![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9qPmHQLPEEATtj_O5RtBG8CwwRrFBwHkm0I5OUGzvpX5315TjbAj8NJRuayD3oo5rlWBmWCROWLsETfjrKoqgYfofmzxWYZ2u94I5_O9WHu3CZEeNr0-hqZZ_NRDFRF1vgsH9qPMEUAU/s200/chor.jpg)
जिल्ह्यातील अनेकांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचे जिल्ह्याला कौतुक आहेच; पण दुर्दैवाने वाट चुकलेल्या काहींच्या कृत्यांचा खेदही व्यक्त होतो. दोन वर्षांपूर्वी सराफी दुकानांवर दरोडे टाकणाऱ्या टोळीने राज्यभर उच्छाद मांडला होता. सायंकाळच्यावेळी सराफी दुकानावर दगडफेक करून लूट केली जात असे. या टोळीचा म्होरक्या दीपक युनूस काळे ऊर्फ नांगऱ्या मूळचा गुणवडी (ता. नगर) येथील. त्याचा दुसरा महत्त्वाचा साथीदार "काल्या' हा श्रीगोंदे तालुक्यातील. टोळीतील बहुतांश सदस्य नगर जिल्ह्यातीलच होते. त्यातील नांगऱ्या वगळता बहुतांश आरोपी जेरबंद झाल्याने आता हे गुन्हे थांबले असले, तरी मधल्या काळात राज्यभरातील पोलिस दल यासाठी चांगलेच कामाला लागले होते.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लुबाडण्याचे गुन्हे, तर अद्याप सुरूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे व्यापारी आणि व्यावसायिकांना नगर जिल्ह्यात आणून लुटण्याचे या टोळीचे उपद्व्याप अद्याप सुरूच आहेत. शहरात जाऊन तेथील धनिकांचा विश्वास संपादन करायचा, त्यासाठी अन्य एखादा मध्यस्थ टाकायचा. नंतर आमच्या गावाकडे चोरीचे अगर सापडलेले सोने असल्याची बतावणी करून ते स्वस्तात देतो, असे आमिष दाखवून संबंधितांना जिल्ह्यात आणले जाते. त्यांना सायंकाळच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज हिसकावून घेतला जातो. पोलिस भाषेत "ड्रॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुन्ह्यांची सुरवात नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदे तालुक्यात झाली. भीमा नदीच्या काठावर अद्यापही अशा घटना सुरूच आहेत. भटक्या समाजातील लोकांनी दरोड्याची ही वेगळी पद्धत सुरू केली असून, त्यांच्या कित्येक टोळ्या यासाठी कार्यरत आहेत. आता तर यावरून त्यांच्यात आपसांत वादही होऊ लागले आहेत. पोलिसांवर हल्ला करून त्यांना ठार करण्यापर्यंत या टोळ्यांची मजल गेली आहे.
पायी फिरायला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याचे गुन्हेही नगर जिल्ह्यात वाढले. दागिन्यांना पॉलिश करून देण्याचा बहाणा करून ते लांबविणाऱ्या आणि पोलिस असल्याचे सांगून वृद्धांना लुटणाऱ्या टोळ्याही श्रीरामपूर भागातील आहेत. दरोड्याच्या वेळी महिलांवर अत्याचार करण्याची कोठेवाडीतील घटनाही राज्यभर धक्कादायक ठरली. नंतर राज्यातही काही ठिकाणी तिची पुनरावृत्ती झाली.
वाट चुकून गुन्हेगारीकडे वळलेल्या अगर पिढीजात यात अडकलेल्यांसाठी राज्यातील पहिला पुनर्वसन प्रकल्पही नगर जिल्ह्यात सुरू झाला, ही एक जमेची बाजू. तत्कालीन जिल्हाधिकारी उमाकांत दांगट आणि पोलिस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारला आहे. गुन्हेगारी क्षेत्राकडे वळलेल्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन निर्माण करून त्यांना चांगल्या मार्गाला लावणे, हा याचा हेतू आहे. त्यासाठी सरकारी खर्चाने त्यांना जमिनी घेऊन देऊन शेतकरी बनविण्यात येत आहे. काहींना व्यवसाय सुरू करून देण्यात येत आहे. वाट चुकलेल्या या भूमिपुत्रांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे दृश्य परिणाम लक्षात यायला वेळ लागेल.
लूटमारीचीही परंपरा!
जिल्ह्यात लूटमारीच्या घटना अलीकडच्या काळातील नाहीत. त्यांना ही जुनी परंपरा आहे. ब्रिटिशांच्या काळातही त्यावेळच्या पोलिसांना नाकीनऊ आणणाऱ्या "काळू-कान्हू'च्या टोळ्या होत्याच. मात्र, ते गरिबांना लुटत नसत, शिवाय लुटीतील काही भाग समाजकार्यासाठी वापरत. आताचे मात्र स्वतःसाठीची लूटमार करतात, हे विशेष !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा