मंगळवार, १६ जून, २००९

जीवघेणी व्यावसायिक स्पर्धा

व्यावसाय सचोटीने आणि नोकरी इमानाने केल्यास त्यामध्ये टिकून राहता येते, असे जुनी मंडळी सांगत. अनेक यशस्वी व्यावसायिकांनी या सचोटीचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. अलिकडे मात्र ही सचोटी राहिलेली नाही. व्यावसायिक स्पर्धा वाढत गेली तशा त्यामध्ये अपप्रवृत्ती येत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी फसवाफसवीचाही आधार घेतला जाऊ लागला. आता त्याही पुढे जाऊन स्पर्धकास संपविण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. डॉक्‍टरीसारख्या पवित्र पेशातही (खरे तर त्याला व्यावसायही म्हणत नाहीत) असे प्रकार घडू लागले आहेत. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथील डॉ. कवडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही अशीच व्यावसायिक स्पर्धेचे कारण असल्याचे आढळून आले. पूर्वी घडलेल्या आष्टी तालुक्‍यातील डॉ. अजबे खून प्रकरणाचेही उदाहरण देता येईल. (अर्थात यातील आरोपींची उच्च न्यायालयात सबळ पुराव्याअभावी सुटका झाली.)
खुनाची घटना घडल्यानंतर तपास करताना पोलिस "तीन डब्ल्यू' तपासतात. वाईन, वुमेन आणि वेल्थ असे तीन डब्ल्यू मानले जातात. यापैकीच एक कारण खुनाच्या मागे असू शकते. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीचा वाद, एखाद्याची संपत्ती हडप करण्यासाठी, संपत्तीत वाटेकरी होऊ नये यासाठी, संपत्तीची चोरी करताना वैगेरेसाठी खून होत असल्याची उदाहरणे पूर्वीपासून घडत आली आहेत. मात्र, दुसऱ्याने संपत्ती मिळवूच नये, आपल्यापेक्षा श्रीमंत कोणी होऊच नये या वादातून खून किंवा खुनाचा प्रयत्न होण्याच्या घटना आता वाढत चालल्या आहेत. भेर्डापूरची घटना याच प्रकारातील. आपल्या चुलत भावाचा दवाखाना चांगला चालतो आणि आपला चालत नाही, या कारणातून सुपारी देऊन त्याच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चुलत भावाकडूनच झाला. पूर्वी अशीच एक घटना आष्टी तालुक्‍यात डॉ. विजय अजबे यांच्याबाबतीत घडली होती. त्यांच्याच चुलतभावांनी त्यांचा खून केल्याचा आरोप होता. सत्र न्यायालयात यातील एकाला फाशी तर एकाला जन्मठेप सुनावण्यात आली होती. पुढे उच्च न्यायालयात सबळ पुराव्याअभावी दोघांचीही सुटका झाली.
या घटना येथे उदाहरणादाखल घेतल्या असल्या तरी इतरही क्षेत्रात आता "जीवघेणी' व्यावसायिक स्पर्धा सुरू झाली आहे. ग्राहकांची फसवणूक, जकात चोरी, वजनात खोट, बनावट माल, कर चुकवेगिरी या मार्गाचा अवलंब करून पैसा कमावणारे कमी नाहीत. त्याही पुढे जाऊन आता दुसऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा व्यावसाय चांगला चालत असला तर त्याच्याबद्दल तक्रारी करायच्या. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा, खोट्या गुन्ह्यांत अडकवून द्यायचे असे प्रकार आता सुरू झाले आहेत. एका बाजूला व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या टोळ्या सक्रीय होत असताना व्यावसायिक स्पर्धेतून एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकारही सुरू आहेत. याचा फायदा खंडणीबहाद्दर आणि राजकारणी मंडळींनाही होत आहे. हा प्रकार बाजारपेठेतील वातावरण बिघडविणारा तर आहेच, शिवाय समाजासाठीही घातक ठरणारा आहे. विविध व्यावासायिकांच्या संघटना सध्या कार्यरत आहेत. विविध मागण्यांसाठी त्या सरकारी यंत्रणेशी लढत असतात. एवढेच काय तर बाहेरच्या कोणाकडून त्यांना त्रास झाला तर त्याविरूद्धही एक होतात. मग याच संघटनांनी निकोप व्यावसायिक स्पर्धेचे वातावरण तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यास काय हरकत आहे? आपल्यातील अपप्रवृत्तींविरूद्ध आधी लढा पुकारला तर समाजाचाही त्यांच्यावरील विश्‍वास वाढेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: