अन्यायाने पिडित, अत्याचारग्रस्त, पिचलेल्या मनांना धीर देण्याचे काम खाकी वर्दीतील माणसे करीत असतात. इतरांना आधार वाटावा अशी खाकी वर्दीतील माणसे मनाने खंबीर असावीत, त्यांच्या जीवनात फारसे चढउतार नसावेत, अशीच सामान्यांची कल्पना असते. परंतु दिवसेंदिवस खाकी वर्दीतील माणसांमधूनही घुसमट व्यक्त होऊ लागली आहे, तीही आत्महत्यांमधून! ही दुर्दैवी गोष्ट आहे.
मुंबईतील एक पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, ही काही एकमेव आत्महत्या नाही. आतापर्यंत अनेक पोलीसांनी आपली जीवनयात्रा अशा पद्धतीने संपविली आहे. पोलिस शिपायापासून पोलिस अधीक्षक पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. यातील एक मुख्य सूत्र आहे ते म्हणजे घरगुती प्रकरणे आणि वरिष्ठांचा जाच. शेवटी पोलिस दप्तरी नोंद करताना मात्र, त्याला "आजारपणाला कंटाळून' असे स्वरुप देऊन टाकले जाते. पोलिसांना आजार काही नवे नाहीत. भरती, प्रशिक्षण आणि दैनंदिन सराव यामध्ये सतत शारीरिक कष्ट घ्यावे लागणाऱ्या पोलिसांना आजारपणाची एवढी भिती का वाटावी? आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध असताना, त्यासाठी सरकारने सवलत योजना सुरू केलेल्या असताना आजारपणावर उपचार करण्यापेक्षा जीवनच संपविण्याचा विचार खाक्या वर्दीतील या दमदार मानल्या जाणाऱ्या माणसांमध्ये का यावा?
दुसरे कारण वरिष्ठांचा जाच. शिस्तीचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिस दलात वरिष्ठांचा जाच हेही काही नवीन नाही. अंतर्गत गटबाजी, स्पर्धा, राजकारण या गोष्टी पोलिस दलातही आहेत. त्या त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग होऊ गेल्या आहेत. त्यामुळे सुरवातीपासूनच याची सवय झालेल्या अधिकाऱ्यांना त्याला कंटाळून एकदम जीवनच संपवावे असा कोणता टप्पा त्यात येत असेल? वरिष्ठांनी जाच केला, रजा दिली नाही म्हणून त्यांच्यावरच गोळ्या झाडणारा पंढरपूरचा पोलिस शिपाई धुळा कोळेकर हाही याच पोलिस दलातील होता ना? मग तो तसा का वागला? असाही प्रश्न येथे निर्माण होतो.
एकूण विचार करता माणूस कोणीही असला तरी तो कौंटुबिक अडचणींपुढे हतबल होतो, असेच यावरून म्हणावे लागेल. आत्महत्या केलेल्या प्रकरणांचा अभ्यास केला तर बहुतांश प्रकरणांना नाजूक कौटुंबिक समस्येची किनार असल्याचे आढळून येते. माणूस जेवढा मोठा, तेवढे त्याला ते सहन करणे अवघड होते. "जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' याप्रमाणे त्यांची अवस्था होते. एकीकडे रोजच्या कामाचा ताण, वरिष्ठांच्या आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षा आणि दुसरीकडे कौटुंबिक प्रश्नांचा वाढत चाललेला गुंता. यातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग असले तरी अशावेळी ते बंद झालेले वाटतात. त्याला कारण आपसांत कमी झालेला संवाद. बोलल्याने दुःख हलके होते, असे म्हणतात. पण पोलिस दलात असे जिव्हाळ्याचे बोलणेच आता हद्दपर होत आहे. रोजच्या यंत्रवत जीवनात मित्र म्हणावेत अशी माणसे भेटत नाही. वेगळे विचार, विरंगुळा, मनोरजन यासाठी वेळही मिळत नाही. मुख्य म्हणजे कुटुंबापासून दूर एकटे राहावे लागणे, त्यांच्याशीही मनमोकळे करण्याची संधी न मिळणे हेही या घुसमटीमागील कारणे आहेत. त्यामुळे त्याची परिसीमा गाठली की, आत्महत्या एवढा एकच मार्ग दिसतो.
यासाठी पोलिस दलानेच विचार करण्याची गरज आहे. आपसांतील संवाद वाढावा, पोलिसांवरील कामाचा ताण कमी करणे लगेच शक्य नसले तरी त्यांच्या मनावरील ताण कमी करता येईल, का ? यासाठी काही उपक्रम घ्यावेत. केवळ योगासने अगर त्यासारख्या अन्य उपायांनी हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. मन हलके करता येईल, असे जिव्हाळ्याचे ठिकाण निर्माण झाले पाहिजे. पूर्वी असे काही वरिष्ठ असायचे की, आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीनच नव्हे तर कौटुंबिक सुख-दुःखात सहभागी होत. त्यांना धीर देत. त्यांच्याकडे ममतेने मन मोकळे करावे, असे हाताखालील लोकांना वाटत असे. त्यामुळे आतील घुसमट कमी होण्यास मदत होत असे. आता मात्र सर्व यंत्रवत जीवन झाले आहे. कोणास कोणासाठी वेळ नाही. मित्र म्हणावा अशी माणसेही आसपास दिसत नाहीत. त्यामुळेच खाकी वर्दीसुद्धा आतल्याआत अशी घुसमटते आहे. संवेदनशील मनाचे म्हणून ओळखले जाणारे आपले गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे सुद्धा यासंबंधी काहीच योजना नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा