प्राथमिक शिक्षक बॅंकेची वार्षिक सभा आणि गोंधळ, मारामाऱ्या हे समीकरणच होऊन गेले आहे. त्यांच्यापाठोपाठ आता माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्येही गोंधळाला सुरवात झाली आहे. बहुतांश प्राथमिक शिक्षकांचा गावातील राजकारणाशी जवळचा संबंध असल्याचे मानले जाते. त्यांचा वावरही राजकीय व्यक्तींसोबतच असतो. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब त्यांच्या संस्थेच्या कारभारात उमटणे सहाजिक आहे, असेही मानले जाते; परंतु माध्यमिक शिक्षक यापासून काहीसे अलिप्त राहतात. त्यामुळे त्यांच्या संघटना आणि संस्थांमध्ये अशा प्रकारचा गोंधळ अपेक्षित नव्हता. मात्र, नगरमधील माध्यमिक शिक्षकांनी त्याला अपवाद करत आपल्या धाकट्या भावांचा "आदर्श' घ्यायचे ठरविले की काय, अशी शंका येते. गोंधळाचा आदर्श घेण्यापेक्षा संस्थेचा कारभार चोख व शांततेत चालवून प्राथमिक शिक्षकांसह इतरही संस्थांपुढे आदर्श ठेवावा, असे मात्र या "मोठ्या' गुरुजींना का सुचत नाही, असाही प्रश्न आहे.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेत जो गोंधळ झाला, तो इतर सहकारी संस्थांनाही लाजविणारा आहे. मुद्द्यापेक्षा गुद्द्यांवरच अधिक भर असल्याचे सभेत दिसून आले. अर्थात, हा उद्रेक काही एकाएकी झालेला नव्हता. दोन्ही बांजूनी त्याची पूर्वतयारी झालेली होती, असे म्हणण्यास वाव आहे. काही शिक्षक सभेला येताना काठ्या घेऊन आले होते, काहींनी मद्यपान केले होते. विरोधकांच्या गोंधळाला, मारामाऱ्यांना कसे उत्तर द्यायचे, याचे नियोजन व्यासपीठावरील लोकांनीही आधीच केल्याचे या वेळी झालेल्या फेकाफेकी व धराधरीवरून लक्षात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षकही रिंगणात उतरले होते. त्यांतील कोणी मार खात होते, तर कोणी मार देत होते. आपला पेशा, आपली प्रतिष्ठा, लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपली जबाबदारी याचे भानही या शिक्षकांना राहिले नव्हते.
""सहकारी संस्थेच्या सभेत आम्ही शिक्षक नव्हे, तर सभासद म्हणून भूमिका करीत होतो. संस्थेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहावा म्हणून आम्ही असे वागलो. लोकशाहीवर गदा येत असताना संयम सुटणे सहाजिकच होते,'' असा युक्तिवाद आता या शिक्षकांकडून केला जाऊ शकतो; मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आधी आपली ओळख शिक्षक ही आहे. केवळ चार भिंतींच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविणे, एवढ्यापुरते या पेशाकडे पाहिले जात नाही. शाळेबाहेरही शिक्षकांना वेगळे स्थान आहे. काही प्राथमिक शिक्षकांपेक्षा माध्यमिक शिक्षकांकडे तर समाज निश्चितच वेगळ्या नजरेतून पाहतो. त्यामुळे त्यांचे शाळेतीलच नव्हे, तर शाळेबाहेरील वर्तनही पेशाला शोभेल असेच असले पाहिजे. आता राहिला प्रश्न संस्थेच्या कारभाराचा. संस्थेचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी गोंधळ करण्याची काय गरज? चांगला कारभार करणारे लोक सत्तेवर निवडून आणता येत नाहीत का? मतदार शिक्षकच आहेत ना? त्यांना संस्थेच्या हिताची काळजी असते ना? सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी चर्चा किंवा इतर कायदेशीर मार्ग नाहीत का? वार्षिक सभेतही आपली मते, आपले प्रश्न सनदशीर मार्गाने, अभ्यासू पद्धतीने मांडता येत नाहीत का? हे मार्ग सोडून शिक्षकांना अशी गुद्दागुद्दी शोभत नाही.
इतर संस्थांमधील गोंधळाचा कित्ता गिरविण्यापेक्षा त्यांच्यासमोर वेगळा आदर्श ठेवावा, असे शिक्षकांना का वाटत नाही? केवळ गोंधळ केल्यावरच प्रसिद्धी मिळेल, असा त्यांचा समज आहे काय? वृत्तपत्रांमध्ये आपल्या "सरां'चे मारामाऱ्या करतानाचे छायाचित्र छापून आलेले पाहून उद्या त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना काय वाटेल? अशा "गोंधळी' शिक्षकांची त्यांच्या मनात काय प्रतिमा राहणार अन् कसला आदर्श ते घेणार? आजचे विद्यार्थी उद्याचे संस्थाचालक, सभासद, सत्ताधारी, विरोधक होणार आहेत. त्यांनीही अशाच कारभाराचा धडा आपल्या शिक्षकांकडून घ्यायचा काय, याचा विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षक बॅंकेतील गोंधळ एकदा पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता. माध्यमिक शिक्षकांनाही ते अपेक्षित आहे काय, याचाही त्यांनी विचार करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा