काही दिवसांपूर्वी सरकारने धान्यापासून दारू तयार करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले. त्यामुळे सरकारला तो निर्णय थांबवावा लागला. त्यानंतर सरकारने पुन्हा जांभूळ, काजू, चिकू यांसारख्या फळांपासून दारू तयार करण्यास परवागनी देण्याचा विचार सुरू केला. यावर श्री. हजारे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, ""सरकारच्या डोक्यातून दारू काही जात नाही.'' मात्र, दारू तयार करण्यासाठी सरकार जेवढा विचार करीत नसेल, तेवढा या क्षेत्रातील लोक करीत असल्याचे दिसते. धान्य, फळे किंवा अन्य महागडे साहित्य दूरच; पाण्यात घातक रसायने मिसळवून बनावट दारू तयार करण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले आहे. नगरमध्ये घालण्यात आलेल्या छाप्यांत लाखो रुपयांची अशी बनावट दारू पकडण्यात आली. त्यातील रसायने आणि ती तयार करण्याची पद्धत पाहिली, तर ती बनावट दारू नाही, तर एक प्रकारचे विषच म्हणावे लागले. हा विष विकण्याचा धंदा जोरात सुरू असूनही पोलिसांना खूप उशिरा त्याची माहिती मिळाली. सहनशील नगरकर इतर अन्याय सहन करतात, तसे ही दारूसुद्धा पचवत होते, हेही विशेष म्हणावे लागेल.
अवैध धंद्यात पैसा कमवायचा आणि त्या जोरावर सत्ता मिळवून आणखी पैसा मिळवायचा. अवैध धंद्यांतून लोकांच्या माथी काहीही मारायचे व सत्ता मिळाल्यावर त्यांच्या तोंडचा घास हिरावून घेऊन आपले खिसे भरायचे, अशी दुहेरी लूट आपल्याकडे चालते. राजकारणी मंडळी आणि पोलिसही अशा लोकांकडे, त्यांच्याकडून मिळणाऱ्या "लाभामुळे' गप्प बसतात. गेल्या काही दिवसांपासून नगर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे उघडकीस आले आहेत. परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी धडक मोहीमच सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे. यापूर्वीही अनेक परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी अशीच कारकीर्द गाजविली आहे. यातही एक गंमत अशी आहे, की पोलिस अधिकारी जोपर्यंत परिविक्षाधीन म्हणून काम करतात, तोपर्यंतच अशी कारवाई केली जाते. ते जेव्हा मुख्य प्रवाहात येतात, त्या वेळी त्यांचा जुना खाक्या कोठे जातो, तेच कळत नाही. अशी उदाहरणेही नगर जिल्ह्यात अनुभवायला मिळाली आहेत.
इतर अवैध धंद्यांपेक्षा गेल्या आठवड्यात नगरमध्ये पकडण्यात आलेली बनावट दारू सर्वांत घातक ठरणारी आहे. लोकांच्या जीवनमरणाशीच हा खेळ आहे. स्पिरिट, पाणी आणि इतर रसायने वापरून तयार केलेली ही दारू विषापेक्षा कमी नाही. कित्येक दिवस असली म्हणून ही नकली दारूच लोकांना पाजली जात होती. नगरला लष्करी क्षेत्र मोठे आहे. तेथील "कॅंटीन'मधून लष्करी अधिकारी, जवानांसाठी असलेली दारू चोरट्या मार्गाने बाहेर आणून विकली जात असे. "फक्त लष्करी अधिकाऱ्यांसाठीच...' असा कंपनीकडूनच शिक्का मारून आलेल्या दारूवर मद्यपींचा मोठा विश्वास ! त्यामुळे तिला मागणी जास्त. तरीही सर्व ढाब्यांवर आणि हॉटेलांमधूनही अशी दारू हवी तेवढी मिळत होती. मुळात नगरच्या लष्करी क्षेत्राचा कोटा किती, दारू यायची किती आणि त्यातील बाहेर विक्रीसाठी यायची किती? असे असूनही सर्वत्र ती मुबलक प्रमाणात कशी मिळायची, याचा विचारच कोणी करीत नव्हते. या प्रश्नांची उत्तरे त्या दिवशी तारकपूरमध्ये घालण्यात आलेल्या छाप्यातून मिळाली. लष्करी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या दारूच्या बाटल्यांवर असते तसे हुबेहूब लेबल तयार करून नकली दारू विकली जात होती. म्हणजे कित्येक लोकांनी खास लष्करी दारू म्हणून जे काही सेवन केले, ती बनावट दारू होती. दुसरी "क्रेझ' आहे ती दमणच्या दारूची. स्वस्तात मिळणारी ही दारू इकडे आणून महागात विकली जाते. या बनावट दारू तयार करणाऱ्यांनी ढाबेवाल्यांची आणि ग्राहकांची फसवणूक करीत दमणची लेबले लावून त्या बाटल्यांतून बनावट दारूचीच विक्री केली. त्यामुळे यापूर्वी दमणची दारू म्हणून जे काही छापे पडले, ती तरी खरेच दमणची दारू होती का, असाही प्रश्न पडतो. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असताना प्रशासनातील कोणाही घटकाला त्याची माहिती मिळू नये, हेही नवलच म्हणावे लागेल. ज्यांना माहिती असूनही "लाभा'पोटी त्यांनी ती दडवली, त्यांना अधिकारी तर नव्हेच; पण माणूस म्हणणेही योग्य ठरणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा