बुधवार, २३ जून, २०१०

बाई आणि बाटलीचं वेड...

नगर जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. जगाला सदाचाराची शिकवण देणारे अनेक संत या भूमीत होऊन गेले. त्यांची कीर्ती आजही जगभर असली, तरी नगर जिल्हा मात्र संताची ही शिकवण विसरला की काय, असा प्रश्‍न पडावा, अशा घटना जिल्ह्यात घडत आहेत. जुगाराची कीड जिल्ह्यात जुनीच आहे. केवळ ग्रामीण भागच नव्हे, तर शहरातही जुगारअड्डे चालतात. त्यापाठोपाठ आता जिल्ह्यात "बाई आणि बाटली'चे वेड लागल्याचे दिसून येत आहे. कितीही छापे घातले, तरी जुगारअड्डे जसे सुरूच राहत आहेत, तीच अवस्था आता दारू आणि वेश्‍याव्यवसायाची झाली आहे.
संतमहंतांचा जिल्हा, पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात या घटना शोभणाऱ्या नाहीत. कार्यकर्त्यांची गरज म्हणून जर नेतेमंडळी या प्रकारांकडे दुर्लक्ष करीत असतील, तर ती सर्वांत गंभीर गोष्ट म्हणावी लागेल.

पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश आणि त्यांच्यापूर्वीच जिल्ह्यात येऊन दाखल झालेल्या परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी अनेक ठिकाणच्या वेश्‍याव्यवसायांवर छापे घातले, तरीही धंदे सुरूच आहेत. त्यांचा विस्तार किती झालेला आहे, हे यावरून लक्षात येते. अर्थात, त्यासाठी आवश्‍यक असलेले ग्राहकांचे पाठबळ त्यांना मिळते, हेही निश्‍चित. अशा धंद्यांना जिल्ह्यात एवढा प्रतिसाद मिळावा, ही चिंताजनक बाब आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवरील ढाबे, ही बेकायदा दारू आणि वेश्‍याव्यवसायाची केंद्रे मानली जात होती. आता हे धंदे गावागावांत जाऊन पोचले आहेत. त्यासाठी काहींनी खास खोल्या बांधून भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. तेथे परराज्यांतून मुलींना आणून व्यवसाय केला जातो. पूर्वी ट्रक चालक हे यांचे प्रमुख ग्राहक असायचे. आता मात्र स्थानिक लोकही तेथे जात असल्याचे आढळून येते. शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणही तेथे मजा करण्यासाठी गेल्याचे आढळून येते. त्यांच्याच जोरावर हे धंदे सुरू आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणे आणि ढाबे यासाठी कुप्रसिद्ध आहेत. कोपरगाव तालुक्‍यातील येसगाव फाटा, खिर्डी गणेशचे उदाहरण यासाठी घेता येईल. कित्येक वेळा छापे घातले, अनेकदा तेथील हे धंदे बंद झाल्याचे सांगण्यात आले; मात्र काही दिवसांतच ते पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

मधल्या काळात पोलिस असा छापा घातल्यावर मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार "सार्वजनिक ठिकाणी अश्‍लील चाळे केल्या'चा गुन्हा दाखल करीत. त्यामध्ये न्यायालयात पाचशे रुपयांचा दंड होऊन आरोपींची लगेच सुटका होत असे. त्यामुळे त्या दिवसापासूनच पुन्हा धंदे सुरू, अशी अवस्था होती. आता मात्र कृष्ण प्रकाश यांनी "पिटा' कायद्यानुसार (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा) कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे केवळ धंदे करणारेच नव्हे, तर ते चालविणारे आणि पाठबळ देणाऱ्यांवरही कडक कारवाई होऊ शकते. आता तरी हे अवैध धंदे कमी व्हावेत, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

तीच गोष्ट बाटलीची. महामार्गांवरील ढाबे हे बेकायदा दारूविक्रीची केंद्रे बनली आहेत. आता तर बनावट दारूचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. केवळ वाहनचालकच नव्हे, तर परिसरातील लोकही या ढाब्यांचे हक्काचे ग्राहक झाले आहेत. या धंद्यातही अनेक बडी मंडळी उतरली असून, पैशाबरोबरच राजकीय पाठबळही त्यांना आहे. त्यामुळे कितीही छापे घातले, तरी हे धंदेही सुरूच राहतात. एकूणच, बाई आणि बाटली या धंद्यामुळे नगर जिल्ह्याच्या नावलौकिकास आता बट्टा लागत आहे. केवळ पोलिसी कारवाईने हे धंदे पूर्णपणे थांबणे कठीण आहे. हरवत चाललेली नैतिकता पुन्हा निर्माण करण्याची खरी गरज आहे.

वाचा संबधित लेख `मसाजच्या जाहिराती`

२ टिप्पण्या:

महेंद्र म्हणाले...

अशा गोष्टी आपण , असं होतंच असतं म्हणून सहज मान्य करतो . मला वाटतं की इथेच चुकतं. मी आता नारायण राणेंना एक पत्र पाठवणार आहे की तुमच्या पेपरमधे अशा जाहिराती तुम्ही कशा काय देता म्हणून?
दारू आणि बाई हे अगदी कॉमन समीकरण झालंय. नितिमत्ता ढासळलेली असण्याचे हे एक लक्षण म्हणता येईल.

Mahesh Patare म्हणाले...

सत्य परिस्थिती असली तरी लाज वाटावी अशीच आहे. चाललंय ते चुकीचे आहे असे वाटणाऱ्या लोकांनी एकत्र आल्यास हे नक्कीच थांबू शकेल. नगर जिल्हा हि संतांची भूमी आहे हे खरेच आहे पण त्या संतांच्या शिकवणीचा विसर पडत चाललाय. ती शिकवण पुन्हा एकदा मनात बिंबली तर पुन्हा एकदा रामराज्य येईल. त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात.