बाबाच्या औषधाचा गुण येतो म्हणून "तो' भक्त बाबाच्या सान्निध्यात येऊन राहिला; पण बाबाला भक्ताचा संशय येत होता. आपल्या गुहेतील "कारनामे' तो बाहेरच्या लोकांना सांगत असल्याच्या संशयाने बाबा पछाडला गेला आणि एक दिवस त्याने भक्ताचा खून केला. एकदा जन्मठेप भोगून आलेला या भोंदू बाबाची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली.
नगर तालुक्यातील निमगाव घाणा गाव. गावाबाहेर कानिफनाथांचे जुने मंदिर आहे. मंदिराजवळच एक गुहा आहे. काही दिवसांपूर्वी अचानक तेथे एक बाबा राहायला आले. ते देवाची पूजाअर्चा करीत. मंदिराची साफसफाई करीत. शिवाय त्यांचा झाडापाल्याच्या औषधाचा अभ्यास होता. पीडित भक्तांना ते औषध देत. त्यामुळे गुण आल्याने पंचक्रोशीत बाबांच्या नावाचा बोलबाला झाला. दूरदूरचे लोक बाबांकडे औषध घ्यायला येत. काही जण तेथेच मुक्कामही ठोकत.
पारनेर तालुक्यातील काळकूप येथील नानाभाऊ भगवंत सालके (वय 60) यांना त्वचारोग होता. बाबांची महती त्यांच्या कानापर्यंत पोचली. सुरवातीला त्यांच्याकडून घेतलेल्या औषधाचा गुण आल्याने सालके यांनी आठ-दहा दिवस बाबांच्या गुहेतच मुक्काम ठोकून औषधोपचार घेण्याचे ठरविले. त्यानुसार ते आवश्यक त्या चीजवस्तू घेऊन निमगावा घाणा येथे बाबांच्या गुहेतच राहायला आले. बाबा त्यांना औषध देत होते. सालके बाबांची आणि देवाचीही सेवा करीत होते; मात्र बाबांना सालके यांच्याबद्दल संशय येऊ लागला. सालके हे आपल्या गुहेतील कारनामे आणि आपल्याबद्दलची माहिती गावातील लोकांना सांगत असल्याचा संशय बाबांना यायचा. त्यामुळे त्यांनी त्यांचा काटा काढायचे ठरविले.
19 डिसेंबर 2007 ला सालके यांचे भाऊ वसंत सालके नगरमध्ये आले असता त्यांना निमगाव घाणामधून दूरध्वनी आला, "आपल्या भावाचा खून झाला असून, मृतदेह बाबांच्या गुहेबाहेर पडला आहे...' त्यामुळे वसंत सालके ताबडतोब तेथे गेले. त्यांचे भाऊ नानाभाऊ यांचा मृतदेह तेथे पडला होता. गुहेत बाबा होताच. त्याच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती. तेथे जमलेल्या गर्दीला तो धमकावत होता. "सालके माझी माहिती गावकऱ्यांना देत होता, म्हणून त्याचा खून केला आहे. तुम्हीही येथून जा, नाही तर तुम्हालाही ठार करीन' अशी धमकीही बाबा लोकांना देत होता.
याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप डोईफोडे व एमआयडीसीचे पोलिस ताबडतोब घटनास्थळी गेले. त्यांनी बाबाला ताब्यात घेतले.
हा भोंदू बाबा म्हणजे वेणूनाथ ऊर्फ वेणूराज सावळेराम जाधव (वय 52) हा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याबद्दल अधिक चौकशी केली असता वेगळीच माहिती पुढे आली. जाधव याला दोन बायका. पूर्वी एकदा त्याचे सासूशी भांडण झाले होते. त्या गुन्ह्यात त्याला जन्मठेप झाली होती. ती शिक्षा भोगून काही महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता. त्यानंतर आपली जुनी ओळख पुसून टाकण्यासाठी त्याने हे "बाबा'चे रूप धारण केले होते. झाडपाल्याचे औषध देऊन लोकांचा विश्वास संपादन केला होता.
पोलिसांनी बाबाला अटक केली. त्याच्याविरुद्ध खटला पाठविला. येथील जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारतर्फे ऍड. रमेश जगताप, ऍड. रामदास गवळी व ऍड. पुष्पा कापसे-गायके यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे बचाव करण्यात आला, की मंदिरातील मूर्तीचे दागिने चोरण्यासाठी रात्री चोर आले असावेत व त्यांच्याशी सालके यांची झटापट होऊन त्यामध्ये ते ठार झाले असावेत. मात्र, सरकार पक्षाच्या युक्तिवादासमोर त्याचा हा बचाव टिकला नाही. न्यायालयाने या बाबाला पुन्हा खडी फोडायला पाठविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा