"गेल्या वर्षी आपल्या खात्याचा संपूर्ण हिशेब केल्यानंतर आयकर विभाग आपल्याला 820 रुपये 50 पैसे परतावा (रिफंड) देणे आहे. तो प्राप्त करून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विचारलेली माहिती भरा. उशीर झाल्यास पैसे मिळणार नाहीत-आयकर विभाग,' असा संदेश आपल्या ई-मेलवर येतो. हा मेल आयकर विभागाकडून आलेला आहे, असे भासविले जात असले, तरी प्रत्यक्षात तो "फिशिंग' ई-मेल असल्याचे लक्षात येते. सध्या अनेकांना असे संदेश येत आहेत.
इंटरनेटचा गैरवापर करून फसवणूक करण्याचा धंदा देशातील आणि देशाबाहेरील काही मंडळी नेहमी करीत असतात. त्यासाठीच ही एक युक्ती वापरली जात आहे. "इन्कम टॅक्स डिपार्टमेंट' या नावाने आलेला हा संदेश यातीलच एक प्रकार असल्याचे चौकशीत आढळून आले. या संदेशाच्या खाली एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक केल्यास एक फॉर्म येतो. त्यामध्ये आपली व्यक्तिगत माहिती विचारलेली असते. बॅंकेच्या खात्यासह क्रेडिट कार्ड व त्याचा क्रमांकही विचारलेला असतो. सामान्यतः ही माहिती आयकर विभागानेच विचारली असल्याने काही लोक ती तातडीने भरतातही. हा संदेश खरा असल्याचे भासविण्यासाठी तळाला आयकर विभागाची खरी खुरी लिंकही जोडलेली असते. त्यावर क्लिक केल्यास आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ उघडले जाते. त्यामुळे हा संदेश खरा असल्याची खात्री पटावी, अशी रचना केलेली असते. मात्र, फॉर्म भरण्यासाठी जेथे क्लिक करण्यास सांगितले आहे, ती लिंक भलतीकडेच जोडल्याचे आढळून येते.
ई-मेलमधील तंत्राच्या साहाय्याने अशा एका "फिशिंग' संदेशाचा मार्ग शोधला असता, असा संदेश "सिक्युरिटी ऍट ऑनलाइनअपडेट डॉट कॉम' या पत्त्यावरून पाठविल्याचे आढळून येते, तर लिंक "काद्रो सोल्यूशन्स डॉट कॉम'ला जोडल्याचे आढळून येते. मुख्य म्हणजे जेथे क्लिक करायला सांगितले असते, ती लिंक काही काळासाठीच कार्यान्वित राहते, उत्तर दिले नाही, तर ती लॅप्स होत असल्याचे आढळून आले. आयकर विभागाकडून पैसे परत मिळणार, या आशेने लोकांनी ती तत्काळ भरावी, अशी रचना या संदेशाची आणि लिंक केलेल्या फॉमची केलेली असते. एकदा का ही माहिती मिळाली, की त्याचा वापर करून संबंधितांची लूट केली जाऊ शकते. इंटरनेटवर विविध कारणांसाठी आपले ई-मेल आयडी आपण देत असतो, त्याचा वापर करून हे तोतये आपल्याला संदेश पाठवीत असल्याचे दिसून येते. शेअर मार्केट किंवा इतर प्रकारे आर्थिक व्यवहारांसाठी वापरलेल्या ई-मेल आयडीवरच असे संदेश येत असल्याचे दिसून येते.
हे संदेश फसवे ः आयकर विभाग
गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकार सुरू झाले असून, आयकर विभागाकडेही याबद्दल तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे असे ई-मेल फसवे असल्याचे या विभागाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. आयकर विभागाकडून असे कोणतेही ई-मेल संदेश पाठविण्यात आलेले नाहीत. मुख्य म्हणजे परताव्यासाठी (रिटर्न्स) असे संदेश पाठविणे आणि करदात्यांचे क्रेडिट कार्ड क्रमांक विचारणे ही आयकर विभागाची पद्धत नाही. त्यामुळे अशा संदेशांना उत्तर देऊ नये, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा