are are least concerned about the effects of such quarrels. They should look at it from the brides point of view and think how would they feel if it was their sisters/daughters marriage and had such things happened in it.
It was an very intresting article which exposed an very important aspect of the present system which went on to became the root cause of many harrasments.
Anand Mehetre
महेश, प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, खरे तर असे विषय सुटणे अवघड काम आहे. पण आपण त्यासाठी प्रबोधन करण्यास काय हरकत आहे. हाच या लेखाचा उद्देश आहे. आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे.
ब्लॉग छान आहे. तुमच्य ब्लॉग ला ' Followers ' लिंक कुठे दिसत नाही. कृपया तेवढी लावा. म्हणजे तुमचा ब्लॉग फॉलो करता येईल.
धन्यवाद !
टिप्पणी पोस्ट करा